मायकल एलियट हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील अध्यापनाचे क्षेत्र सोडून तीन दशकांपूर्वी पत्रकारितेकडे वळले होते. असे व्यवसायान्तर काही जण करतात, पण ते यशस्वी होतातच असे नाही. एलियट मात्र पत्रकारितेत कमालीचे यशस्वी झाले. पत्रकारितेत आल्यानंतर बडय़ा व्यक्तींना भेटता येते, अनेक महत्त्वाच्या घटनांचे जवळून साक्षीदार बनता येते हे त्यांच्या बाबतीत खरे होते, कारण ते आंतरराष्ट्रीय स्तरावर वावरलेले पत्रकार होते.

अशी संधी फार कमी लोकांना मिळते. अनेक नियतकालिकांवर लेखनशैलीचा व अनुभवाचा ठसा उमटवणाऱ्या या पत्रकाराचे नुकतेच निधन झाले. ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये प्राध्यापकी करतानाच त्यांनी लंडनच्या ‘इकॉनॉमिस्ट’ या नियतकालिकातून पत्रकारिता सुरू केली. अर्थशास्त्र व त्याभोवती फिरणारे राजकारणही चांगले ज्ञात होते. त्यामुळेच त्यांचा ‘बॅजहॉट’ हा स्तंभ गाजला. त्या काळातील राजकीय घटनांचे विश्लेषण त्यांनी त्यात केले होते. अमेरिकेत आल्यानंतरही त्यांनी स्तंभलेखन सुरूच ठेवले. ‘टाइम’, ‘न्यूजवीक’ व ‘दी इकॉनॉमिस्ट’ या नावाजलेल्या नियतकालिकांत पत्रकारितेचा अनुभव त्यांनी घेतला. अमेरिकेतील राजकारणाबाबत त्यांचा ‘लेक्सिंगटन’ हा स्तंभ विशेष गाजला होता. ‘न्यूजवीक’मधून ते ‘टाइम’चे आंतरराष्ट्रीय आवृत्ती संपादक झाले. हाँगकाँगचे हस्तांतरण, दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बैठका, अमेरिकेतील निवडणूक यांच्या वार्ताकनाशिवाय दक्षिण आफ्रिकेचे नेते नेल्सन मंडेला यांची भेट व बिल क्लिंटन-हिलरी क्लिंटन यांच्यावरील लघुपट, २००४ मधील आशियन सुनामीचे साक्षीदार अशी त्यांची पत्रकार म्हणून नजरेत भरणारी कामगिरी. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी त्यांना ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ पदक दिले होते.

संपादक म्हणून ते सर्वाच्या कल्पना विचारात घेत. शांतपणे ऐकत, त्यांच्यात एक शिक्षक दडलेला होता. त्यामुळे त्यांनी संपादकांची एक पिढीच घडवली. ‘टाइम’मध्ये असताना त्यांनी किमान २० मुखपृष्ठ लेख लिहिले होते. त्यांनी २००४ मधील आशियन सुनामी थायलंडमधील फुकेट येथील हॉटेलच्या खोलीतून पाहिली, तेथून वृत्तांकन केले. २०११ मध्ये त्यांनी पत्रकारिता सोडली व गरिबांसाठी गायक बोनो याने स्थापन केलेल्या ‘वन कॅम्पेन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. एलियट यांचा जन्म इंग्लंडमधील लिव्हरपूलमध्ये १९५१ मध्ये झाला. त्यांचे शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले. शिक्षण क्षेत्रातून पत्रकारितेत ते आले, तेव्हा पैसा कमी मिळेल, जीवनाची मजा व अनुभव जास्त मिळेल, असे त्यांना संपादकांनी सांगितले होते, पण काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी या दोन्ही गोष्टी मिळवल्या. कर्करोग झाला, तेव्हा त्यांची लढाई काळाशी होती. त्यामुळे जीवनाचा अर्थ त्यांना अधिकच सखोलपणे उमगला होता. अनेक वंचितांना आवाज मिळवून देण्याचे पत्रकारितेचे मूळ ध्येय त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत पाळले.