बंडखोरी हेच ज्या व्यक्तिमत्त्वाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणायला हवे, अशा नावांमध्ये कलेच्या क्षेत्रातील नावे फारच अभावाने आढळतील. कर्नाटक संगीतात आपल्या वेगळेपणाने आणि संगीताने लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले टी. एम. कृष्णा हे अशा नावांमध्ये अग्रभागी असलेले व्यक्तित्व. संगीतात केलेल्या बंडखोरीपेक्षा संगीताच्या सामाजिक संदर्भात केलेले त्यांचे मूल्यमापन सगळ्यांनाच विचार करण्यास भाग पाडणारे ठरले.

कर्नाटक संगीताच्या क्षेत्रात दरवर्षी डिसेंबर महिन्यात चेन्नईमध्ये होणाऱ्या संगीत महोत्सवाचे महत्त्व आगळेवेगळे असते. एकाच वेळी या शहरातील अनेक ठिकाणी दिवसभर संगीताच्या मैफली होत असतात आणि रसिक शक्य होईल, तेवढय़ा मैफलींचा मनमुराद आस्वाद घेत असतात. टी. एम. कृष्णा यांच्या सांगीतिक जीवनातही या डिसेंबर महोत्सवाचे महत्त्व अनन्यसाधारण असे. गेल्या वर्षी त्यांनी या महोत्सवातून आपण निवृत्त होत असल्याचे जाहीर करून सगळ्यांना मोठाच धक्का दिला. या महोत्सवातून संगीत विझू लागले आहे, अशी त्यांची धारणा झाल्याने, ते या निर्णयाप्रत आले. संगीताकडे सामाजिक अंगाने पाहणारा कलावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कलावंताने रसिकांच्या हृदयात मोलाचे स्थान मिळवले आहे. परंतु संगीत ही केवळ श्रवणानंदाची बाब नसून तिच्याकडे सामाजिक वास्तव म्हणूनही पाहिले पाहिजे, असे मत त्यांनी मांडले आणि संगीतात त्याने खळबळ उडवून दिली. त्यांनी लिहिलेल्या ‘ए सदर्न म्युझिक, द कर्नाटक स्टोरी’ या ग्रंथात या विचारांचा साकल्याने ऊहापोह करण्यात आला आहे. कलेतील राजकारण हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आणि त्याकडे त्यांनी संशोधकी वृत्तीने पाहिले. संगीतात वरच्या जातींनी अन्य जातींमधील कलावंतांना मोठे होऊ दिले नाही, हे वास्तव कर्नाटक संगीतात जेवढे भेदक आहे, त्याहून उत्तर हिंदुस्थानी संगीतात एकदम निराळे आहे. हिंदुस्थानी संगीतात मानाचे स्थान मिळवलेल्या गंगूबाई हनगल या कर्नाटकातील. त्याही वरच्या जातीत न जन्मलेल्या. उत्तर हिंदुस्थानी संगीताने हे जातिवास्तव पूर्वीच नाकारले, परंतु त्याचा कोणताच परिणाम समांतर असलेल्या कर्नाटक संगीतावर झाला नाही. कलावंताला जात नसते आणि कलेच्या रसिकांनीही ती पाहता कामा नये, असा आग्रह धरणारे कृष्णा हे तरीही आपल्या वेगळ्या गायनशैलीने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. भारतासारख्या विविध भाषा आणि संस्कृतींनी युक्त असलेल्या देशातील कलांच्या परंपरांची मालकी कुणा एका समूहाकडे असता कामा नये. त्यासाठी या देशातील प्रत्येकाने एकमेकांच्या स्वातंत्र्याची राखण करायला हवी आणि त्याबरोबरच ते टिकवण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर लढण्याचीही तयारी ठेवायला हवी. कृष्णा यांच्या अशा विचारांनी संगीताचे त्यापूर्वी अतिशय नितळ असलेले स्वरविश्व पार ढवळून निघाले. त्यांना मिळालेला मॅगसेसे पुरस्कार त्यांच्यातील उच्च दर्जाच्या कलावंताबरोबरच त्यांच्यातील बंडखोरीलाही मिळाला आहे.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान