स्वातंत्र्योत्तर काळात पं. नेहरू यांना देशाची घडी नव्याने बसवायची असल्याने जसे राजकारणात त्यांनी विविध घटकांतील नेत्यांना आणले तसेच जगभरात मुत्सद्दी नेमतानाही गुणी आणि बुद्धिमान माणसे निवडली. त्या काळी नागरी सेवा परीक्षेत उत्तम गुण मिळूनही आयएएसपेक्षा आयएफएस केडरला अधिक महत्त्व दिले जात असे. व्ही के कृष्णन, टी एन कौल, के आर नारायणन, जे एन दीक्षित ते शिवशंकर मेनन असे एकापेक्षा एक कर्तबगार मुत्सद्दी आपल्याकडे झाले. या नामावलीत नेहरूंची विचारसरणी आणि त्यांच्या परराष्ट्र धोरणांनी कमालीचे प्रभावित झालेले निरुपम सेन यांचाही समावेश करावा लागेल.

पं. नेहरू यांनी देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली त्याच वर्षी, म्हणजे १९४७ मध्ये सेन यांचा कोलकाता येथे जन्म झाला. त्यांचे वडील सरकारी सेवेत बडय़ा हुद्दय़ावर कार्यरत होते. शालेय शिक्षण कोलकाता येथेच झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते दिल्लीत आले. इतिहास विषयाची आवड असल्याने आधी दिल्ली विश्वविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली. नंतर ते ऑक्सफर्डमध्ये गेले. भारतीय इतिहासाबरोबरच जागतिक इतिहासाचे अध्ययन केल्यानंतर ते भारतात परतले. १९६९ मध्ये नागरी सेवा परीक्षा ते पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले. त्यांच्या इच्छेनुसार विदेश सेवेत त्यांना सामावून घेण्यात आले. सुरुवातीची काही वर्षे परराष्ट्र मंत्रालयात विविध पदांवर त्यांची नियुक्ती झाली. तेथेच त्यांची कामावरची निष्ठा आणि त्यांची बुद्धिमत्ता वरिष्ठांच्या ध्यानात आली. महत्त्वाच्या बैठकीतही वरिष्ठांची भूिमका पटली नाही तर आपले विचार ते स्पष्टपणे आणि तितक्याच परखडपणे मांडत. सेन यांनी श्रीलंका, बल्गेरिया, नॉर्वे अशा महत्त्वाच्या ठिकाणी राजदूत म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी विजय नंबियार हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी कुणाची नियुक्ती करावयाची यावर बराच खल झाला. अनेक नावांची चर्चा झाली, पण अखेर सेन यांनाच तेथे पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला. २००४ ते २००९ अशी पाच वर्षे ते संयुक्त राष्ट्रांत होते. तेथील त्यांची शिस्तबद्ध कार्यपद्धती, तर्ककठोर आणि अभ्यासपूर्ण भाषणे याने जगभरातील मुत्सद्दी भारावून जात. संयुक्त राष्ट्रांतील कारभारात- विशेषत: आर्थिक आणि राजकीय बाबतीत- आमूलाग्र सुधारणा होण्याची गरज असल्याचे ते वेळोवेळी ठणकावून सांगत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची रचना आणि त्यांच्या कृतीवर तर ते नेहमी हल्ला चढवत. या परिषदेची सध्याची रचना जागतिक आव्हानांशी मुकाबला करण्यात अजिबात सक्षम नाही असे त्यांचे ठाम मत होते. ९/११ घडल्यानंतर जगाला भेडसावणाऱ्या दहशतवादाचा बीमोड कसा करता येईल यावर विचारमंथन करण्यासाठी दहशतवादविरोधी आंतरराष्ट्रीय अधिवेशन भरवण्यात त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता. २००९ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला. पण संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अध्यक्षांचे विशेष सल्लागार नेमून त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला. कोलकात्यात जन्म झाल्याने असेल ते विचाराने कम्युनिस्ट होते आणि ते त्यांनी कधी लपवूनही ठेवले नाही. नेहरूंचे ते चाहते असल्याने अलिप्ततावाद चळवळीचेही ते पुरस्कर्ते होते. याविषयी त्यांनी विपुल लिखाणही केले. निवृत्तीनंतर लोकांना फुकाचा उपदेश करीत फिरण्यापेक्षा ते सतत वाचनात मग्न असत. त्यांच्या निधनाने एक विद्वान आणि सचोटीचा मुत्सद्दी देशाने गमावला अशीच भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.