कथाप्रकाराला दुय्यम स्थान मानणाऱ्या साहित्यपटलावरील दांभिकांकडे दुर्लक्ष करीत निव्वळ एक कथा लिहिण्यासाठी कादंबरीइतकी दीड ते तीन वर्षांची मेहनत घेणारा लेखक अशी जॉर्ज सॉण्डर्स यांची ख्याती आहे. लेखन कारकीर्दीच्या ३० ते ४० वर्षांत त्यांनी ‘द न्यू यॉर्कर’मध्ये  फक्त २० कथा लिहिल्यात. बाकी हार्पर्स आणि शुद्ध साहित्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या तुरळक मासिकांमध्ये गद्यलेखन केले आहे. शिवाय ‘जीक्यू’ या मासिकासाठी त्यांनी लिहिलेले रिपोर्ताज गेले दशकभर पत्रकारितेतील उत्तम लेखनाचा नमुना म्हणून गाजत आहेत. लेखनातील चार दशकांची उमेदवारी संपल्यावर त्यांनी लिहिलेली पहिलीच कादंबरी ‘लिंकन इन द बाडरे’ यंदाचे बुकर पारितोषिक मिळवून गेली. त्याआधी हा पुरस्कार सॉण्डर्स यांनाच मिळेल यावर सर्वाधिक सट्टा लागला आणि बुकरच्या सर्व ठोकताळ्यांना सारत हाच लेखक सन्मानपात्र ठरला.

बुकरआधी नुसते कथालेखक किंवा मध्यम आकारातील लेखनासाठी सॉण्डर्स परिचित होते. पण त्यांचे अभ्यास आणि कामाचे मुख्य क्षेत्र लेखनाशी संदर्भात नव्हते. टेक्सासजवळच जन्म आणि जडणघडण झालेले सॉण्डर्स हे भूविज्ञानाचे पदवीधर. अमेरिकी कंपन्यांकडून सुमात्रामध्ये तेलखाणी शोधण्यासाठी जे पथक तैनात करण्यात आले होते, त्यात काही वर्षे त्यांनी लौकिकार्थाने नोकरी केली. एका मोठय़ा आंतरराष्ट्रीय पर्यावरण अभ्याससंस्थेत तांत्रिक लेखनाची धुरा त्यांनी सांभाळली. पण त्यांच्यातला कथालेखक तयार झाला तो याच कालावधीत त्यांनी एका विद्यापीठाची लेखन शिष्यवृत्ती मिळविल्यानंतर. टोबायस वुल्फ या कथालेखकाच्या वर्गात आणि त्यांच्याशी मैत्री केल्यानंतर या लेखकाने आपल्या लिखाणास गांभीर्याने घेतले. आलेल्या वैविध्यपूर्ण अनुभवांतून साकारलेल्या त्यांच्या लेखनात तिरकस आणि चपखल वर्णनांची गर्दी झालेली आढळते. अत्यंत संयतपणे त्यांच्या कथा बदलत्या अमेरिकी जाणिवांचा पट उभारतात. त्यांच्या उत्तर आधुनिक कथेतील वृद्ध, तरुण आणि लहान मुलांचा भवतालाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अपारंपरिक दिसतो. ‘सेम्पलिका-गर्ल डायरी’ ही एकमेव कथा उदाहरणासाठी घेतली तर त्यात भविष्यातील अमेरिकेतला एक बाप आपल्या पुढल्या पिढीसाठी त्याच्या काळातील काही नोंदी लिहून ठेवताना दिसतो. ही कथा वाचताना (द न्यू यॉर्करच्या अर्काइव्हवर ती पूर्ण उपलब्ध आहे.) त्यातील असाधारण कथावस्तू लगेच पकडून ठेवते आणि आताच्या प्रगत अमेरिकेतील भावनाशून्यता, गरीब-श्रीमंत दरी, वांशिक जाणिवा आणि असूया यांचा कोलाज दिसायला लागतो. साडेतीन वर्षे या एकाच कथेवर काम करणाऱ्या सॉण्डर्स यांच्या कारागिरी आणि मेहनतीचा दाखला कथेतील प्रत्येक परिच्छेदावर जाणवतो.

आपल्या लेखन प्रक्रियेबद्दल त्यांनी दिलेल्या विविध मुलाखती आवर्जून ऐकाव्यात, वाचाव्यात अशा आहेत. अमेरिकी मंदीकाळात जीक्यू (जंटलमन्स क्वार्टर्ली) मासिकाने त्यांच्यावर एक जबाबदारी सोपवली. मंदीमुळे रस्त्यावर आलेल्या, भणंग झालेल्या, घरदार गमावलेल्या व्यक्ती जागोजागी झोपडय़ा उभारून राहू लागल्या. या नवगरीब वर्गाच्या एका भल्यामोठय़ा आणि भीषण वस्तीत महिनाभर ओळख लपवून सॉण्डर्स यांनी रिपोर्ताज लिहिला. टेण्टसिटी नामक हा रिपोर्ताज आजही पत्रकारितेतल्या जगभरच्या विद्यार्थ्यांना आकर्षित करतो. कादंबरी लिहिणार नाही, असा पण सॉण्डर्स यांनी केला नव्हता. पण ती लिहिली तेव्हा बुकरची मोहोर लागल्याने आता हा लेखक माहिती नव्हता, त्या जगाला आणखी माहिती होणार आहे, हे नक्की.