कॅनडात सैन्यदलातील माजी जवान व अधिकाऱ्यांच्या कल्याणासाठी झटणारी संस्था आहे. ‘रॉयल कॅनेडियन लीजन’ हे तिचे नाव. या संस्थेतर्फे त्यांना सन्मानाने आमंत्रित करण्यात आले. पण तेथे गेल्यावर मुख्य कार्यक्रम असलेल्या सभागृहात त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. आत जायचे असेल तर डोक्यावरील शीख फेटा (पगडी) काढूनच जावे लागेल असे त्यांना लष्करी थाटात सांगण्यात  आले.. हा अपमान सहन न झाल्याने त्यांनी अथक संघर्ष केला आणि ते यशस्वी झाले.. २३ वर्षांपूर्वी शिखांच्या सम्मानासाठी हा लढा देणारे होते लेफ्टनंट कर्नल प्रीतम सिंग जौहल!

जौहल यांचा जन्म पंजाबमधील एका छोटय़ाशा गावात झाला. पालकांना त्यांची जन्मतारीखही आठवत नव्हती. शाळेतील गुरुजींनीच ती ठरवली ४ ऑक्टोबर १९२०. हायस्कूल उत्तीर्ण होणारे गावातील ते तिसरे विद्यार्थी. त्यांचे वडील लष्करात असल्याने प्रीतम सिंग यांनाही लष्करातच जायचे होते. आईचा मात्र त्यास विरोध होता. १७ व्या वर्षी त्यांना दिल्लीतील एका नातेवाईकाकडे, ‘कुठल्या तरी ऑफिसात त्याला चिकटवून द्या’ अशा विनंतीसह पाठवण्यात आले. तेथेही वर्षभर ते बेकारच राहून, जून १९३८ मध्ये इंडियन सिग्नल कोअरमध्ये ते भरती झाले आणि त्याच्या दुसऱ्याच वर्षी दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले. रेडिओ ऑपरेटर म्हणून १९४० मध्ये पूर्व आफ्रिकेत इंडियन इन्फन्ट्री डिव्हिजनमध्ये त्यांना पाठवण्यात आले. तेथे पहिल्यांदा ते युद्धात सहभागी झाले. त्यांची ब्रिगेड लिबियात गेली आणि नंतर ती ब्रिटिश लष्कराचा भाग बनली. १९४२ मध्ये इजिप्तमध्ये जर्मन आक्रमण थोपवणाऱ्या तुकडीत ते वायरलेस ऑपरेटर होते. तेथून त्यांची तुकडी जपानशी लढण्यासाठी ब्रह्मदेशातही गेली. दुसरे महायुद्ध संपेपर्यंत ते सेकंड लेफ्टनंट हुद्दय़ापर्यंत पोहोचले होते. खूप आजारी पडल्याने तेथून मग ते मायदेशी परतले.  पण भारतीय लष्करात सेवा चालूच होती. पाकिस्तानविरुद्धच्या दोन्ही लढायांमध्ये प्रीतम सिंग यांचा सहभाग होता. काही काळ त्यांना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सेवेसाठीही पाठवण्यात आले होते. १९७६ मध्ये ते लेफ्टनंट कर्नल या पदावरून निवृत्त झाले आणि चंडीगढमध्ये स्थायिक झाले. त्यांची तीनही मुले कॅनडात असल्याने त्यांच्या आग्रहाखातर १९८० मध्ये तेही कॅनडातील सरे प्रांताचे रहिवासी बनले.

१९९३ मध्ये माजी जवानांच्या कार्यक्रमात हिजाब घालणाऱ्या महिलांना प्रवेश दिला जात होता, पण पगडी घालणाऱ्या पुरुषांना मात्र ती काढून यायला सांगितल्याने ते संतप्त झाले. महाराणीपर्यंत हा वाद गेल्यानंतर मात्र संस्थेने झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी तर व्यक्त केलीच पण आपल्या नियमांतही सुधारणा केली. विसाव्या शतकातील लष्करी जीवनाचा मोठा पट उलगडून दाखवणारे त्यांचे ‘अ सोल्जर रिमेंबर्स’ हे पुस्तकही लक्षणीय ठरले. ९६ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य लाभलेल्या प्रीतम सिंग जौहल यांनी दोन दिवसांपूर्वी अखेरचा श्वास घेतला.