भारतीय प्रशासकीय सेवेतून पुढे अमेरिकेत भारतीय राजदूत म्हणून गेलेले नरेश चंद्र यांची स्मृतीच त्यांच्या निधनानंतर आता राहील, ती केवळ राजनैतिक अथवा प्रशासकीय अधिकारी म्हणून नव्हे.. भारताच्या धोरणांमध्ये सातत्य राखणारा, प्रसंगी त्यांना आकारही देणारा एक धुरीण म्हणून नरेश चंद्र यांची ओळख अमीट राहील. गोव्यातील एका रुग्णालयात त्यांचे रविवारी रात्री निधन झाल्याची वार्ता सोमवारी पोहोचल्यानंतर पक्षभेद विसरून सारेच हळहळले, ते या धुरीणत्वामुळे.

अमेरिकेतील भारतीय राजदूत (१९९६- २०११) हे त्यांनी भूषविलेले सर्वोच्च पद. ते या पदावर असतानाच १९९८ मध्ये भारताने ‘पोखरण-२’ अणुचाचणी केली. या चाचणी अणुस्फोटांनंतर अमेरिकेने भारताला वाळीत टाकण्याचा विडाच उचलला होता. तशाही स्थितीत त्यांनी वॉशिंग्टन, न्यू यॉर्क व अन्यत्र भेटीगाठींचे सत्रच आरंभले आणि अखेर, तेव्हाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची अमेरिका-भेट ठरल्याप्रमाणे होईल, या दौऱ्यात वाजपेयी आणि तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची चर्चा होईल, इतपत स्थिती पूर्वपदावर आणण्यात ते यशस्वी झाले. र्सवकष अणुचाचणी बंदी करारापुढे भारताने मान तुकवावी, हा क्लिंटन-आग्रह नम्रपणे नाकारतानाच ‘शांततामय अणुवापरासाठी अमेरिकेचे सहकार्य भारताला हवेच आहे’ अशा शब्दांत भारत-अमेरिका अणुसहकार्य कराराचे पूर्वसूर वाजपेयींनी आळवले.. पुढे अगदी अलीकडे दिल्लीतील एका पुस्तक-प्रकाशन सोहळ्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आवर्जून उल्लेख केला – ‘‘भारताच्या अणुधोरणाची वाटचाल ठरवण्यात आणि ती सशक्त करण्यात त्या वेळचे नरेश चंद्र यांच्यासारखे अधिकारी उपयुक्त ठरले होते.’’

Pm narendra modi, race course,
पुणे : साडेचार दशकांनंतर रेसकोर्सवर पंतप्रधानांची सभा, भाजपतर्फे नियोजन सुरू, पोलिसांकडूनही स्थळाची पाहणी
Uddhav Thackeray criticize Prime Minister Narendra Modi in amravati
“मोदी म्हणजे काळजीवाहू पंतप्रधान, ते आता गल्‍लीबोळात फिरताहेत कारण…”, उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांवर कठोर टीका
PM Modi Ramtek Sabha
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, “इंडिया आघाडीला त्यांच्या पापाची शिक्षा…”
Former District Congress President Prakash Devtale joins BJP
जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

अणुकरारांपायी वादग्रस्त ठरलेल्या सिंग यांचे ते वक्तव्य प्रेक्षकांतून ऐकणाऱ्या नरेश चंद्र यांच्या चेहऱ्यावर तेव्हा नेहमीचेच दिलखुलास स्मितहास्य होते- पण काही जणांच्या मते ते अधिक खुलले होते! जणू एखाद्या जिंदादिल मित्राचा भास व्हावा, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. कपाळावर आठय़ा, पण चेहऱ्यावर स्मितहास्य ही त्यांच्या चेहऱ्यातली किमया. याच बळावर त्यांनी वाटाघाटींत अनेकांना जिंकले. हेतू स्पष्ट असेल तर कोणतेही काम तडीस गेलेच पाहिजे, असा त्यांचा खाक्या. त्यातून १९९१-९२ मध्ये, म्हणजे भारतीय आर्थिक धोरणात ‘खासगीकरण उदारीकरण जागतिकीकरण’ यांचा प्रवेश होत असताना केंद्रीय कॅबिनेट सचिव असलेल्या नरेश चंद्र यांनी नोकरशाहीच्या मनोभूमिकेत बदल घडवून आणला होता, अशी ग्वाही आज अनेक जण देतात.

अमेरिकी भारतीयांनी चालविलेल्या एका नियतकालिकासाठी राजदूतपदाची कारकीर्द संपत असताना त्यांनी छोटेखानी लेख लिहिला, त्यात ‘जिल्हाधिकारी या पदावर काम करणे सर्वात आव्हानदायी’ अशी कबुली देऊन नरेश चंद्र यांनी ‘आयएएस’चा घरंदाजपणा दाखवून दिला होता. राजस्थान केडरचा भाग म्हणून १९५६ ते ६४ असा काळ ते राज्यात होते, तर १९६५ पासून केंद्र सरकारमध्ये शेती, सहकार, प्रशासकीय सुधारणा आदींची कामे हाताळण्याचा अनुभव ते घेत होते. १९७३ नंतर राजस्थानात परतून, उद्योग सचिव आणि पुढील जबाबदाऱ्या हाताळत १९८४ मध्ये ते राजस्थानचे अर्थसचिव झाले. काश्मीरमधील नेमणूक त्यांनी १९८६ मध्ये स्वीकारली आणि केंद्रीय संरक्षण खात्याचे सचिव या पदावर १९८९-९० असे वर्षभर कामगिरी बजावून केंद्रीय गृहसचिवपदाची सूत्रे त्यांनी हाती घेतली. कॅबिनेट सचिवपद दोन वर्षे सांभाळून, १९९२ पासून ते पंतप्रधानांचे वरिष्ठ सल्लागार झाले. पुढे गुजरातचे राज्यपालपदही काही महिने त्यांच्याकडे आले. पण नरेश चंद्र यांची छाप याखेरीजही दिसली ती प्रशासकीय सुधारणा, अंतर्गत सुरक्षा आणि संरक्षण यांविषयीच्या समित्यांचे प्रमुख म्हणून त्यांनी केलेल्या सूचनांमधून. त्यापैकी काही सूचना आजही लागू करण्याची गरज असल्याचे अनेक जण सांगतात. यातून जाणवणाऱ्या द्रष्टेपणावर, २००७ मध्ये त्यांना मिळालेल्या ‘पद्मविभूषण’ने शिक्कामोर्तबच केले होते.