आपल्याकडे ग्रंथपालांना फार कमी महत्त्व दिले जाते हे जसे खरे तसेच त्यांच्यापैकी काही मोजकेच ग्रंथपाल हे वाचक व संशोधकांइतके जिज्ञासू असतात. रॉचेस्टर विद्यापीठाच्या ग्रंथपाल मेलिसा मीड यांना वाचनालयातील ग्रंथांचे जेवढे प्रेम आहे तेवढे कशाचेच नाही. या वाचनालयातील पुस्तकांचे व त्यांचे ऋणानुबंध अलीकडचे असले तरी हे वाचनालय १६५ वर्षे जुने आहे. या ग्रंथप्रेमी व ऐतिहासिक मौल्यवान वस्तूंचा संग्रह करणाऱ्या महिलेस यंदाचा मेसिंजर ग्रंथालय पुरस्कार जाहीर झाला आहे.
मेलिसा यांनी या वाचनालयातून विद्यापीठाचा इतिहास व प्रतिमा जिवंत ठेवली आहे. नेतृत्व, सर्जनशीलता या गुणांच्या आधारे त्यांनी फार मोठे काम उभे केले आहे. ग्रंथालय नूतनीकरण, मासिक वाचन विभाग, नवीन संकेतस्थळ, डिजिटल वाचनालय असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. त्यांनी जुने व नवे असे दोन्ही प्रकारचे ग्रंथ व इतर संग्राहय़ वस्तू, कात्रणे, दस्तावेज व चित्रे जपली आहेत. १९९८ ते २००० दरम्यान त्यांनी अनेक नूतनीकरण प्रकल्प राबवले. २०१० मध्ये त्यांची डिजिटल प्रकल्प संशोधन केंद्राच्या संचालक म्हणून नेमणूक झाली. नंतर २०१२ मध्ये त्या केल विद्यापीठाच्या संग्रहालय प्रमुख बनल्या. याच विद्यापीठातील मेरी अ‍ॅन मावरिनॅक व अँड्रय़ू एच तसेच जॅनेट डेटन नीली यांच्या कार्यशैलीचा परिणाम त्यांच्यावर आहे. शिक्षक, विद्यार्थी, प्रशासक जी माहिती मागतील ती ते वाचनालयातून अगदी कमी काळात उपलब्ध करून देतात. गुगलगुरूच्या जमान्यात माहिती म्हटली की, गुगलच सर्व काही आहे, अशी प्रतिमा असली तरी जे केवळ गुगलवर अवलंबून राहतात त्यांचे लेखन व संशोधन इतरांपेक्षा वेगळे ठरत नाही. त्यामुळे आज फार थोडय़ा ठिकाणी कात्रण संग्रह, पुस्तकांची जपणूक वगैरे गोष्टी केल्या जातात. वाचन म्हणजे गुगल असाही काहींचा गैरसमज झालेला आहे, अशा काळात मेलिसा यांचे काम अनेकांची उमेद वाढवणारे आहे. वीस वर्षे त्यांनी या वाचनालयात काम केले आहे. अगदी विद्यापीठातील बाहेरच्या विद्वान व संशोधकांनाही त्या संशोधन साहित्य बिनचूक शोधून देतात. नव्या तंत्रयुगातही त्या मागे नाहीत. त्यांनी सर्व छायाचित्रांचे डिजिटलायझेशन केले आहे. ‘आस्क द अर्किव्हिस्ट’ असा एक स्तंभच त्या चालवतात, त्यात वाचकांची आवड बघून पुस्तकांची शिफारस करतात.