जागतिक शांततेसाठी झटणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या शांततेच्या नोबेल पुरस्काराला मोठा इतिहास आहे. गेल्या सुमारे दोन दशकांपासून दिला जाणारा सिडने शांतता पुरस्कारही आता जगभरात मान्यता मिळवत आहे, हे त्यातील काही माजी विजेत्यांची नावे नजरेखालून घातली तरी लक्षात येईल. तत्त्वज्ञ नॉम चॉम्स्की, आर्चबिशप डेस्मण्ड टुटू, गरिबांसाठी ग्रामीण बँक  सुरू करणारे प्रा. मोहम्मद यूनुस, ऑस्ट्रेलियातील पत्रकार जॉन पिल्गर आदी मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यंदा हा पुरस्कार मानवी हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ या चळवळीला जाहीर झाला आहे.

या चळवळीचा तपशील जाणून घेण्यासाठी अमेरिकी इतिहासाची काही पाने चाळावी लागतील. २०१२ मध्ये अमेरिकेत ट्रेव्हॉन मार्टिन या कृष्णवर्णीय तरुणाची हत्या झाली होती. मार्टिन आणि जॉर्ज झिमर्मन यांच्यात फ्लोरिडा येथे क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. नंतर झिमर्मन याने मार्टिनवर गोळ्या झाडून त्याला कायमचे संपवले. ही हत्या वंशविद्वेषातूनच झाली, असे काहूर तेव्हा उठले. झिमर्मनवर खटला चालला, पण नंतर स्वसंरक्षणार्थ त्याने गोळीबार केला असा निष्कर्ष काढून त्याला आरोपमुक्त करण्यात आले. त्यानंतर अमेरिकेत या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. आंदोलने, निदर्शने झाली, पण त्याचा उपयोग झाला नाही. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ ही मानवी हक्कांसाठी लढणारी चळवळ पॅट्रिस क्युलर्स, अ‍ॅलिशिया गार्झा आणि ओपल तोमेती या अमेरिकेतील तीन  तरुणींनी सुरू केली. ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ अशा हॅशटॅगचा वापर प्रथम गार्झा यांनी फेसबुकपोस्टद्वारे केला. ‘१७ वर्षांच्या मार्टिनचे जगणे कुणाला तरी खुपते याचेच मला आश्चर्य वाटते. वर्णाने काळे असले तरी माझे अशा सर्व लोकांवर प्रेम आहे,’ असे म्हणत वर्णविद्वेष आणि पोलिसी हिंसाचाराविरोधात तिने सुरू केलेल्या मोहिमेला अमेरिकेसह जगभरातून पाठिंबा मिळू लागला. सामाजिक विषमता, कृष्णवर्णीयांना मिळणारी अपमानास्पद वागणूक, कोणत्याही गुन्ह्य़ात प्रथम त्यांच्याकडेच संशयित म्हणून बघणे, पोलीस कोठडीत त्यांच्यावर होणारे अनन्वित अत्याचार या विरोधात ठिकठिकाणी त्यांनी जनजागृतीचे काम सुरू केले. कृष्णवर्णीयांना सामान्य माणसासारखे जगू द्या, असा या तिघींचा आग्रह होता. जगभरातील तरुणाई मग या चळवळीशी जोडली गेली आणि वर्णद्वेषातून कुणावरही अन्याय होत असल्याचे लक्षात येताच ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ चळवळीतील कार्यकर्ते सनदशीर मार्गाने आंदोलन करतात.

२०१४ मध्ये मायकेल ब्राऊन आणि एरिक गार्नर या दोन कृष्णवर्णीयांची अनुक्रमे फर्गसन आणि न्यूयॉर्क येथे हत्या झाली तेव्हा हा मुद्दा या चळवळीने हाती घेतला. फक्त अमेरिकेतच नव्हे तर जगभरातील माध्यमांनी अमेरिकी पोलिसांच्या दादागिरीवर तेव्हा प्रहार केला. गार्झा, पॅट्रिस आणि ओपल या तिघी जणींना आज जगभरात मान्यता मिळाली आहे. ‘‘वर्णद्वेषाविषयी तुम्ही बोलणे थांबवा, तुम्ही समाजात फूट पाडायचा प्रयत्न करीत आहात असे आम्हाला काही जण बजावत असतात. पण आम्ही ही चळवळ सोडणार नाही. माणसामाणसातील ही विषमता संपुष्टात यावी, कृष्णवर्णीयांनाही समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी आमचा लढा चालूच राहील,’’ असे गार्झा म्हणतात. ‘‘सिडने शांतता पुरस्कार जाहीर झाल्याने आनंद झाला आणि मानवी हक्कांसाठी चालू असलेल्या आमच्या  प्रयत्नांना बळही मिळाले’’, अशी भावना पॅट्रिस यांनी व्यक्त केली.