‘झोळीवाले’ या शब्दाची, झोळीसारख्या शबनम बॅगा घेऊन फिरणाऱ्या कार्यकर्त्यांची टर उडवण्याचा प्रघात २५ वर्षांपूर्वी सुरू झाला, तेव्हा प्राध्यापक डॉ. के. गोपाल अय्यर पन्नाशीत असतील. पण कुठेही जाताना ही अशी झोळीवजा बॅग घेण्याची त्यांची सवय काही मोडली नाही. अन्य झोळीवाले हळूहळू जागतिकीकरणाच्या फायद्यांना सरावले, पण प्रा. अय्यर मात्र अखेपर्यंत १९७०पर्यंतच्या दशकांतील निष्ठावानांची आठवण करून देत राहिले. हे प्रा. अय्यर गुरुवारीच हृदयविकाराने वारले, अशी बातमी रविवारी समजली.

corruption in academic research
संशोधन कमी आणि बाजार जास्त!
mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई

‘ओरिसातल्या राऊरकेला या जिल्ह्य़ातील आदिवासी स्त्रियांना ‘स्वयंरोजगार’ मिळण्यासाठी वनसंपदेविषयीचे त्यांचे ज्ञानच उपयोगी पडले. पण या स्त्रियांकडे मजूर म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही’, ‘बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या काळात ‘कंत्राटी शेती’चा अनुभव कोणत्याही राज्यात चांगला नाही,’ असे शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांना माहीत असलेले निष्कर्ष प्रा. अय्यर यांनी साधार मांडले. या निष्कर्षांना सखोल अभ्यासाचा, त्या-त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन केलेल्या ‘फील्डवर्क’चा आणि समकालीन सामाजिक सिद्धान्तांचा आधार होता. अभ्यास आणि अनुभवजन्य विश्लेषणात कार्यकर्तेही कमी पडणारे नसतात, पण अय्यर यांनी हे कार्यकर्त्यांइतकेच सरस ज्ञान विद्यापीठीय शिस्तीच्या कोंदणात बसविले. ते स्वत: मात्र विद्यापीठाच्या चार भिंतीपल्याड- देशभर सर्वदूर पोहोचले होते. चंदिगढ विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचा ते आधारस्तंभ मानले जात. तेथून २००२ साली ते निवृत्त झाले, तरी त्यांचे काम सुरूच राहिले.. कारण ते नोकरीपुरते नव्हतेच! पुढे सिमल्याच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज’ने त्यांना प्रतिष्ठेची मानली जाणारी सदस्यवृत्ती (फेलोशिप) दिली. तिचा कालावधी दोन वर्षांचा असतो. पण ‘तिथे गेले की मनाजोगे काम करता येत नाही.. अडकल्यासारखे वाटते’ म्हणत प्रा. अय्यर परत आले.

ते अडकणारे नव्हतेच. स्वातंत्र्यपूर्व मद्रास प्रांतातला त्यांचा जन्म, पण पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले पाटणा विद्यापीठातून. तेथे समाजशास्त्रात सुवर्णपदक मिळाले, तरी परदेशांतील शिष्यवृत्त्यांचे आकर्षण प्रा. अय्यर यांना वाटले नाही. देशातच कधी आंध्र प्रदेश, कधी बिहार, ओरिसा, हरयाणा, पंजाब अशी भ्रमंती करीत ते अभ्यास वाढवीत राहिले. पंजाबात ते स्थिरावले चंदिगढ विद्यापीठामुळे. तेथील सहकारी मजेने अय्यर यांना ‘गोपालसिंग ब्रार’ म्हणत, इतके ते पंजाबी झाले. अर्थात पंजाबी भाषेइतकीच हिंदी, तमिळ आणि तेलुगूवरही त्यांची हुकमत होती. बहुभाषकत्वाचा उपयोग त्यांनी या भाषा बोलणाऱ्या राज्यांच्या तळागाळातील लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी वारंवार केला. या लोकसंपर्कातून, लोकांच्या अनुभव-समृद्धीतून जी ज्ञाननिर्मिती प्रा. अय्यर यांनी केली ती भारताच्या ‘विकासा’ची लक्तरे दाखविणारीच आहे. सामाजिकदृष्टय़ा इतके पूर्वग्रह असलेला, इतके सामाजिक पोटभेद असलेला हा देश ‘विकासा’पुरताच पूर्णत: वस्तुवादी कसा काय असू शकतो आणि असल्या अर्धवट वस्तुवादामुळे काय भीषण परिणाम होतात, याच्या कथा त्यांनी वेळोवेळी केलेल्या अभ्यासांमधून समोर येतात. कदाचित त्यामुळेच, हे अभ्यास आजही अप्रिय आहेत.

भाक्रा-नांगल धरणग्रस्तांचा अभ्यास, हा त्यांचा सर्वात अप्रिय निष्कर्ष मांडणारा संशोधन प्रकल्प. या धरणग्रस्तांचे खरे ‘पुनर्वसन’ झालेलेच नाही, तेथे आपल्या विकासाचा मानवी चेहरा धरणांना ‘आधुनिक मंदिरे’ म्हणण्यापुरताच राहिला, हे प्रा. अय्यर यांनी दाखवून दिले. कोयना, नर्मदा या प्रकल्पांच्या समाजशास्त्रीय परिणामांचे अभ्यास कसे असायला हवेत, याचा वस्तुपाठ प्रा. अय्यर यांच्या या कामातून आजही मिळेल. पाटणा, भुवनेश्वर, लखनऊ, गुवाहाटीत अशा कुठल्याही शहरातील चर्चासत्रांना सठीसामाशी चर्चक किंवा निबंधवाचक म्हणून दिसणारे प्रा. के. गोपाल अय्यर मात्र यापुढे दिसणार नाहीत.