‘एअरलिफ्ट’ हा अक्षयकुमारचा गेल्या वर्षी चित्रपट आला होता.. रणजित कटय़ाल नामक अनिवासी भारतीय, आखाती युद्धात अडकलेल्या भारतीयांना वाचवून सुखरूप मायदेशी आणण्याची मोठी मोहीम एकहाती यशस्वी करतो, असे त्याचे कथानक. रणजित कटय़ालच्या या कहाणीचा ‘एकहाती’ मसाला बॉलीवूडचा असला, तरी मुळात ती घटना काल्पनिक मुळीच नव्हती. कुवेतमधील भारतीय उद्योजक मॅथुनी मॅथ्यूज यांनी पहिल्या आखाती युद्धात केलेल्या कामाची ती सत्यकथाच होती. हे मॅथ्यूज आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

सद्दाम हुसेनच्या इराकने १९९० मध्ये कुवेतवर आक्रमण केले होते, त्या वेळी रोजीरोटीसाठी आखातात गेलेल्या सुमारे १.७ लाख भारतीय नागरिकांना युद्धाच्या ज्वाळा चहूबाजूंनी आग ओकत असताना वाचवणे व सुखरूप भारतात आणणे हे काम सोपे नव्हते. त्या वेळी कुवेतमध्ये राहणाऱ्या मॅथ्यूज यांनी मानवतेच्या भूमिकेतून १३ ऑगस्ट ते ११ ऑक्टोबर १९९० दरम्यान अनेक भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात मोठी भूमिका पार पाडली. अशा आपत्कालीन स्थितीत नागरिकांना सोडवून आणणे हे सरकारचे काम असते यात शंका नाही, पण अशा मोहिमेची व्याप्ती जर मोठी असेल तर सरकारचे प्रयत्नही अपुरे पडू शकतात, हे लक्षात घेतले तर मॅथ्यूज यांनी कुवेतमध्ये असताना समन्वयाने जी मोहीम पार पाडली होती त्याचे महत्त्व वेगळे आहे. त्या वेळी त्यांनी कुवेतच नव्हे तर इराकमधील भारतीयांनाही सुरक्षितपणे मायदेशी आणण्याचे काम केले. या लोकांना अन्न, पाणी देण्यापासूनची कामे त्यांनी केली. आज आपण आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण देतो. त्यांना कुणी असे प्रशिक्षण दिले नव्हते. केवळ मानवतेच्या ओढीपोटी त्यांच्या हातून हे साहसी काम घडले. यातून त्यांचे संघटनकौशल्य, संपर्क व्यवस्था, इच्छाशक्ती, मायदेशाच्या लोकांवरील प्रेम, अडचणीत असलेल्यांना हर प्रकारे मदत करण्याची इच्छा असे अनेक गुण दिसून आले. अक्षयकुमार याने काही काळ मॅथ्यूज यांच्याबरोबर राहून त्यांची ही साहसभरी कहाणी आत्मसात केली होती.

मॅथ्यूज कुवेतमध्ये अल सायेर ग्रुपचे प्रमुख होते. या समूहाची टोयोटाची एजन्सी होती, त्यामुळे ते टोयोटा सनी नावानेही ओळखले जात असत. मॅथ्यूज यांचा जन्म केरळातील पथनमथित्ता जिल्ह्य़ातील कुम्बनाडचा. रोजगाराच्या शोधात ते १९५६ मध्ये प्रथम कुवेतला गेले. त्या वेळी ते अवघे वीस वर्षांचे होते. तेथे ते अल सायेर समूहात व्यवस्थापकीय संचालकपदावरून १९८९ मध्ये निवृत्त झाले. नंतरही त्यांनी ‘इंडियन आर्ट सर्कल’चे संस्थापक सदस्य म्हणून काम केले. परदेशात गेलेल्या लोकांनी एकमेकांना धरून राहायचे असतेच, पण ज्या देशात आपण गेलो आहोत त्या देशातील लोकांपासून फटकूनही राहायचे नसते. त्यांच्यात मिसळून जायचे असते. ही कला त्यांना अवगत होती. त्यामुळे आखाती पेचप्रसंगात ते हरभजन सिंग बेदी यांच्या सहकार्याने भारतीयांना सुखरूप मायदेशी पाठवण्याची मोहीम यशस्वी करू शकले.

एअर इंडियाच्या विमानांनी यात मोठी भूमिका पार पाडली, त्यासाठी सर्वाधिक लोकांची विमानाने मायदेशी आणण्याची मोहीम म्हणून एअर इंडियाची नोंद गिनीज बुकात आहे. त्या वेळी मॅथ्यूज यांनी भारतीय राजदूतांच्या मदतीने लोकांना बसने बगदादमार्गे अम्मानला आणले, त्यासाठी इराकी वाहतूकदारांशी त्यांचे असलेले हितसंबंध उपयोगी आले. त्या काळात भारतात व्ही. पी. सिंग यांचे सरकार होते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर लोकांना मायदेशी आणण्यासाठी विमान वाहतुकीपूर्वीची तजवीज करणे सरकारच्याही आवाक्यात नव्हते, त्यामुळे कुवेतमध्ये केंद्र सरकारचे अनधिकृत/ अनौपचारिक दूत म्हणून मॅथ्यूज यांनी केलेले काम सदैव स्मरणात राहील असेच आहे.