‘कधी काळी मला स्वप्नातही वाटले नव्हते की अमेरिकेतील एमआयटी व स्टॅनफर्डसारख्या संस्थांत काम करायला मिळेल, पण आता आता ते स्वप्न राहिले नाही ते वास्तव आहे,’ असे सांगणाऱ्या प्रा. थॉमस कैलथ यांचा भर आहे तो काम करण्यावर. दूरसंचार तंत्रज्ञानात त्यांचे संशोधन असले तरी ते विद्युत अभियंता व गणितज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. अलीकडेच त्यांना अमेरिकेतील मार्कोनी सोसायटीचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पुण्यात सीरियन ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या थॉमस यांचे शिक्षण सेंट व्हिन्सेंट शाळेत झाले. नंतर त्यांनी सरकारी अभियांत्रिकी विद्यापीठातून पदवी घेतली. नंतर ते अमेरिकेत गेले. त्यांनी मसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) या संस्थेतून पदव्युत्तर पदवी मिळवली. एमआयटीतून विद्युत अभियांत्रिकी विषयात डॉक्टरेट मिळवणारे ते जन्माने भारतीय असलेले पहिले विद्यार्थी. वयाच्या बाविसाव्या वर्षी अमेरिकेत आलेले प्रा. थॉमस सध्या स्टॅनफर्ड विद्यापीठात ‘हिताची अभियांत्रिकी प्राध्यापक’ आहेत. डॉक्टरेटनंतरच्या शिक्षणासाठी त्यांनी १०० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून, त्यापैकी २० ते २५ जणांच्या स्वत:च्या कंपन्या आहेत.

आधुनिक संदेशवहन क्षेत्रात मोलाचे संशोधन केल्याबद्दल त्यांना अमेरिकेतील मार्कोनी सोसायटीने जीवनगौरव पुरस्कार दिला आहे. संदेशवहन, संगणन, संदेश प्रक्रिया यातील अल्गॉरिदम त्यांनी विकसित केले आहेत. २००९ मध्ये त्यांना पद्मभूषण किताब देण्यात आला. नुकतेच त्यांना अमेरिकी अध्यक्षांचे पदकही मिळाले होते. रेडिओचा शोध लावणाऱ्या गुलिमो मार्कोनी यांच्या कन्या गिओया मार्कोनी ब्रॅगा यांनी स्थापन केलेल्या मार्कोनी सोसायटीचा पुरस्कार तरीही महत्त्वाचा ठरतो. लीनिअर सिस्टीम्स नावाचे हे त्यांचे पुस्तक म्हणजे सर्वाधिक वापरला जाणारा संदर्भग्रंथ आहे. त्यांनी अनेक  पेटंट्स घेतली असून, इंटिग्रेटेड सिस्टीम्स, न्यूमरिकल टेक्नॉलॉजीज यांसारख्या कंपन्यांचे ते सहसंस्थापक आहेत. कैलथ यांनी नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीच्या डिजिटल कम्युनिकेशन्स रिसर्च ग्रुप तसेच बेल लॅबमध्ये काम केले. कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत ते अभ्यागत प्राध्यापक आहेत. त्यांचेच विद्यार्थी असलेले स्टॅनफर्डमधील विद्युत अभियांत्रिकीचे जन्माने भारतीय प्राध्यापक आरोग्यस्वामी पॉलराज यांना २०१४ मध्ये (बिनतारी तंत्रज्ञानातील वेगवान पल्ल्यासाठी) मार्कोनी पुरस्कार मिळाला होता. डॉ. थॉमस यांचे बंगळूरु येथील  इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या संस्थेशी ३० वर्षांपासून संशोधन संबंध आहेत. १९७० मध्ये ते भारताच्या संरक्षण खात्याचे सल्लागार असताना भारतीय हवाई दलास मदत करू शकतील अशी संशोधन केंद्रे आयआयटीमध्ये सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर्स (आयईईई) या संस्थेचे ते फेलो आहेत. युनायटेड स्टेट्स नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंग व युनायटेड स्टेट्स नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस तसेच अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस, दि इंडियन नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंग या संस्थांचे ते सदस्य असून, सिलिकॉन व्हॅली इंजिनीअरिंग हॉल ऑफ फेम हा मानही त्यांना मिळाला आहे. त्यांच्यात असलेला प्रचंड आशावादच त्यांना संशोधनात पुढे आणण्यात कामी आला. तुम्ही अडचणीत असाल तर कुणी तरी मदतीला नक्कीच येते तसेच माझ्याबाबतीत झाले, त्यामुळे मी इथपर्यंत आलो अशी प्रांजळ कबुली ते देतात. त्यांच्या या गौरवातून विद्युत अभियांत्रिकीत काम करणाऱ्या बुद्धिमान तरुणांना नक्कीच प्रेरणा मिळेल यात शंका नाही.