फुटबॉलमध्ये ‘काळा मोती’ पेले याला जे स्थान आहे, तेच न्यूझीलंडचा खेळाडू जोना लोम्यू याला रग्बी या खेळात अगदी कमी वयात मिळाले होते. जिवंतपणीच तो दंतकथा बनला होता. त्यामुळे तो अवघ्या चाळिशीत जग सोडून गेला तेव्हा त्या बातमीने जग हळहळले तर त्यात नवल नव्हते.
ऑल ब्लॅक लीगकडून तो खेळायचा. गेल्याच महिन्यात त्याने ‘ऑल ब्लॅक’ला जागतिक करंडक जिंकून दिला होता. न्यूझीलंडमधील ऑकलंड शहरात जन्मलेला, कामगार वस्तीत वाढलेला लोम्यू १९९५ मध्ये वयाच्या १९व्या वर्षी जागतिक स्पर्धेत उतरला तेव्हा त्याने चार सामन्यांत सात ‘ट्राइज’ मिळवले होते. ऑकलंड ब्लूज, चिफस, हरिकेन, नॉर्थ हार्बर, वेलिंग्टन अशा अनेक देशी संघांकडूनही तो खेळत असे. त्याआधी त्याने ऑल ब्लॅक संघाकडून १९९४ मध्ये फ्रान्सविरुद्धच्या सामन्यात रग्बीतील पदार्पण केले होते. सहा फूट पाच इंच म्हणजे धिप्पाड म्हणावे असे त्याचे व्यक्तिमत्त्व, पण स्वभाव अतिशय मृदू; त्याने आयुष्यात कुणालाही दुखावले नाही. काळी जर्सी घालून तो मैदानावर जेव्हा खेळायचा तेव्हा मालगाडी धावते आहे असे त्याच्या चाहत्यांना वाटायचे. रग्बी खेळातील एका पिढीचे तो प्रेरणास्थान होता. लेफ्ट विंगर म्हणून तो जास्त चांगला खेळत असे.
फुटबॉलमध्ये जे ‘गोल’चे महत्त्व, ते रग्बी या आडदांड खेळात गोलरेषेच्या आत चेंडू टेकविण्याचे, म्हणजे ‘ट्राय’चे.. जोना रग्बीच्या ६३ कसोटी खेळला; त्यात त्याच्या नावावर ३७ ट्राइज होते. बिगरकसोटी दर्जाच्या सामन्यांत ऑल ब्लॅककडून तो ७३ वेळा खेळला, त्यात त्याचे ४३ ट्राइज होते. जागतिक करंडकात त्याने १५ ट्राइजचा विक्रम केला होता. त्याची अलीकडे एका दक्षिण आफ्रिकी रग्बीपटूने बरोबरी केली आहे. एकदा लोम्यू ज्या सामन्यात खेळत होता तो बघण्यासाठी माध्यमसम्राट रूपर्ट मरडॉक आले होते. अत्यंत चपळ, शक्तिशाली व असामान्य कौशल्य असलेला तो मुलगा कोण आहे, असे त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना विचारले, त्या क्षणी रग्बी खेळाचे भाग्य बदलले. त्यांच्या ‘न्यूजकॉर्प’ ने ५५ कोटी डॉलर्स खर्च करून १९९६ मध्ये रग्बी स्पर्धेचे हक्क विकत घेतले, त्यामुळे हा खेळ नंतर व्यावसायिक बनला. दुर्दैवाने जोना लोम्यूला विषबाधा झाली व त्यातून त्याची मूत्रपिंडे निकामी झाली, तो डायलिसिसवर होता. दोन मुलांना मोठे झालेले बघण्याची त्याची ‘छोटीशी आशा’देखील प्रत्यक्षात आली नाही, याची खंत त्याच्या पत्नीला आहे.