भारतीय नौदलाचा खड्गहस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम ताफ्याची सूत्रे अत्यंत संवेदनशील अशा काळात  रिअर अ‍ॅडमिरल आर. बी. पंडित यांच्याकडे आली असून भारत-पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावाच्या प्रसंगी  मुरब्बी व अनुभवी व्यक्तीकडे या ताफ्याची सूत्रे येणे महत्त्वाचे मानले जाते. यापूर्वी ते पद सांभाळणाऱ्या रिअर अ‍ॅडमिरल रवनीत सिंग यांना व्हाइस अ‍ॅडमिरलपदी बढती मिळून त्यांची नौदलाच्या पश्चिम विभागाच्या प्रमुखपदी नेमणूक होत आहे.

नौदलाच्या पश्चिम ताफ्याकडे अरबी समुद्राच्या उत्तरेकडील भागाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. त्यात पाकिस्तानी किनाऱ्याजवळील भाग येत असल्याने पाकिस्तानबरोबरील संभाव्य युद्धात या ताफ्याच्या कामगिरीने मोठा फरक पडणार असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. ही जबाबदारी सांभाळण्यासाठी पश्चिम ताफ्याकडे गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या किनाऱ्यावरील ओखा, पोरबंदर, मुंबई, पणजी, कारवार येथील विविध तळ आहेत. तसेच या ताफ्याच्या भात्यात आयएनएस विक्रमादित्य ही आशियातील सर्वात मोठी विमानवाहू नौका, दिल्ली आणि कोलकाता वर्गातील विनाशिका, तलवार आणि ब्रह्मपुत्रा वर्गातील फ्रिगेट्स, सिंधुघोष वर्गातील पाणबुडय़ा, मिग-२९ के लढाऊ विमाने आणि कामोव्ह हेलिकॉप्टर आहेत. या सर्व शस्त्रसंभारानिशी भारताच्या पश्चिम तीराची जबाबदारी सांभाळण्यास रिअर अ‍ॅडमिरल पंडित सज्ज आहेत.

पंडित हे भारतीय नौदलात जुलै १९८४ मध्ये अधिकारी म्हणून दाखल झाले. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी वेलिंग्टन येथील डिफेन्स सव्‍‌र्हिसेस स्टाफ कॉलेज, कॉलेज ऑफ नेव्हल वॉरफेअर, मुंबई आणि रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीज, लंडन येथून पुढील उच्च शिक्षण पूर्ण केले . पंडित हे पाणबुडीविरोधी युद्धप्रणालीतील विशेष जाणकार आहेत. नौदलाच्या वायझ्ॉग येथील पूर्व ताफ्याचे पाणबुडीविरोधी अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. यापूर्वी त्यांनी आयएनएस निर्घात, आयएनएस विंध्यगिरी, आयएनएस जलश्व आदी युद्धनौकांवर कामगिरी बजावली आहे.  राजपूत वर्गातील विनाशिकांवर त्यांनी सेवा बजावली आहे. मुंबईस्थित क्षेपणास्त्रसज्ज नौकांच्या ‘किलर स्क्वाड्रन’चे नेतृत्व तसेच गोव्यातील नौदल अकादमीत प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. यानंतर त्यांनी नौदल मुख्यालयात असिस्टंट चीफ ऑफ नेव्हल स्टाफ (फॉरिन कोऑपरेशन अँड इंटेलिजन्स), नौदलाच्या दक्षिण विभागाचे प्रमुख अशी महत्त्वाची पदे भूषविली आहेत. संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन पराक्रम’ दरम्यान व त्यानंतर ते इस्लामाबादमधील भारताच्या उच्चायुक्त कार्यालयात नौदल सल्लागार होते. त्यांचा हा अनुभव सध्याच्या पाकिस्तानविरोधी वातावरणात विशेष उपयोगी ठरणार आहे.