वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी सोसलेल्या फाळणीच्या घावांनी निदा फाज़ली यांना जगणे पाहायला लावले. ही शायरीची बीजे मीर तक़ी मीर आणि मिर्झा गालिबचे दीवान वाचून अंकुरली, फैज़ अहमद फैज़सारख्यांच्या तरक्कीपसंद शायरीने फुलली. पाकिस्तान नाकारून भारतात आलेल्या फाज्मली यांना इथल्या जगण्यासाठी अनंत मरणे कशी झेलायची हे जणू माहीत झाले.. मग ५४ व्या वर्षी- बाबरी मशीद उद्ध्वस्तीकरणानंतरच्या दंगलीतला अवमानही त्यांच्यातल्या सर्जनशीलतेला खचवणारा न ठरता उलट माणसांकडे अधिक जाणकारीने पाहायला लावणारा ठरला. कवी म्हणून शहाणीव वाढवणारा ठरला.
माणसाचा मूलभूत एकटेपणा, जीवनातल्या संकटांच्या अटळपणाची राजकीय कारणे आणि मानव्य धोक्यात आणणाऱ्या आधुनिकतेलाही पुरून उरलेले मानवी भावनांचे अभिजात सच्चेपण.. या साऱ्याचे साक्षात्कार झालेला आणि घडविणारा कवी म्हणून त्यांची वैश्विक ओळख त्यांच्या निधनानंतरही कायम राहील. १९९८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या ज्या ‘खोया हुआ सा कुछ’ या काव्यसंग्रहाला मिळाला, त्यातील दोहे व ग्मज्मलांतून ही शहाणीव दिसून येतेच; पण त्याआधी ज्या ‘कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता। कहीं जमीं तो कहीं आसमाँ नही मिलता’ या ओळींनी (चित्रपट : आहिस्ता आहिस्ता) त्यांना रसिकप्रियतेच्या पराकोटीला नेले, त्यातूनही कवी जगाचे श्रोतेपण स्वीकारून जगाचा आवाज बनतो म्हणजे काय, हे प्रत्ययाला येत होते. अशी अनेक अर्थगर्भ चित्रपटगीते, चित्रपटांत वापरल्या गेलेल्या ग्मज्मल लिहूनही ते शायरच राहिले. गीतकार म्हणून त्यांचा जीव रमला नाही. मात्र, राजकीय वा सामाजिक भाष्य करणारे काव्य लिहिणे हाही त्यांचा पिंड नव्हता. यातून जी मधली वाट त्यांनी पकडली, ती खरे तर राजकारण आणि त्याचे परिणाम यांचा उबग आलेल्या कुणालाही जवळची वाटावी अशीच.. माणूस म्हणूनच जगण्याची किंवा स्वत:लाही विसरण्याची (बेखुदी) वाट! ‘मंदिरों मे भजन मस्जिदों मे अजाँ, आदमी है कहाँ? आदमी के लिए एक ताज्मा ग़ज्मल, जो हुआ सो हुआ’ किंवा पाकिस्तानातून परतल्यानंतरच्या ‘हिंदू भी मजे में है मुसलमाँ भी मजे में। इन्सान परेशान है यहाँ भी वहाँ भी’ या ओळींतून त्यांच्या ‘माणुसकी’चा प्रत्यय यावा. हिंदू-मुस्लीम हे ‘ध्रुवीकरण’ किती फोल आहे याची संस्कृतीतूनच आलेली जाण त्यांच्या काव्याच्या भावार्थात आणि घाटातसुद्धा (शेर व दोहे हे दोन्ही) दिसते. काही कविता मुक्तछंदातही त्यांनी केल्या. मीरा, कबीर हे आध्यात्मिक संदर्भानिशी त्यांच्या काव्यात येतात आणि ‘तुम्ही सारे म्हणजे मी’ अशी विश्वरूप होऊन जगन्नियंत्याचे आर्त जाणण्याची भावनाही त्यांनी उत्तरायुष्यात काव्यबद्ध केली.
‘पद्मश्री’ (२०१३) व अन्य सन्मान त्यांना लाभले होते. त्यांच्या २४ पैकी पाच-सहा पुस्तके आजही उपलब्ध आहेत. आधुनिक युगात सूफीपणा कसा जपावा, याची शिकवण देण्याचे सामथ्र्य त्यांच्या शब्दांत चिरंतन राहणार आहे!