कलावंताची ऐतिहासिकता आणि त्याची लोकप्रियता यांचे प्रमाण अनेकदा व्यस्त असते. तसे शोभा सेन यांचे झाले. ‘उत्पल दत्त यांच्या पत्नीचे निधन’ अशा शब्दांतच शोभा सेन यांची निधनवार्ता बहुतेक वृत्तपत्रे वा वाहिन्यांनी सोमवारी दिली. सेन या दत्त यांच्या पत्नी, हे खरेच. किंबहुना उत्पल दत्त यांची कारकीर्द घडविण्यात शोभा सेन यांचा मोठा वाटा होता हेही खरे. दत्त जेव्हा हिंदी चित्रपटांत लोकप्रिय भूमिका करू लागले नव्हते, त्या १९७०च्या दशकापर्यंतचा सुमारे २५ वर्षांचा काळ दत्त यांना रंगमंचावर हवे ते करू देण्यात शोभा यांचाच वाटा मोठा होता. दत्त यांना १९५३-५४ साली भेटलेल्या, त्यांच्या ‘लिटिल थिएटर ग्रुप’मध्ये अभिनेत्री म्हणून सहभागी झालेल्या आणि १९६० साली त्यांच्याशी विवाहबद्ध होऊनही प्रागतिकपणे माहेरचे- मूळ नाव आडनावच कायम ठेवणाऱ्या सेन, वाढत्या संसाराला हातभार लावण्यासाठी बंगाली चित्रपटांतही कामे करीत. पण या ‘मिळेल त्या’ चित्रपटांतून शोभा सेन यांना लोकप्रियता जणू नकोच होती.

ती त्यांना नाटकांनी मात्र भरपूर दिली होती! सुधारकी विचारांच्या भद्र बंगाली घरात जन्मल्यामुळे पदवीपर्यंतचे शिक्षण घेता आलेल्या शोभा सेन यांचा ओढा महाविद्यालयीन काळापासूनच सामाजिक कार्याकडे होता. त्याची दिशा मात्र त्यांना सापडत नव्हती, ती नाटकाने दिली. बंगाली नाटय़गुरू शंभू मित्र यांचे ‘नबान्न’ हे नाटक १९४४ साली रंगमंचावर आले, त्यात शोभा यांची प्रमुख भूमिका होती. बंगालातील १९४३ सालच्या दुष्काळावर आधारित या नाटकाने दुष्काळग्रस्तांना त्याकाळी लाखांहून अधिक रुपयांचे अर्थसाह्य़ दिले होते. पुढे त्यांनी ‘टिनेर तलवार’, ‘अंगार’, ‘टिटुमीर’, ‘कल्लोळ’ अशा अनेक नाटकांमध्ये भूमिका केल्या. त्या लोकप्रिय ठरल्या. शोभा यांच्या अभिनयगुणांच्याच बळावर त्यांना मृणाल सेन यांच्या ‘एक अधूरी कहानी’मध्ये भूमिका मिळाली.

‘नबान्न’ नाटक डाव्या विचारांशी इमान सांगणारे. त्या वेळच्या बंगालात, रवीन्द्रनाथांचा विश्वशांतिवाद तरुणांना अपुरा आणि स्वप्नरंजक वाटे. ठोस काही केले पाहिजे, प्रसंगी विरोधात उभे राहिले पाहिजे, अशा मतांचे कलावंत डाव्याच विचारांकडे वळत होते. अगदी त्या वेळचे चित्रपटदेखील, रवीन्द्रनाथ आणि मार्क्‍स-लेनिन यांची सांगड घालू पाहात होते! शोभा यांनी चित्रपट केवळ पैशासाठी स्वीकारले, त्यापैकी एक धार्मिकही होता. पण डाव्या विचारांची साथ त्यांनी कधी सोडली नाही. उलट त्यांनीच, उत्पल दत्त यांना ‘लिटिल थिएटर ग्रुप’चे रूपांतर ‘पीपल्स थिएटर ग्रुप’मध्ये करावयास प्रोत्साहन दिले. नावातील हा बदल लहानसाच, पण वैचारिक दिशा स्पष्ट करणारा ठरला. डाव्यांचे सरकार बंगालमध्ये आल्यानंतरही या दाम्पत्याने सत्तांकित होण्याऐवजी पुरोगामित्व कायम ठेवले. साहजिकच, पश्चिम बंगालातील डाव्यांच्या राजवटीत एकही सन्मान, सत्कार शोभा सेन यांच्या वाटय़ाला आला नाही. त्यांना अलीकडे ‘मदर तेरेसा पुरस्कार’ हा पश्चिम बंगालचा एक प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला, तो ममता बॅनर्जी यांच्या हस्ते!

उत्पल दत्त यांनी आधी बंगाली नाटय़कलेच्या इतिहासात भर घातली आणि नंतर हिंदी चित्रपटांत लोकप्रियता मिळवली. अशी विरळा संधी शोभा यांच्याकडे कधी चालत आली नाही. पण त्यांनी १९७० पर्यंत केलेले काम ऐतिहासिकच म्हणावे लागेल. पुढे मात्र उत्पल यांच्या संदर्भातच जगायचे, उत्पल यांना प्रोत्साहन देत राहायचे, असे शोभा यांनी जणू ठरवून ठेवले असावे.