तिबेटचे नाव घेतले की डोळ्यासमोर येतात तिबेटींचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा, दडपशाहीच्या मार्गाने चिरडून टाकलेली तिबेटमधील चळवळ आणि १९५९ पासून दलाई लामा यांना भारताने दिलेला आश्रय. याच तिबेटमधील होते अर्किद गवांग थोंडुप. अत्यंत विद्वान, व्यासंगी लेखक व राजकीय नेते. १० मार्च १९५९ मध्ये तिबेटमध्ये झालेल्या उठावातील अग्रणी.. तिबेटींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वाने सोमवारी या जगाचा निरोप घेतला.

८८ वर्षीय थोंडुप हे तत्कालीन ल्हासा सरकारच्या सेवेत होते. दलाई लामांसोबत तिबेटीच्या स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतल्याबद्दल त्यांना परागंदा व्हावे लागले. या काळात दलाई लामा यांच्या खासगी कार्यालयात तसेच तिबेटींच्या केंद्रीय कार्यालयात त्यांनी विविध पदे सांभाळली. नंतरचा काही काळ ते अध्यापनाच्या क्षेत्रात रमले. अमेरिका आणि जपानमधील विद्यापीठांत ते प्राध्यापक होते. आताचे दलाई लामा हे १४ वे लामा आहेत. १९८४ ते २००४ या काळात ते दलाई लामांचे अधिकृत चरित्रकार होते. त्यानंतर २००५ पासून दलाई लामा यांच्या कार्यालयात तिबेटी भाषा आणि साहित्य या क्षेत्रांत ते सल्लागार म्हणून कार्यरत होते.

तिबेटी टंकलेखनाचे जनक ही त्यांची एक महत्त्वाची ओळख. रेिमग्टन ही एके काळची टंकलेखनातील विख्यात कंपनी. सुमारे ७० वर्षांपूर्वी, म्हणजे १९४८ मध्ये थोंडुप यांनी तिबेटी भाषेतील रेमिंग्टन रॅण्ड हे टंकलेखन मशीन विकसित केले. धरमशाला येथील ग्रंथालयास तिबेटी भाषेतील कागदपत्रे टंकलिखित करण्यासाठी या मशीनचा खूप वापर झाला. नंतर १९७६ मध्ये रेिमग्टन कंपनीने कलकत्ता येथे अशा प्रकारच्या टंकलेखन मशीनचे उत्पादन सुरू केले. तिबेटी साहित्याचा त्यांचा अफाट व्यासंग होता. तिबेटी भाषेतील प्रकांडपंडित गेदून चॉफेल यांचे ते शिष्य होते. तिबेटी भाषा आणि संस्कृती यावर थोंडुप यांनी अनेक पुस्तके तसेच अभ्यासपूर्ण लेख लिहिले.

१९४२ ते ४८ या काळात ल्हासा येथील पोताला महाविद्यालयातून त्यांनी पदवी मिळवली. तिबेटी सरकारच्या सचिवालयात मग त्यांची नियुक्ती करण्यात आली. १९५२ ते ५७ या काळात ते पेकिंग मायनॉरिटी स्कूलमध्ये अगोदर विद्यार्थी होते आणि नंतर तेथेच त्यांनी तिबेटी भाषेचे अध्यापक म्हणूनही काम केले. याच काळात त्यांनी चीनच्या राज्यघटनेचा तिबेटी भाषेत अनुवाद करण्याचा प्रकल्प तडीस नेला. १९५९ मधील ल्हासा येथील उठावानंतर त्यांनाही परागंदा व्हावे लागले. विजनवासातील तिबेटी सरकारमध्ये थोंडुप सहभागी झाले. परराष्ट्र मंत्रालयात सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. विजनवासातील तिबेटी संसदेचे ते दोन वर्षे महासचिव तसेच परराष्ट्र मंत्रालयाचे आठ वर्षे ते महासचिव होते. नंतर १९८० मध्ये मिशिगन विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळविली. यानंतर त्यांनी दोन वर्षे इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण घेतले. पुढे इंग्रजी साहित्याचा सखोल अभ्यासही केला. २००९ मध्ये मग मिशिगन विद्यापीठाने थोंडुप यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली. विविध जबाबदाऱ्या पेलताना त्यांनी वाचन आणि लेखनाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. जपान व अमेरिकेतील त्यांचे अनेक विद्यार्थी त्यांच्याशी नेहमी संपर्कात असत. वयोमानानुसार अलीकडे ते थकले होते. त्यांच्या निधनाने तिबेटी भाषेचा निस्सीम उपासक हरपला आहे..