भारतीय संस्कृती जितकी पुरातन तितकीच तिच्यातील काव्यपरंपराही. भारतातील सर्वच भाषांमध्ये ही परंपरा नुसतीच आढळते असं नाही, तर ती समृद्धही आहे. यात गेल्या दीड शतकभरात इंग्रजी भाषेची भर पडली. वसाहतवादाने दिलेल्या या भाषेशी भारतीयांनी सुरुवातीला जवळीक साधली, नंतर तिला आपलेसे केले, इतके की, पुढे त्याच भाषेत ते प्रयोगशील अभिव्यक्तीही करू लागले. भारतीय इंग्रजी कवितेचा गेल्या चार पिढय़ांचा प्रवास पाहिला तर हे जाणवतेच. सुरुवातीला अनुकरणात्मक कविता, मग रोमँटिसिझम, पुढे स्वातंत्र्योत्तर काळातील प्रयोगशील कविता या तीन टप्प्यांनंतर गेल्या दोन दशकांपासून भारतीय इंग्रजी कवितेत चौथ्या पिढीचे आगमन झाले. त्यात जीत थायिल, रणजित होस्कोट, सीपी सुरेंद्रन,  आदी कवींचा समावेश होतो. विजय नम्बिसन हेही या पिढीतील महत्त्वाचे कवी, किंबहुना या पिढीतील क्रमवारीत अग्रस्थानी घेता यावे असे नाव.

मूळचे केरळचे असलेले नम्बिसन यांचा जन्म १९६३ मध्ये झाला. पुढे मद्रास आयआयटीमधून त्यांनी पदवी शिक्षण घेतल्यावर ते पत्रकारितेकडे वळले. पत्रकार म्हणून त्यांनी दिल्ली, चेन्नई, बिहार, केरळ व मुंबई या ठिकाणी काम केले. मात्र हे करत असतानाच ‘कविता’ ही त्यांच्या जगण्याचा स्थायीभाव झाली. नव्वदच्या दशकात मुंबईत डॉम मोराईस, अरुण कोलटकर, अदिल जस्सावाला, निस्सीम इझिकेल, युनिस डिसूझा, जीत थायिल अशा विविध वयोगटांतील कवींचा मेळाच होता. त्यात नम्बिसन हेही सामील झाले. १९८८ मध्ये ब्रिटिश काऊन्सिल व पोएट्री सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑल इंडिया पोएट्री चॅम्पियनशिप’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अशा स्वरूपाची ही पहिलीच स्पर्धा होती. त्यात नम्बिसन यांच्या ‘मद्रास सेंट्रल’ या कवितेला प्रथम पुरस्कार मिळाला. तेव्हा नम्बिसन हे केवळ पंचविशीत होते. अशा वयात मिळालेले हे यश अनेकांना भरकटवू शकते, पण नम्बिसन हे त्याला अपवाद. त्यांना पुरस्कारांचे, प्रसिद्धीचे वावडेच. त्यामुळेच १९९२ मध्ये जीत थायिल व नम्बिसन यांचा ‘जेमिनी’ हा कविद्वयसंग्रह प्रकाशित झाल्यानंतर, नम्बिसन यांचा पुढचा कवितासंग्रह तब्बल २५ वर्षांनंतर प्रकाशित झाला. ‘फर्स्ट इन्फिनिटीज’ हा तो संग्रह. त्यात नम्बिसन यांच्या ६० कवितांचा समावेश आहे.   मधल्या काळात त्यांची तीन गद्य पुस्तके प्रकाशित झाली. त्यात नम्बिसन यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान, भवतालाकडे पाहण्याची  दृष्टी यांचा अंतर्भाव आहे. ‘लँग्वेज अ‍ॅज अ‍ॅन एथिक’ हे २००३ साली प्रकाशित झालेले त्यांचे पुस्तक त्यादृष्टीने महत्त्वाचे. मानवी जीवनातील भाषेच्या वापराविषयी नम्बिसन यांनी या पुस्तकात मूलगामी चर्चा केली आहे. नव्या तंत्रज्ञानाधारित संवादसाधनांना सरावलेल्या भवतालात भाषा ही अधिक जपून वापरावी लागेल, अन्यथा निखळ सत्य कधीही बोलले, लिहिले जाणार नाही, असा इशाराच त्यांनी यात दिला आहे. सध्याच्या पोस्ट ट्रथ जगाचा अवतार पाहता नम्बिसन यांचे हे पुस्तक महत्त्वाचे ठरावे. तीच बाब त्यांच्या ‘बिहार इज इन द आइज् ऑफ द बीहोल्डर’ या पुस्तकाची. बिहारमधील एका लहानशा शहरातील सोळा महिन्यांच्या वास्तव्यातील अनुभव या पुस्तकात नम्बिसन यांनी सांगितले आहेत. शिवाय १६व्या शतकातील भक्ती चळवळीतील मल्याळी कवी पुन्थानम व नारायण भट्टथिरी यांच्या रचनाही त्यांनी इंग्रजीत अनुवादित केल्या. गुरुवारी त्यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने नव्वदोत्तरीतील एका गूढ कवीला साहित्यजगत दुरावले आहे.