मातीपासून सुंदर व रेखीव शिल्प करायचे, की या मातीचा रगडा करायचा हे सर्वस्वी शिल्पकाराच्या हातात असते, असे म्हणतात. त्याप्रमाणे क्रिकेट स्टेडियमवरील खेळपट्टीपासून रंगतदार खेळ निर्माण करायचा की दीड दोन दिवसांत कसोटी उरकण्यासारखी खेळपट्टी करायची, हे या खेळपट्टीचा जनक (क्युरेटर) ठरवित असतो. बऱ्याच वेळा घरच्या संघास अनुकूल खेळपट्टी करण्याकडे कल असतो किंवा त्या दडपणाखाली या क्युरेटरला खेळपट्टी करावी लागते. काही क्युरेटर मात्र खेळाडू कितीही मोठा असला तरी आपल्या तत्त्वास घट्ट पकडून वावरतात. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर उत्कृष्ट खेळपट्टीकार म्हणून नावलौकिक मिळविलेले प्रबीर मुखर्जी हे अशाच तत्त्वनिष्ठ क्युरेटरांच्या पंक्तीमधील संघटक होत.
बंगाल क्रिकेट संघटनेचे मुख्य प्रशिक्षक कार्तिक बोस यांनी मुखर्जी यांचा खेळपट्टीबाबतचा अभ्यास लक्षात घेऊन त्यांना १९८७ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याकरिता खेळपट्टी तयार करण्यासाठी पाचारण केले होते. कोणापुढे झुकणार नाही व आपल्या तत्त्वांशी ठाम राहण्याच्या वृत्तीमुळे ते काही वर्षे खेळपट्टी करण्यापासून दूर राहिले मात्र १९९६ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या वेळी खराब खेळपट्टीमुळे ईडन गार्डन्सवर भारतास श्रीलंकेकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर मुखर्जी यांच्याकडे या मैदानावरील खेळपट्टी तयार करण्याची जबाबदारी आली. तब्बल एकोणीस वर्षे त्यांनी जीव ओतून हे काम केले. खरंतर मुखर्जी हे फुटबॉलपटू होते. उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून त्यांचा दबदबाही होता. मात्र क्रिकेटच्या लोकप्रियतेमुळे ते क्रिकेटकडे वळले. मात्र नियतीला त्यांचा हा बदल मान्य नव्हता. छोटय़ाशा अपघातामुळे त्यांना क्रिकेट करीअरवर पाणी सोडावे लागले. तथापि त्यांनी क्रिकेटच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले. जगमोहन दालमिया यांच्यामुळे ते बंगाल क्रिकेट संघटनेच्या जवळ खेचले गेले. वैयक्तिक जीवनात त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. मुलीचे अपघाती निधन, पत्नीचे आकस्मिक निधन अशी संकटे येऊनही त्यांनी खेळपट्टीचे काम म्हणजे देवपूजाच आहे असे मानले व अव्याहत काम केले. मुखर्जी यांनी अकरा कसोटींसह अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांकरिता खेळपट्टय़ा तयार केल्या. सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा यांच्यासह अनेक खेळाडूंबरोबर अनुकूल खेळपट्टय़ा करण्यावरून त्यांचे मतभेद झाले. कोणत्याही खेळपट्टीवर प्रभाव दाखविण्याची शैली खेळाडूंनी आत्मसात केली तरच तो महान खेळाडू होतो, असेच त्यांचे मत होते. गांगुली यांच्याशी गतवर्षी मतभेद झाल्यामुळे त्यांनी पुन्हा कधीही ईडन गार्डन्सवर पाऊल ठेवायचे नाही असा निर्णय घेतला; एवढेच काय पण निधनानंतर आपले शव या मैदानावरदेखील आणू नये असे त्यांनी बोलून दाखविले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे नातलगही या इच्छेशी ठाम राहिले. असे तत्त्वनिष्ठ क्रिकेट संघटक क्वचितच दिसून येतात.