सांख्यिकी क्षेत्रात १९७२ मध्ये एका व्यक्तीचा शोधनिबंध खूप गाजला होता. तो होता प्रमाणात्मक हानी सिद्धांताबाबतचा. त्यांचे नाव सर डेव्हिड कॉक्स. त्यांना नुकताच स्टॅटिस्टिक्स फाऊंडेशनचा पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.  फील्ड्स मेडल, आबेल पुरस्कार, टय़ूरिंग तसेच नोबेल पुरस्कारांचे जे महत्त्व आहे तितकाच महत्त्वाचा हा पुरस्कार मानला जात आहे.

कॉक्स यांनी मांडलेले प्रारूप हे विशिष्ट घटकांच्या आधारे मृत्युदर किंवा विशिष्ट गुणधर्माच्या आधारे रुग्णांचे वाचण्याचे प्रमाण सांगते. त्यामुळे उपचार मूल्यमापनापासून ते शाळांतील मुलांची गळती, त्याची कारणे, एड्स पाहणी यंत्रणा, रोगप्रसाराची जोखीम यात बराच फायदा झाला आहे. कॉक्स यांचा सिद्धांत हा विज्ञान व अभियांत्रिकीच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात वापरला जातो. काही सामाजिक परिणामांचा उलगडाही या सिद्धांतातून झाला आहे. धूम्रपानाशी निगडित हृदयविकाराचा धोका यावरही त्यांनी सांख्यिकी मार्गाने संशोधन केले.

धूम्रपान सोडल्यानंतर त्याचे परिणाम १० वर्षांनी दिसतात असे मानले जात होते, पण कॉक्स यांच्या मते तो परिणाम एक वर्षांत दिसतो. हृदयविकारातील जोखमीचे घटक, सिस्टिक फायब्रॉसिस, निद्रानाश, फुप्फुसाच्या कर्करोगाच्या उपचारांचे विश्लेषण कॉक्स प्रारूपामुळे शक्य झाले. एखाद्या प्रदूषणकारी घटकामुळे मृत्यूचे प्रमाण त्यांनी आकडेवारीनिशी मांडल्याने औद्योगिक पद्धती व नियमनात जगभरात बदल घडून आले. त्यांचे प्रारूप हे वैद्यकीय संशोधनासाठी जास्त वापरले गेले.

कॉक्स यांचा जन्म १९२४ मध्ये बर्मिगहॅम येथे झाला. त्यांचे वडील जवाहिऱ्याच्या उद्योगात काम करीत होते. कॉक्स यांचे शिक्षण हँड्सवर्थ ग्रॅमर स्कूलमध्ये झाले. त्यांनी सांख्यिकीचे शिक्षण केंब्रिजच्या सेंट जॉन्स कॉलेजमधून घेतले. लीड्स विद्यापीठातून ते पीएच. डी. झाले. काही काळ ते रॉयल एअरक्राफ्ट एस्टॅब्लिशमेंटमध्ये काम करीत होते. नंतर वूल्स इंडस्ट्रीज असोसिएशन, केंब्रिज विद्यापीठाची सांख्यिकी प्रयोगशाळेत संशोधन केल्यानंतर ते ब्रिकबेक कॉलेजमध्ये प्राध्यापक झाले. लंडनच्या इंपिरियल कॉलेजच्या सांख्यिकी अध्यासनाचे प्रमुख होण्याचा मान त्यांना १९६६ मध्ये मिळाला. १९८५ मध्ये त्यांना नाइटहूड किताबाने सन्मानित करण्यात आले.

१९६६ ते १९९१ या काळात ते बायोमेट्रिकचे संपादक होते. त्यांनी ३०० शोधनिबंध व पुस्तके लिहिली, त्यात द प्लानिंग ऑफ एक्सपिरिमेंट्स, क्यूज, अ‍ॅनॅलिसिस ऑफ सव्‍‌र्हायव्हल डाटा यासारख्या पुस्तकांचा समावेश आहे. रॉयल सोसायटीचे ते फेलो असून त्यांना कर्करोगाच्या सांख्यिकी संशोधनासाठीचे केटरिंग प्राइज व सुवर्णपदक मिळाले होते. रॉयल सोसायटीने त्यांना कोपली पदक देऊन सन्मानित केले. त्यांनी सांख्यिकीचा वापर प्रत्यक्ष व्यवहारात करून दाखवला तसेच या क्षेत्रात अनेक तरुण संशोधक घडवले.