फॉम्र्युला-वन शर्यतीच्या यंदाच्या मोसमात अपेक्षितच निकाल पाहायला मिळाला. मोसमातील अखेरच्या शर्यतीत म्हणजेच अबु धाबी येथे मर्सिडीज संघाचा निको रोसबर्ग दुसऱ्या स्थानी आला, परंतु सरस गुणांच्या जोरावर त्याने संघसहकारी लुईस हॅमिल्टनकडून विश्वविजेत्या शर्यतपटूचा मान हिसकावला. गेली दोन वर्षे हॅमिल्टनने निर्विवाद वर्चस्व गाजवताना फॉम्र्युला-वन शर्यतीत दबदबा निर्माण केला होता. २०१४ आणि २०१५ या मोसमात हॅमिल्टनने एकहाती विश्वविजेतेपद पटकावले; पण या दोन्ही मोसमांत त्याला रोसबर्गने कडवी टक्कर दिली. या वेळी रोसबर्गने सुरुवातीच्या चारही शर्यती जिंकून जेतेपदावर दावेदारी सांगितली होती. मात्र, त्यानंतर सलग आठ शर्यतींमध्ये त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही. त्याच्या या चढ-उतारांच्या प्रवासात हॅमिल्टनने संधी साधली. त्यामुळेच अबु धाबी येथील शर्यतीकडे सर्वाचे लक्ष लागले होते. या शर्यतीत रोसबर्गला दुसरे स्थान निश्चित करणे पुरेसे होते आणि ते त्याने निश्चित करून अवघ्या पाच गुणांच्या फरकाने विश्वविजेतेपदाचा मान पटकावला. त्याचे हे कारकीर्दीतील पहिलेच विश्वविजेतेपद ठरले.

घरातूनच निकोला फॉम्र्युला-वनचे बाळकडू मिळाले. वडील केके रोसबर्ग हे याच खेळातील १९८२ सालचे विश्वविजेते.. त्यांच्याकडूनच प्रेरणा घेत निकोने शर्यतपटू होण्याचा निर्धार केला. जर्मनीच्या ध्वजाखाली निको शर्यतीत सहभाग होत असला तरी कारकीर्दीच्या सुरुवातीला त्याने फिनलँडचे प्रतिनिधित्व केले. निकोकडे या दोन्ही देशांचे नागरिकत्व असून त्याचे पाच भाषांवर प्रभुत्व आहे. २००५ साली एआरटी संघाकडून खेळताना निकोने जीपी-२ शर्यतमालिकेचे जेतेपद पटकावले. त्यानंतर फॉम्र्युला ३ युरो सीरिजमध्ये वडिलांच्याच ‘रोसबर्ग’ संघातून पदार्पण केले. वर्षभरातच, वडील ज्या विलियम्स संघाकडून सहभागी होत त्याच संघातून तो स्पर्धेत उतरला. गेल्या दोन मोसमांत आलेले अपयश झटकून देण्यासाठी निकोने अथक मेहनत घेतली. आज सर्वात तंदुरुस्त शर्यतपटू म्हणून त्याची ओळख झाली आहे. मोसमातील पहिली शर्यत जिंकल्यानंतर निकोने दोन किलो वजन कमी केले. शर्यत नसतानाही सहनशक्ती वाढवण्यावर त्याचे मुख्य लक्ष होते आणि त्यासाठी दररोज धावणे, पोहणे आणि सायकल चालवणे ही त्याची मेहनत होती.

चार वर्षांनंतर निकोने नव्याने स्थापन झालेल्या मर्सिडीज संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. मर्सिडीजसोबतच्या सहा वर्षांच्या प्रवासात त्याने २३ स्पर्धात विजय आणि ३० वेळा शर्यतीचे अग्रस्थान पटकावले. त्याचबरोबर यंदा विश्वविजेतेपदाचा मानही नावावर केला. मोनॅको ग्रां.प्रि. स्पर्धा सलग तिसऱ्यांदा जिंकणारा आणि सलग सात शर्यतींत विजेतेपद पटकावणारा निको हा चौथा शर्यतपटू आहे. गेली दोन वष्रे लुईससोबत झालेले शाब्दिक द्वंद्व पाहता निको मर्सिडीज संघाला सोडणार असल्याच्या वावडय़ा सुरू होत्या, परंतु मर्सिडीजने २०१८ पर्यंत निकोच्या करारात वाढ करून त्यांना पूर्णविराम लावला.

.. आणि निकोनेही यंदा विश्वविजेतेपद पटकावून, मर्सिडीजचा निर्णय योग्य ठरवला आहे!