जगातील नागरिकांना ‘पाण्याचा हक्क’ मिळवून देणारे अमेरिकी प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय पाणीवाटप कायद्याचे तज्ज्ञ स्टीफन मॅकाफ्री यांना यंदाचे स्टॉकहोम वॉटर प्राइझ जाहीर झाल्याने त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव झाला आहे.

जलसंवर्धन क्षेत्रात काम करीत असून स्टीफन मॅकाफ्री यांचे नाव माहीत नाही असा माणूस विरळा. त्यांचा या क्षेत्रातील वकूब मोठा आहे. इतका की त्यांच्या प्रयत्नांमुळे पाणी मिळणे हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे, याला संयुक्त राष्ट्रांनी २०१० साली मानवी अधिकार म्हणून मान्यता दिली. तसेच पाणीवाटपाविषयीचा १९९७ सालचा आंतरराष्ट्रीय कायदाही संमत करून घेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. एरवी सॅक्रेमॅन्टो (कॅलिफोर्निया) येथील पॅसिफिक विद्यापीठात कायद्याचे प्राध्यापक असलेले प्रा. मॅकाफ्री संयुक्त राष्ट्रांसाठी गेली ३५ वर्षे काम करतात. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय कायदेविषयक आयोगावर ते १९८२ पासून १९९१ पर्यंत होते. याच आयोगाच्या १९८७ मधील अधिवेशनाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे होते. पाण्याबद्दलचे आंतरराष्ट्रीय कायदे हे (तोवर) केवळ जलवाहतुकीपुरते असल्यामुळे १९८५ साली प्रत्यक्ष पाणीवापरासंबंधीचे आंतरराष्ट्रीय कायदे करण्यासाठी त्यांना ‘खास संवादक’ म्हणून नेमण्यात आले. जगभरच्या अनेक पाणी-प्रश्नांचा अदमास घेऊन त्यांनी १९९१ मध्ये जो मसुदा बनवला, तो पाणी-तंटे सोडवणुकीचा आणि हे संघर्ष होऊच नयेत यासाठी सर्वमान्य नियम घालून देणारा पहिला जागतिक मसुदा!

मॅकाफ्री यांनी आजवर जगातील अनेक पाणी-तंटय़ांमध्ये मध्यस्थ व सल्लागाराची भूमिका यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यात नाइल, मेकाँग, गंगा आदी मोठय़ा नद्यांच्या खोऱ्यांचा समावेश आहे. अर्जेटिना-उरुग्वे, भारत-पाकिस्तान, इस्रायल-पॅलेस्टाइन आणि स्लोव्हाकिया-हंगेरी यांच्या पाणी तंटय़ांमध्ये त्यांची कामगिरी महत्त्वाची आहे. नाईल नदीच्या पाणीवाटपाचा करार यशस्वी होण्यात त्यांचे योगदान मोठे आहे.

पाणी या विषयावर काम करणाऱ्या अनेक तज्ज्ञांचे आणि कार्यकर्त्यांचे ते मार्गदर्शक आहेत. त्यांची अनेक पुस्तके व लेख म्हणजे या विषयावरचे संदर्भ साहित्य बनले आहे. त्यातही ‘द लॉ ऑफ इंटरनॅशनल वॉटरकोर्सेस’ (२००७) हा जगन्मान्यता मिळवलेला आणि अवघ्या दशकभरात ‘ऑक्सफर्ड’तर्फे दुसरी आवृत्ती निघालेला ग्रंथ आहे.

‘स्टॉकहोम वॉटर प्राइझ’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्यावर त्यांची प्रतिक्रिया अत्यंत सुसंस्कृत होती. ‘हा पुरस्कार मिळाल्याचे कळताच काही वेळ माझा श्वास रोखला गेला. या पुरस्कारामुळे माझा मोठा सन्मान झाला आहे. मात्र हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक माणूस त्याच्या आधीच्या पिढीच्या खांद्यावर उभा असतो. त्यामुळे ज्यांनी माझ्यासाठी हा मार्ग प्रशस्त केला त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे,’ असे ते म्हणाले.

जगातील सर्व माणसांना मिळालेल्या पाण्याच्या हक्काची अंमलबजावणी करणे हे सध्या आंतरराष्ट्रीय समुदायापुढील मोठे आव्हान असल्याचे ते सांगतात. त्यासाठी विकसित व विकसनशील देशांनी एकत्र काम करण्याची गरजही ते व्यक्त करतात.

जगाची ४० टक्केलोकसंख्या अशा प्रदेशात राहते की जेथे विविध नद्यांची खोरी वेगवेगळ्या देशांत विभागली गेली आहेत. अशा परिस्थितीत संघर्षांची शक्यता वाढते. आणि म्हणूनच मॅकाफ्री यांच्यासारख्या तज्ज्ञांच्या कामाचे महत्त्वही वाढते. सामान्यपणे अशा स्थितीत संघर्ष उद्भवतो असा समज आहे. मात्र मॅकाफ्री यांच्या मते जेव्हा पिण्याच्या पाण्याचे स्रोत वाटून घ्यावे लागतात तेव्हा दोन देशांमध्ये संघर्षांपेक्षा सामंजस्याची शक्यता वाढते.