‘आपल्याला कायमच समस्यांना तोंड द्यावे लागेल. धार्मिक संघर्ष, सामाजिक बंधने ही तर कायम असतीलच, शिवाय लोकही मागे खेचण्याचा प्रयत्न करतील. अशा वेळी थोडा वेळ थांबून पुन्हा पुढे मार्गक्रमण करत राहायला हवे. हाच तर खरा पुढे जाण्याचा मार्ग आहे.’’ बांगलादेशातील प्रसिद्ध अशा ‘बेगम’ नियतकालिकाच्या संपादक नूरजहाँ बेगम यांचे हे वक्तव्य. ९१व्या वर्षांपर्यंत सक्रिय असणाऱ्या या संपादिकेचे नुकतेच निधन झाले. दक्षिण आशियातील महिला पत्रकारांमधील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असणाऱ्या नूरजहाँ बेगम या बांगलादेशातील पहिल्या महिला पत्रकार होत्या.
खास महिलांसाठी असणारे ‘बेगम’ हे नियतकालिक १९४७ मध्ये नूरजहाँ यांचे वडील मोहंमद नसिरुद्दीन यांनी स्वातंत्र्यपूर्व भारतातील कलकत्ता या शहरात सुरू केले. फाळणीनंतर १९५० मध्ये ‘बेगम’चे कार्यालय ढाका येथे नेण्यात आले आणि तेथूनच ते प्रसिद्ध केले जाऊ लागले. अवघ्या पंचविशीतच ‘बेगम’ची जबाबदारी आणि संपादकपद नूरजहाँ यांच्याकडे आले. नूरजहाँ यांनी ती जबाबदारी समर्थपणे पार पाडली.
५०च्या दशकात खास महिलांसाठी, तेही मुस्लीम महिलांसाठी, नियतकालिक प्रसिद्ध करणे हे तसे धैर्याचेच काम होते. असे असताना नूरजहाँ यांनी ‘बेगम’मध्ये अनेक महिलांना लिहिते केले. त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न, त्यांचे हक्क याविषयी लेखन करून ते सर्वासमोर मांडले. ‘बेगम’च्या माध्यमातून त्यांनी महिलांचा दृष्टिकोन बदलण्याचा नेहमीच प्रयत्न केला. नूरजहाँ यांचा जन्म ४ जून १९२४ मध्ये चांदपूरच्या चालितातोली गावात झाला. बेगम रोकिया यांनी स्थापन केलेल्या शिक्षणसंस्थेत त्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच स्त्रीवादाचे धडे गिरवले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. प्रसिद्ध साहित्यिक रोकान्जुमन खान तथा दादाभाई यांच्याशी १९५२मध्ये त्यांचा विवाह झाला. मात्र ‘बेगम’ सुरूच राहिले. एका मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, ‘मी माझे संपूर्ण आयुष्य ‘बेगम’लाच समर्पित केले आहे.’ आणि शेवटपर्यंत ‘बेगम’ला येणाऱ्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक समस्या सोडवून ते अखेरच्या श्वासापर्यंत सुरू ठेवून त्यांनी आपले उद्गार खरे करून दाखवले. त्यांच्या या कार्याचा गौरव वेळोवेळी विविध पुरस्कार आणि मानसन्मान देऊन करण्यात आला. धार्मिक दंगलींच्या काळात ‘बेगम’चा अंक काढणे मोठे आव्हान होते. शाई, पेपर मिळवण्यापासूनची कामे करावी लागत, त्यातच लेखिकांची संख्या नगण्य होती. छायाचित्रकार महिला तर एक-दोनच होत्या. अशा स्थितीतही प्रत्येक आठवडय़ाला ‘बेगम’चा अंक नूरजहाँ यांनी प्रसिद्ध केला. सत्तर वर्षांमध्ये ‘बेगम’चे पत्ते, देश बदलले, त्याचप्रमाणे स्वातंत्र्य युद्ध, बदलती राजसत्ता, बदलते छपाई तंत्रज्ञान अशा गोष्टीही नूरजहाँ यांची प्रगती, लिखाण याला खीळ घालू शकल्या नाहीत. ‘बेगम’मधून त्यांनी देशभरातील महिलांचे जीवन प्रकाशित केले.

satej patil
“बारक्यांनी नादाला लागू नका, कोणाला कधी चितपट करायचं…”, सतेज पाटलांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “या चौकात काठी घेऊन…”
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…