काश्मीरमधील गानकोकिळा, काश्मीरच्या आशा भोसले अशी ख्याती मिळवलेल्या त्या मुलीला लहानपणापासून गाण्याची आवड होती. नंतर ती विवाहसमारंभात गायनाचे कार्यक्रम करीत असे. श्रीनगर रेडिओवर त्यांनी काम केले. त्यांचे नाव राज बेगम. त्यांचे नुकतेच निधन झाले. गेली अनेक दशके काश्मिरी मनावर त्यांच्या आवाजाची मोहिनी होती. रेडिओ काश्मीरसाठी त्यांनी गायन तर केलेच पण भारत व परदेशात मैफलीही केल्या होत्या.

राज बेगम यांचा जन्म श्रीनगरमध्ये २७ मार्च १९२७ रोजी झाला. सुरुवातीला त्या महिलांसाठी गायन करीत असत, कारण त्या काळात समाजाची स्थिती बंदिस्त होती, अनेक बंधने महिलांवर होती. बेगम यांनाही घरातून विरोधच होता, पण नातेवाईक व कुटुंबीयांना न जुमानता त्यांनी गायनातील कारकीर्द सुरूच ठेवली. शास्त्रीय संगीत, गीते यात त्यांना निपुणता मिळालेली होती. १९५४ मध्ये त्या रेडिओ काश्मीरमध्ये श्रीनगर केंद्रावर रुजू झाल्या. १९८६ पर्यंत त्यांची तेथील गायन सेवा सुरू होती. २००२ मध्ये त्यांना पद्मश्री मिळाली तर २०१३ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा आवाज श्रोत्यांच्या मनाची पकड घेणारा होता. विवाहसमारंभात गाणारी साधी गायिका नंतर काश्मीरचा आवाज बनली. १९७० च्या दशकात काश्मीरमध्ये इतर गायिका नव्हत्या असे नाही पण बेगम यांचा आवाज दर्दभरा व खोली असलेला होता. पन्नाशीच्या दशकात रेडिओवर कारकीर्द सुरू केलेल्या बेगम यांच्या गायनाचा फारसा प्रसार झाला नाही, कारण रेडिओ काश्मीरमध्ये केवळ सरकारी मनोवृत्ती असल्याने त्यांच्या गाण्याच्या कॅसेट वगैरे सहज उपलब्ध होताना दिसत नव्हत्या. बरेच प्रयत्न करूनही त्यांचे संगीत सार्वजनिक पातळीवर आले नव्हते.

पतीने त्यांना गाण्यास मनाई केली पण प्रत्यक्ष मैफलीचा प्रतिसाद बघून त्यांचा विरोध मावळला. बेगम अख्तर यांनी त्यांना गझल गायनाकडे वळण्याचा सल्ला दिला होता. त्यांना गायनाचे प्रशिक्षण उस्ताद झंडी खान, उस्ताद महंमद अब्दुल्ला तिबेटबकल, उस्ताद महंमद कालीनबाख यांच्याकडून मिळाले. रेडिओ काश्मीरमध्ये त्यांची ओळख लोकगायक गुलाम कादीर लांगू यांनी करून दिली. गुलरेझ हे त्यांचे प्रेमगीत गाजले. धार्मिक, लोकगीते, गझल, प्रेमगीते, हलकीफुलकी गीते असे अनेक प्रकार त्यांनी लीलया हाताळले, रेडिओ काश्मीरमध्ये त्या थेट गायन करीत असत. रेकॉर्डिगची सोय नव्हती पण त्यांनी हजारो गीते गायली. व्यासिये गुलान आयु बहार, सुबह फुल भुलभुलाव तुल शोरे गुगा, रूम घयाम शीशा ब्येगुर, क्या रोझ परदान छाये.. ही त्यांची काही गीते. त्या व नसीम अख्तर यांनी या क्षेत्रात महिलांवर असलेल्या सामाजिक मर्यादा ओलांडल्या. सादिक स्मृती पुरस्कार, काश्मिरी लोकसंगीत सुवर्णपदक, कला केंद्राचे रजत पदक, बक्षी पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. दाल सरोवरइतकीच त्या काश्मीरची शान होत्या.