20 October 2017

News Flash

मायकेल ग्रॅटझेल

रशियातील गॅझप्रॉम, एफएसके येस व सुप्रगुटनेझ या कंपन्यांकडून हा पुरस्कार दिला जातो.

लोकसत्ता टीम | Updated: April 10, 2017 3:01 AM

मायकेल ग्रॅटझेल

जगात काळानुसार ऊर्जेची मागणी वाढत चालली आहे, तर दुसरीकडे हायड्रोकार्बन इंधने फार काळ पुरणारी नाहीत; शिवाय त्यांच्यामुळे प्रदूषणही मोठय़ा प्रमाणात होत आहे. इ.स.२०५० पर्यंत ऊर्जेची मागणी ५० टक्क्य़ांनी वाढलेली असेल. ऊर्जेचे वहन, साठवणूक व पर्यावरणावर परिणाम अशी अनेक आव्हाने या क्षेत्रात आहेत. या परिस्थितीत नवीन ऊर्जा तंत्रज्ञानाचा शोध वैज्ञानिक घेत आहेत. त्यातीलच एक मोठे नाव म्हणजे मायकेल ग्रॅटझेल. मूळ जर्मनीच्या असलेल्या  ग्रॅटझेल यांना २०१७चा जागतिक ऊर्जा पुरस्कार जाहीर झाला आहे.

रशियातील गॅझप्रॉम, एफएसके येस व सुप्रगुटनेझ या कंपन्यांकडून हा पुरस्कार दिला जातो. ग्रॅटझेल यांची महत्त्वाची कामगिरी म्हणजे त्यांनी ग्रॅटझेल सेल (विद्युतघट) तयार केला आहे. तो प्रकाशसंवेदनशील मूलद्रव्यांवर आधारित आहे. महागडय़ा सिलिकॉन सोलर सेलला त्यांनी पर्याय शोधला. २००९ मध्ये ग्रॅटझेल सेलची निर्मिती पहिल्यांदा करण्यात आली. जागतिक ऊर्जा पुरस्कार पर्यायी ऊर्जा साधनांवर संशोधनासाठी दिला जातो. आतापर्यंत १५ वर्षांत ३४ वैज्ञानिकांना हा पुरस्कार मिळाला आहे. ग्रॅटझेल हे स्वित्र्झलडमधील लॉसेनच्या पॉलिटेक्निक संस्थेत काम करतात. इलेक्ट्रॉन ट्रान्सफरवर आधारित अभिक्रिया व त्यातून ऊर्जेचे रूपांतर हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. फोटो व्होल्टॅइक सेल व फोटो इलेक्ट्रोकेमिकल यंत्रणा यांचा वापर करून त्यांनी पाण्याचे हायड्रोजन व ऑक्सिजनमध्ये विघटन केले तर कार्बन डायॉक्साइडचे प्रमाण सूर्यप्रकाशाच्या मदतीने कमी करण्याचा प्रयोग यशस्वी केला. लिथियम आयन बॅटरीजमध्ये विद्युत साठा वाढवण्यासाठी त्यांनी नवीन तंत्रज्ञान विकसित केले. नॅनोक्रिस्टलाइन ऑक्साइड फिल्मचा वापर करून त्यांनी नवीन सोलर सेल तयार केला. त्यात झाडांच्या पानातील प्रकाशसंश्लेषण अभिक्रियेची नक्कल केली होती. रंग संवेदनशील सोलर सेल त्यांनी तयार केले. त्यांची कार्यक्षमता २२ टक्क्य़ांहून अधिक आहे, ती पॉलिक्रिस्टलाइन सिलिकॉन सोलर सेलपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. रासायनिक-भौतिकशास्त्रीय तत्त्वांचा वापर करून त्यांनी नवीन सोलर सेल व बॅटरीजची निर्मिती केली. ग्रॅटझेल यांचे कार्यक्षेत्र स्वित्र्झलड असले, तरी त्यांचा जन्म १९४४ मध्ये जर्मनीतील डॉर्फशेमिन्झ येथे झाला. ते बर्लिन तंत्रज्ञान विद्यापीठाचे डॉक्टरेट असून असंख्य संस्थांच्या मानद डॉक्टरेट पदव्या त्यांच्याकडे आहेत. १९८८ मध्ये त्यांनी ब्रायन ओ रिगन यांच्याबरोबर ग्रॅटझेल सेलची निर्मिती केली. त्याचबरोबर लिथियम आयन बॅटरीत नॅनोपदार्थाचा वापर सुरू केला. त्यांच्याकडे ८० पेटंट असून ९०० शोधनिबंध व दोन पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. कॉर्नेल विद्यापीठ व सिंगापूरच्या नॅशनल टेक्निकल युनिव्हर्सिटीत ते अभ्यागत प्राध्यापक आहेत. बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात तसेच चीनच्या ग्वांगझांग विद्यापीठात त्यांनी अध्यापन केले. त्यांच्या संशोधनाचे संदर्भ १ लाख ९० हजार वेळा इतरांनी घेतले असून त्यांचा एच निर्देशांक १९३ आहे. जगातील पहिल्या दहा रसायनतज्ज्ञांत त्यांचा क्रमांक आहे. मिलेनियम २००० युरोपीयन नवता पुरस्कार, फॅरेडे पदक, डच हॅविंगा पुरस्कार, इटाग्लास पुरस्कार, गेरीशर व हार्वे पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ऊर्जा तंत्रज्ञानात कार्यक्षमतेच्या संदर्भात सुधारणा करताना त्यांनी नॅनो तंत्रज्ञानाचा केलेला वापर हे त्यांचे वेगळे वैशिष्टय़ असून एलन मस्क यांच्यासारख्या जबरदस्त वैज्ञानिक उद्योगपतीचे आव्हान समोर असताना त्यांना मिळालेला जागतिक ऊर्जा पुरस्कार हा नक्कीच त्यांचा वेगळेपणा सिद्ध करणारा आहे.

First Published on April 10, 2017 3:01 am

Web Title: michael graetzel