विनाशिका, पाणबुडय़ा, क्षेपणास्त्रांचा मारा करू शकणाऱ्या नौका, इंधनवाहू नौका, लढाऊ जहाज अशा जवळपास ३० आयुधांच्या साहाय्याने देशाच्या पूर्व भागातील सागरी सीमा सुरक्षित राखण्याची जबाबदारी नौदलाच्या पूर्व मुख्यालयाच्या प्रमुखपदाची अर्थात ‘फ्लिट कमांडर’ म्हणून पदभार स्वीकारणाऱ्या रिअर अॅडमिरल एस. व्ही. भोकरे यांच्यावर आली आहे. विशाखापट्टणमच्या नौदल तळावर झालेल्या सोहळ्यात त्यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली.
नौकानयन आणि विमानाचे दिशादर्शन यातील तज्ज्ञ म्हणून त्यांची खरी ओळख. सातारच्या सैनिकी शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि वेलिंग्टनच्या डिफेन्स सव्र्हिसेस स्टाफ कॉलेजमधून भोकरे यांनी लष्करी पदवी प्राप्त केली. याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन संरक्षण महाविद्यालयातून संरक्षण व सामरिक शास्त्राची पदव्युत्तर पदवी मिळवली. संरक्षण क्षेत्रातील सखोल ज्ञान प्राप्त करताना नौदलातील वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी भोकरे यांनी यशस्वीपणे सांभाळली. सिंधुघोष, सिंधुध्वज, सिंधुशस्त्र या पाणबुडय़ांबरोबर आयएनएस वज्रबाहूचे संचलन त्यांनी केले. पूर्व विभागाच्या मोहीम विभागाचे प्रमुख, पश्चिम मुख्यालयाच्या पाणबुडी विभागाचे कमांडर अशी जबाबदारीची कामे त्यांनी निभावली. या काळात खास कामगिरीबद्दल युद्ध सेवा आणि नौसेना पदकाने भोकरे यांना सन्मानित करण्यात आले. गत काही वर्षांत देशाचे संरक्षणविषयक प्रश्न गुंतागुंतीचे होत आहेत. या स्थितीत सागरी सीमांचे संरक्षण आणि चाचेगिरीला आळा घालण्याचे आव्हान आहे. देशाच्या अवतीभोवती नाविक तळ निर्माण करण्यात गुंतलेल्या चीनचा अरबी समुद्र अथवा हिंदी महासागरात हस्तक्षेप होऊ शकतो. यामुळे नौदलाच्या तिन्ही विभागांची जबाबदारी अधिकच वाढली आहे. सागरी सीमांच्या संरक्षणाबरोबर देशाच्या आर्थिक प्रगतीत प्रमुख घटक असलेले दळणवळणाचे सागरी मार्ग आणि आंतरराष्ट्रीय सागरी मार्गाच्या सुरक्षिततेसाठी नौदल महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या सर्वाचा विचार केल्यास पूर्व विभागातील युद्धनौकांच्या ताफ्याचे संचलन म्हणजे किती जोखमीचे आणि महत्त्वपूर्ण काम आहे हे लक्षात येईल. भोकरे यांच्यावर ही जबाबदारी आल्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर टाकण्यात आलेला हा विश्वासच म्हणावा लागेल. ही जबाबदारी पेलण्यातही ते यशस्वी होतील यात शंकाच नाही.