‘पेशावरचे मूळ नाव पुष्पपूर. या शहराचा इतिहास गांधारकालीन आहे आणि तत्कालीन बौद्ध धर्माची छाप या शहराच्या इतिहासावर आहे’ याची आठवण पेशावरमध्येच जन्मलेले आणि ८८ वर्षांच्या आयुष्यातील उमेदीची सारी वर्षे पुरातत्त्व-अभ्यासात घालवून रविवारी जग सोडून गेलेले फिदाउल्ला सेहराई नेहमीच देत असत. पेशावर आणि या शहराचा इतिहास यांवरील त्यांचे प्रेम अमीट होते. ह्युएनत्संग (युआन श्वांग) हा चिनी प्रवासी पेशावरलादेखील इसवी सन ६३० मध्ये आला, तेव्हा या शहरात आता जेथे ‘गूंज गेट’ आहे, तेथे ४०० फुटी उंच स्तूप होता. हा स्तूप मुळात त्याही आधी दोनशे वर्षांपूर्वीचा- म्हणजे कनिष्क राजाच्या काळातला होता, अशा गोष्टी समोरच्याला ऐकण्यात रस असो वा नसो.. सांगताना फिदाउल्ला सेहराई- किंवा ‘प्रोफेसर’ सेहारई- रंगून जात!

स्वातंत्र्यपूर्व काळात, त्या वेळच्या स्वाबी प्रांतातील बगीचा धेरी येथे फिदाउल्ला यांचा जन्म १९२८ साली झाला. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर ते पेशावरच्या ‘इस्लामिया कॉलेज’ (आता इस्लामिया विद्यापीठ) येथे शिकले आणि तेथून थेट ब्रिटनमध्ये, लायसेस्टरच्या महाविद्यालयात संग्रहालयशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यास करण्यासाठी गेले. तेथून        परतले, तेव्हा पाकिस्तानचा जन्म झालेला होता. सिंधुसंस्कृतीचे तोवर ज्ञात असलेले सर्वाधिक मोठे अवशेष आता या नव्या देशात आले होते आणि पेशावरचा भाग मात्र तुलनेने दुर्लक्षित होता. या भागाच्या बौद्ध इतिहासाकडे आणि सहाव्या शतकापासूनच गांधार राजांचा पाडाव होऊ लागल्यानंतरही हे अवशेष आज कसे टिकले आहेत याकडे जगाचे लक्ष वेधणाऱ्यांत फिदाउल्ला यांचाही समावेश होता. अर्थात, त्या वेळी ते तरुण होते आणि याच भागातील दुसरे पुरातत्त्ववेत्ते अहमद हसन दानी (हे फिदाउल्लांपेक्षा वयाने आठ वर्षांनी मोठे, अभ्यासही दक्षिण आणि मध्य आशियाचा इतिहास, असा व्यापक) यांच्यापुढे फिदाउल्लांचे कर्तृत्व काहीसे झाकोळले गेले. १९७२ ते ८८ या काळात ते पेशावर संग्रहालयाचे संचालक होते. मात्र तरुणपणापासूनच्या त्यांच्या अभ्यासाची खरी फळे म्हणजे त्यांची भरपूर पुस्तके. अगदी पेशावर संग्रहालयाच्या ‘मार्गदर्शिके’पासून ते ‘पेशावरचा बौद्ध इतिहास’, ‘हुंड शहर आणि त्याचा बौद्धकाळ’ आदी विषयांवरील ही इंग्रजी पुस्तके आहेत.

हे हुंड शहर म्हणजे पूर्वीचे उदभांडपुरा. हे शहर गांधार राजांची राजधानी होते. ते व्यापारउदीमाचे केंद्रही होते. कनिष्काने थेट बोधगयेचा प्रवास करून तेथून आपल्या राज्यात आणलेला बोधीवृक्ष पुष्पपुरात लावला होता.. तसे पिंपळाचे झाड तर आजही पेशावरच्या ‘पीपल मंडी’त आहे! अरबी आक्रमणांनाही हुंड बधले नव्हते, हा पाकिस्तानात कमीच सांगितला जाणारा इतिहास प्रा. सेहराई यांच्यामुळे ज्ञात झाला आहे.