नाशकात २०१५ मध्ये जेव्हा कुंभमेळा सुरू होता तेव्हा नाशिक जिल्हय़ामध्येच जन्मलेला, पण अमेरिकेत स्थायिक असलेला एक तरुण मात्र कुंभाथॉन म्हणजे भारतातील स्मार्ट शहरांसाठी नवप्रवर्तनात्मक कल्पना तयार करण्यासाठी कार्यक्रम घेत होता. लोकांना घरे, सांडपाणी सुविधा व कुंभमेळ्यात वाहतूक सुविधा अधिक चांगल्या प्रकारे देण्यासाठी प्रयत्न करीत होता. समाजाच्या प्रश्नांची उत्तरे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडवण्याचा ध्यास रमेश रासकर या नवप्रवर्तक वैज्ञानिकाने घेतला. त्यांना लेमेलसन व एमआयटी पुरस्कार जाहीर झाला आहे. ५ लाख डॉलरचा (३.३५ कोटी रु.) हा पुरस्कार मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या अमेरिकेतील संस्थेचा अभियांत्रिकी विभाग देत असतो.

शेतकरी कुटुंबात जन्मले असूनही त्यांच्या इलेक्ट्रॉनिक अभियंता वडिलांनी मुलांना शेती सोडून शिक्षणावर लक्ष केंद्रित करायला लावले. पुण्याच्या सीओईपीमध्ये शिकत असताना त्यांनी ‘ज्युरासिक पार्क’ हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यांनी त्यासारखे भन्नाट काही तरी करण्याचा संकल्प केला. रासकर हे एमआयटीच्या मीडिया लॅबमध्ये सहयोगी प्राध्यापक आहेत. तेथे त्यांनी कॅमेरा कल्चर ग्रुप स्थापन करताना अतिशय वेगवान प्रतिमाचित्रणाचा कॅमेरा तयार केला आहे जो प्रत्येक कानाकोपऱ्यात नजर ठेवू शकतो. पुस्तकाचे मुखपृष्ठ न उघडता पुस्तकाची पहिली काही पाने वाचता येतील असा कॅमेरा त्यांनी उपलब्ध केला आहे. धार्मिक व आध्यात्मिक पाश्र्वभूमी असलेल्या नाशिकचे सुपुत्र रासकर हे अमेरिकेत असले तरी मनाने भारताशी त्यांची नाळ जुळलेली आहे. नाशिकमध्ये त्यांनी डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर हा ऑनलाइन मंच सुरू केला होता. जग हेच प्रयोगशाळा आहे व नवप्रवर्तनाचे प्रारूप हे समाजास उपयुक्त संशोधनासाठी महत्त्वाचे आहे. प्रत्येक प्रश्नावर उत्तरे असतात, पण आपण ती शोधली पाहिजेत, असा नवा आशावाद त्यांनी त्यांच्या वैज्ञानिक कल्पनाशक्तीतून जगाला दिला. नाशकातील लहान गावात ते स्वतंत्र बेडरूम नसलेल्या घरात, शेतावर काम करताना, मातीच्या कच्च्या घरात राहिले. तेव्हा आठवडय़ातून एकदा पाणी मिळत असे. विजेचा प्रश्नही गंभीर होता. आज ते अमेरिकेतून या प्रश्नांकडे पाहात आहेत व नवीन तंत्रज्ञान विकसित करून समस्या सोडवीत आहेत. आपण शोधलेले तंत्रज्ञान लाखो लोकांचे जीवन बदलू शकते, हा दुर्दम्य आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे. संगणकाच्या माऊसचे निर्माते डग्लस एंगलबर्ट, जीवशास्त्रज्ञ लेरॉय हूडस, एलईडीचे निर्माते निक होलोन्याक यांना लेमेलसन एमआयटी पुरस्कार यापूर्वी मिळाला आहे. त्यांची ओळख संगणक वैज्ञानिक ही असली तरी त्यांनी केलेले काम प्रतिमाचित्रण तंत्रातील आहे. पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून (सीओईपी) शिक्षण घेतल्यानंतर ते चॅपेल हिल येथील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातून पीएच.डी. झाले. शेडर लँपस, फेमटो फोटोग्राफी, कोरनार, संगणकीय छायाचित्रण, एचआर २ डी, आयनेत्र या तंत्रज्ञानांचा विकास त्यांनी केला. डोळ्यांच्या तपासणीसाठी किफायतशीर यंत्रेही विकसित केली.