राष्ट्र सेविका समितीच्या सेविका ते संघटनेच्या तिसऱ्या प्रमुख संचालिका असा संघटनात्मक प्रवास करणाऱ्या उषाताई चाटी यांच्या  निधनाने संघपरिवाराची मोठी हानी झाली आहे. एक मातृतुल्य व्यक्तिमत्त्व त्यांच्या निधनाने हरवल्याची भावना परिवारात निर्माण झाली आहे. ताईंनी त्यांचे आयुष्य समितीच्या कार्यासाठी खर्ची घातले.

भंडारा जिल्ह्य़ात जन्मलेल्या पूर्वाश्रमीच्या उषाताई फणसे विवाहानंतर उषाताई चाटी झाल्या. त्या बालपणापासून समितीशी जुळल्या होत्या. त्यांचे प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण भंडाऱ्यात झाले. विवाहानंतर घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून सामाजिक कार्य करणे महिलेसाठी आव्हानच असते. त्यातही समितीचे खडतर कार्य करणे अवघडच. मात्र उषाताईंनी घर आणि सामाजिक कार्य दोन्ही क्षेत्रांत एकाच वेळी काम करताना कुणावरही अन्याय होऊ दिला नाही. नागपुरातील हिंदू मुलींच्या शाळेत त्या दीर्घकाळ शिक्षिका होत्या. शाळेतील वाग्मिता विकास समितीच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी सुमारे ३६ वर्षे धुरा सांभाळली. मुलींमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि वक्तृत्वाचे धडे देणे हे त्यांचे विशेष कार्य होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पूर्णवेळ समितीच्या कार्याला वाहून घेतले होते. द्वितीय संचालिका ताई आपटे यांच्यानंतर ९ मार्च १९९४ ला उषाताईंकडे समितीच्या प्रमुख संचालिका म्हणून जबाबदारी आली. १९९४ ते २००६ पर्यंत त्या या पदावर होत्या.

समितीच्या कार्यविस्तारासाठी त्यांनी देशभर प्रवास केला. २००५ मध्ये खापरी येथे अखिल भारतीय पातळीवर झालेले सुमारे दहा हजार सेविकांचे संमेलन नागपूरकरांच्या स्मरणात आहे. उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी समिती विस्तारासाठी प्रयत्न केले. १९८४ पासून त्यांचे वास्तव्य देवी अहिल्या मंदिरातच होते. त्या काळात त्या देवी अहिल्याबाई स्मारक समितीच्या कार्यवाहिका होत्या. या दरम्यान त्यांनी अहिल्या मंदिरात पूर्वाचल राज्यातील मुलींसाठी वनवासी कन्या छात्रावास सुरू केले. प्रारंभी मुलींची संख्या कमी असली तरी आज मात्र त्या ठिकाणी पूर्वाचलातील सात राज्यांतील सुमारे ४२ मुली शिक्षण घेत आहेत. ताईंच्या नियोजनबद्ध कामाचेच हे प्रतीक होय. सौम्य व्यक्तिमत्त्व आणि मातृवात्सल्य हा त्यांचा स्वभावगुण समितीच्या कार्यासोबत अनेक कार्यकर्त्यांना जोडून घेण्यात महत्त्वाचा ठरला. समितीच्या कार्याप्रति त्यांची समर्पणाची भावना होती. फक्त काम करायचे, त्याचे कधी प्रगटीकरण करायचे नाही, या स्वभावामुळे त्यांच्या कामाची चर्चा झाली नसली तरी त्याची व्याप्ती मात्र संघटनात्मक पातळीवर मोठी होती हे संघटनेच्या विस्तारावरून स्पष्ट होते. आवाज चांगला असल्यामुळे गीत गायनामध्ये त्यांना विशेष रुची होती. त्या समितीच्या गीत प्रमुख असताना त्यांनी नागपुरात गीत महोत्सव आयोजित केला होता आणि तसा महोत्सव पुन्हा झाला नाही. देशभरातील संघाशी संबंधित गीत गायक त्यासाठी आले होते. उषाताई या सकारात्मक ऊर्जेचे केंद्र होते.  सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही ताईंसोबत संघकार्यात सहभाग घेतला होता. गृहिणी, शिक्षिका आणि संघटक या तीनही पातळीवर त्यांनी सकारात्मक काम केले आहे. आर. जी. जोशी फाऊंडेशन, मुंबई व भाऊराव देवरस न्यास, लखनऊ यांच्या वतीने त्यांना पुरस्कृत करण्यात आले होते तर ओजस्विनी संस्थेतर्फे त्यांना ओजस्विनी अलंकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.