विश्वाचे स्पंदन ऐकून अथांग अवकाशात कुठे तरी असलेल्या प्रगत-अप्रगत अवस्थेतील जीवसृष्टीचा वेध घेण्याची आस जगातील सर्वच देशांना आहे. जगातील ‘फाइव्ह हंड्रेड मीटर अ‍ॅपर्चर स्पेरिकल टेलिस्कोप’ (फास्ट) ही सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण उभारणाऱ्या चीनच्या आशाही हा शोध सर्वप्रथम लावण्यासाठी उंचावल्या असतील तर नवल नाही, पण या आशेला मूर्तस्वरूप देण्याचे काम चीनचे खगोलशास्त्रज्ञ, संशोधक तसेच अभियंता डॉ. नान रेन्डाँग यांनी केले होते. त्यांचे नुकतेच निधन झाल्याने खगोलशास्त्र संशोधनात चीनला एका वेगळ्या क्षितिजावर नेणारा वैज्ञानिक हरपला आहे.

चीनच्या गुझाऊ प्रांतात उभारण्यात आलेल्या या रेडिओ दुर्बिणीचे काम गेली अनेक वर्षे सुरू होते. फुप्फुसाचा कर्करोग झाल्याने करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेत नान यांचा ध्वनिरज्जूही तुटला होता. त्यामुळे बोलता येत नसतानाही अवघड परिस्थितीत ते या दुर्बिणीच्या कामासाठी ये-जा करीत असत. बावीस वर्षांच्या तपश्चर्येनंतर सर्वात मोठय़ा रेडिओ दुर्बिणीचे काम पूर्ण झाले. कधीही साधारण दर्जाचे काम करू नका, असा त्यांचा मूलमंत्र होता. त्यांनी ही रेडिओ दुर्बीण कुठे, कशी उभारायची या सगळ्याचे नियोजन अचूकपणे केले. ‘फास्ट’ दुर्बिणीमागे सर्वात मोठे शक्तिस्थान तेच होते. तरीही, ‘विज्ञानात मला रस नाही,’ असे ते एकदा म्हणाले होते. अनेकांना ते गमतीने तसे म्हणाले असावेत असे वाटले, पण तसे नव्हते. कारण त्यांचे सगळे आयुष्यच त्यांनी अभियंता म्हणून काम केले होते. त्या ज्ञानाचा फायदा त्यांनी विज्ञान प्रगतीसाठी करून दिला हे त्यांचे वेगळेपण.

त्सिंगहुआ विद्यापीठात अगदी पदवी पातळीवर शिक्षण घेत असतानाच त्यांना उच्च कंप्रतेशी संबंधित इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाची गोडी होती; त्यातूनच या दुर्बीण प्रकल्पात काम करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. चीनमध्ये जी सांस्कृतिक क्रांती झाली त्या वेळी तर ते एका इलेक्ट्रॉनिक कारखान्यात दहा वर्षे काम करीत होते. नंतर ते अध्यापन व संशोधनाकडे वळले. खगोलशास्त्र व खगोलभौतिकीत चीनच्या हेफेई शहरात असलेल्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठातून पीएच.डी. करूनही अतिशय साधे जीवन ते जगले. पैसा-कीर्ती अशा कुठल्याही भौतिक लालसा त्यांना नव्हत्या. त्यांच्या प्रयत्नातून एक महाकाय यंत्र जन्माला आले याचा त्यांना जराही अभिनिवेश नव्हता. आज मल्टिटास्किंगच्या गप्पा केल्या जात असल्या तरी कुठलीही व्यक्ती एका वेळी एकाच क्षेत्रात तज्ज्ञता प्राप्त करू शकते.. पण नान यांना रेडिओ दुर्बिणीशिवायही अनेक कौशल्ये ज्ञात होती. त्यांना दृश्यकला अवगत असल्याने ‘फास्ट’ या दुर्बिणीचे ओळखचिन्हही त्यांनी तयार केले होते. ‘फास्ट’ दुर्बिणीचे काम १९९४ मध्ये सुरू झाले होते. त्यात त्यांचे अनेक विद्यार्थी काम करीत होते. त्यामुळे रेडिओ खगोलशास्त्रज्ञांची पुढची पिढी घडवण्याचे कामही त्यांनी केले. चीनने बनवलेली ही सर्वात मोठी दुर्बीण चीनची ‘स्वदेशी’ आहे.

नान रेन्डाँग हे तीन वर्षे जपानमधील राष्ट्रीय वेधशाळेत प्राध्यापक होते. तेथे त्यांना मायदेशात वर्षांला मिळणारे वेतन एका दिवसाला मिळत होते. असे असतानाही देशाला गरज असताना ते परत आले व रेडिओ दुर्बिणीच्या प्रकल्पाचे नेतृत्व हाती घेतले. त्यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या दुर्बिणीच्या मदतीने विश्वातील पल्सार म्हणजे स्पंदक तारे, कृष्णविवरे, न्यूट्रॉन तारे अशा असंख्य घटकांचा वेध घेता येणार आहे. चीनला अवकाशावर नजर ठेवणारा महानेत्रच त्यांनी प्राप्त करून दिला आहे.