अमेरिकेसह जगाला हादरवून टाकणारा ९ /११ चा भीषण दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अमेरिकेचे डोळे उघडले. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मग अमेरिकेने अनेक उपाययोजना केल्या आणि आजही त्यासाठी अब्जावधी रुपये खर्च केले जात आहेत. अंतर्गत सुरक्षेसाठी नवे मंत्रालय निर्माण करणे हा त्यापैकीच एक उपाय होता. आपल्या येथील गृह खात्याप्रमाणे असलेल्या या खात्याचे नाव आहे डिपार्टमेंट ऑफ होमलॅण्ड सिक्युरिटी.. अमेरिकेतील महत्त्वाच्या मंत्रालयांमध्ये याचा क्रमांक तिसरा आहे. या मंत्रालयाशी संबंधित शैक्षणिक सल्लागार मंडळावर भारतीय वंशाच्या डॉ. रेणू खटोड यांची झालेली नियुक्ती म्हणूनच महत्त्वाची मानली जाते.

प्रा. डॉ. खटोड या मूळच्या उत्तर प्रदेशातील कानपूरच्या रहिवासी आहेत. १९७३ साली कानपूर विश्वविद्यालयातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर त्या उच्चशिक्षणासाठी पडर्य़ू विद्यापीठात गेल्या. तेथे राज्यशास्त्रात त्यांनी एमए केले. काही काळ स्थानिक महाविद्यालयांमध्ये त्यांनी अध्यापन सुरू केले. कालांतराने पीएच.डी.च्या संशोधनासाठी त्या पुन्हा पडर्य़ू विद्यापीठात आल्या. १९८५ मध्ये त्यांचा प्रबंध स्वीकारला गेला आणि राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयातील डॉक्टरेट त्यांनी मिळवली. यानंतर मग त्यांची शैक्षणिक कारकीर्द बहरत गेली. साऊथ फ्लोरिडा विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर, याच विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय घडामोडींविषयक विभागात प्रोफेसर आणि नंतर तर राज्यशास्त्र विभागाच्या त्या प्रमुख बनल्या. २००२ मध्ये त्या ह्य़ूस्टन विद्यापीठात आल्या. तेथे विविध जबाबदारीची पदे भूषविल्यानंतर सध्या त्या युनिव्हर्सिटी ऑफ ह्य़ूस्टन सिस्टीमच्या चॅन्सेलर तर ह्य़ूस्टन विद्यापीठाच्या अध्यक्ष आहेत. ही दुहेरी जबाबदारी २००८ पासून त्या सांभाळतात. या दोन्ही संस्थांचा अर्थसंकल्पच १.७ अब्ज डॉलर इतका असल्याने संस्थेच्या व्यापाची कल्पना येते.

पर्यावरण या विषयाचाही त्यांचा दांडगा व्यासंग आहे. जागतिक हवामान बदल, फ्लोरिडातील जलधोरण, पर्यावरणीय राज्यशास्त्र आणि धोरणे यांसारख्या अनेक विषयांवरील त्यांचे शोधनिबंध मान्यवर नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. ६१ वर्षीय डॉ. खटोड यांचे शैक्षणिक क्षेत्राबरोबरच आर्थिक, सामाजिक क्षेत्रांतही योगदान उल्लेखनीय राहिले आहे. फेडरल रिझव्‍‌र्ह बँक ऑफ डलास तसेच भारतीय पंतप्रधानांच्या जागतिक सल्लागार मंडळावर त्या कार्यरत होत्या. अनेक सरकारी व खासगी संस्थांनी त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरवले आहे.  डॉ. खटोड यांची नियुक्ती झालेल्या सल्लागार मंडळात  त्या एकमेव भारतीय वंशाच्या आहेत. देशांतर्गत सुरक्षा आणि शैक्षणिक धोरणे ठरवताना उपयुक्त ठरतील अशा शिफारशी मंत्रालयास सादर करण्याची जबाबदारी या मंडळावर आहे. अमेरिकेसारख्या देशातील महत्त्वाच्या मंडळावर काम करण्याची संधी जन्माने भारतीय असलेल्या महिलेस मिळणे हा आपल्या देशाचाही बहुमानच आहे.