स्मृती नागपाल. वय अवघे पंचविशीच्या आसपास, कर्तृत्व मात्र मोठे. कर्णबधिरांनी बनवलेल्या वस्तूंना तिने अतुल्यकला या संस्थेच्या माध्यमातून जगाची दारे खुली करून दिली. तिला नुकताच कोलंबिया येथे नेल्सन मंडेला-ग्रॅका मॅशेल पुरस्कार युवक गटात देण्यात आला. याआधी २०१५ मध्ये, बीबीसीने शंभर प्रभावशाली महिलांत तिची निवड केली होती. सामाजिक कार्य हे तिचे आवडीचे क्षेत्र. तिची दोन्ही भावंडे कर्णबधिर. त्यामुळे तिने चिन्हांची भाषा शिकून घेतली. तो तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला. वयाच्या सोळाव्या वर्षी तिने राष्ट्रीय कर्णबधिर संस्थेत पहिली नोकरी म्हणण्यापेक्षा सेवा पत्करली, तेव्हा ती दहावीत होती. कुठला अनुभव गाठीशी नव्हता. केवळ भाऊ व बहीण यांच्यात दुवा म्हणून काम करणे वेगळे व १० हजार लोकांशी चिन्हांच्या भाषेने संवाद साधणे वेगळे. ते आव्हान तिने लहान वयात एका कार्यक्रमात पेलले. सुरुवातीला तिला ताण आला खरा, पण मंचावर गेल्यावर तिने सहजगत्या कर्णबधिरांशी संवाद साधला. अनेक लोकांची गरज तिला लक्षात आली.
महाविद्यालयात असताना तिने दूरदर्शनसाठी कर्णबधिरांसाठीच्या बातम्यांसाठी सादरकर्ती म्हणून मुलाखत दिली व नंतर मागे वळून पाहिलेच नाही. पाच वर्षे तिने हे काम केले, सकाळी पाच वाजता उठून तिने कर्णबधिरांसाठी बातम्यांचे रेकॉर्डिग करण्याचा नित्यक्रम सुरूच ठेवला. इथेच कला शाखेतील पदव्युत्तर पदवी असलेला एक कलाकार तिला भेटला. तो कर्णबधिर होता. तो पेनस्टँड हाताने तयार करीत असे. ‘‘आम्ही बरेच जण असे आहोत की, ज्यांच्या अंगात कलागुण तर आहेत, पण जगण्यासाठी साधन नाही,’’ असे त्याने सांगितले. मग त्याच्यासारखे अनेक कलाकार तिला दिसले.. त्यातील ९० टक्के कलाकारांना कुठली संधीच नव्हती. त्यातून मग कर्णबधिरांच्या वस्तूंना ग्राहक उपलब्ध करून देण्यासाठी ‘अतुल्यकला’ ही संस्था तिने स्थापन केली.
अडीच वर्षे पूर्ण झालेली ही संस्था इतर स्वयंसेवी संस्थांसारखी नाही. या संस्थेत कर्णबधिर कलाकार कलावस्तूंची व उत्पादनांची निर्मिती करतात. त्यांच्या कलावस्तूंना उत्पादन पातळीवर आणण्याचे काम स्मृती नागपाल हिची ही संस्था करते. चिन्हांच्या भाषेविषयी समाजात जागृती निर्माण करण्याचे काम दृश्यफितींच्या माध्यमातून केले जाते. कर्णबधिर लोकांना कार्यशाळा घेण्याचे प्रशिक्षण देतानाच त्यांना नवीन संकल्पना घेऊन पुढे येण्याचे बळ हीच संस्था देत आहे.
अतुल्यकला हे एक मूल वाढवण्यासारखे काम आहे , या संस्थेच्या कामातून बरेच शिकायल मिळाले असे ती सांगते. वयाच्या बाविसाव्या वर्षी ही संस्था सुरू करताना ती एकटी होती आता एक चमूच तिने उभा केला आहे. कर्णबधिरांच्या रोजीरोटीची जबाबदारी घेऊन तिने फार मोठे सामाजिक काम केले आहे, आज तिचे व्यक्तीमत्व इतक्या लहान वयात खूप प्रगल्भ बनले आहे, तिच्या या कर्तृत्वाला दाद द्यवी तितकी थोडीच.