साहित्य-नाटय़ संमेलन असो, वा कोणताही मोठा साहित्यिक कार्यक्रम, ते हमखास भेटायचे. प्रतिष्ठित लेखक असो वा नवोदित कवी.. एकदा त्यांच्या डोक्यात तो माणूस बसला, की लगेच त्याचे रेखाचित्र काढायचे. कार्यक्रम संपला की त्याच्या हातात ते द्यायचे आणि शबनम बॅग सांभाळत, लांबलांब पावले टाकत ते निघूनही जायचे. मग भांबावलेल्या त्या व्यक्तीला कोणी तरी सांगायचे, अहो ते ‘टॉनिक’वाले मानकरकाका! अशी हजारो रेखाचित्रे त्यांनी काढली.. कशाचीही अपेक्षा न ठेवता!
साने गुरुजींना आदर्श मानून शालेय मुलांसाठी झटणाऱ्या या मनस्वी आणि कलंदर माणसाचे कागदोपत्री नाव होते कृष्णा लक्ष्मण मानकर, पण मानकरकाका हीच त्यांची खरी ओळख बनली. भारदस्त आवाज आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्वामुळे ते कलावंत आहेत, हे सहज जाणवायचे. चित्रकला, साहित्य आणि लहान मुले ही त्यांची आवड. कलाशिक्षक असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेची गोडी लागावी यासाठी ‘बालनुक्कड’सारख्या स्पर्धा ठिकठिकाणी त्यांनी भरवल्या. यासाठी खूप पायपीटही केली. दिवंगत साहित्यिक चंद्रकांत खोत यांना ते गुरुस्थानी मानत. त्यांच्याच मदतीने बालदोस्तांना ज्ञानाबरोबरच त्यांचे मनोरंजनही व्हावे यासाठी त्यांनी ‘टॉनिक’ या नावाने दिवाळी अंक काढायला सुरुवात केली आणि गेली ३६ वर्षे त्यात खंड पडू दिला नाही. अंकाचा दर्जा आणि छपाईबाबतही ते काटेकोर असत. वेगवेगळे विषय अत्यंत कल्पकतेने त्यांनी ‘टॉनिक’मधून हाताळले. लेखकांकडून साहित्य आणण्यासाठी ते लांबचाही प्रवास आनंदाने करीत. अंकाचे गठ्ठे स्वत: वाहत असत. एवढे करूनही अंक नुकसानीतच जात असे; पण त्याची फिकीर न करता पुढच्या वर्षी त्याच उत्साहाने ते नव्या अंकाची जुळवाजुळव करीत. त्यांची निरलस वृत्ती आणि प्रामाणिकपणा बघूनच डॉ. जयंत नारळीकर ते डॉ. विजया वाड अशा अनेक मान्यवरांनी त्यांच्या अंकासाठी कित्येक वर्षे आवर्जून लेखन केले. या अंकांना विविध संस्थांचे मिळालेले ५५ पुरस्कार हेच त्यांचे खरे ‘टॉनिक’ होते. भटकंती चालू असतानाही ‘देवचार’ हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले. पुलंच्या ‘वयम् मोठम् खोटम्’ या एकांकिकेचा त्यांनी हिंदीत अनुवाद केला होता. त्यांचा जन्म भायखळ्याचा. त्यामुळे कामगारांच्या मुलांसाठी स्थापन झालेल्या विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचे संस्थापक दादा गावकर यांच्यासोबत ते अखेपर्यंत कार्यरत होते. बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळावे, ही इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती. ती पूर्ण होण्याआधीच शनिवारी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.