एकदा शेजारी राहणारी दोन मुले त्यांच्याकडे आली व म्हणाली काका आमचे चित्र काढा. काकांनीही त्यांची चित्रे काढून दिली, तेच पुढे त्यांच्या व्यंगचित्रमालिकेतील पात्रे असलेली बोबन व मॉली बनले. या मुलांबरोबर असणारा कुत्राही त्यांच्या मालिकेची शोभा वाढवू लागला. टॉम्सकाका नंतर त्यांचे दोस्त बनले. हे टॉम्सकाका म्हणजे केरळमधील व्यंगचित्रकार व्ही.टी.थॉमस.
१९२९ मध्ये कुट्टनाड या केरळमधील भागात त्यांचा जन्म झाला, दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश लष्करात काही काळ काम केल्यानंतर ते व्यंगचित्रकलेकडे वळले ते कायमचेच. बोबनम मोलियम ही मल्याळी भाषेतील व्यंगचित्रमालिका मल्याळम् मनोरमा या नियतकालिकात ३० वष्रे अव्याहत प्रसिद्ध होत होती, केरळमध्ये त्यांनी व्यंगचित्रातून सामाजिक, राजकीय स्थितीवर भाष्य केले. त्यामुळे ही व्यंगचित्रमालिका घरोघरी बघितली जात होती. त्यावर नंतर अ‍ॅनिमेशन मालिकाही निघाली. १९८७ मध्ये त्यांनी मनोरमा सोडले. त्यानंतर या दोन पात्रांच्या स्वामित्व हक्काच्या वादात ते जिंकले. ते व्यंगचित्रकार होते तरी त्यांच्या चेहऱ्यावर मात्र कधी हास्य उमलले नाही. कदाचित सर्कशीतला विदूषक सर्वाना हसवतो पण जीवनात तो दु:खीच असतो तसे काही तरी त्यांच्याबाबतही असावे. बोबनम मोलियम या व्यंगचित्रमालिकेच्या व्यतिरिक्तही त्यांनी कुचुकुरूप, अपी हिप्पी, उन्नीकुट्टन, चेट्टन व चेट्टाथी ही व्यंगपात्रे लोकांपुढे सादर केली. मल्याळी लोकप्रिय संस्कृतीचा ती अविभाज्य अंग बनली. जात्याच खोडकर असलेल्या मुलांमधून त्यांच्या व्यक्तिरेखा जन्मल्या. मुलांना त्यांची व्यंगचित्रे आवडायची. तुमच्या बोबन व मॉलीचे वय किती आहे, असा प्रश्न त्यांच्याच कुट्टनाड गावच्या एका मुलीने त्यांना विचारला होता. त्यावर त्यांचे उत्तर साधे होते, त्यांचे म्हणणे या व्यक्तिरेखा वयाच्या पलीकडे आहेत. त्यांना आजी-आजोबा केले तर त्यांच्या अंगी खोडकरपणा शोभणार नाही. ते एकमेकांची फिरकी घेऊ शकणार नाहीत. त्यांच्या या व्यक्तिरेखा ज्यांच्यावर बेतल्या होत्या ते बोबन व मॉली खरोखर या जगात आहेत. बोबन आखातात तर मॉली ही अलापुझा येथे असते. मॉलीच्या नातवाच्या बारशालाही टॉम्सकाका गेले होते. व्यंगचित्र काढताना तुम्हाला जी चौकट दिली आहे त्याच्या मध्यभागी एकदम मोठे काही तरी काढू नका, कारण तसे केले तर तुम्हाला पाश्र्वभूमीतील गोष्टी दाखवायला जागाच उरणार नाही. व्यंगचित्रात शाब्दिक संवाद कमी ठेवा. तुम्ही घरात कागद-पेन्सिल घेऊन बसलात तर तुम्हाला व्यंगचित्रे काढता येणार नाहीत. त्यासाठी बाजारात फिरत जा, भवतालच्या व्यक्तींचे निरीक्षण करा, रेल्वे-बसने िहडा तेथे तुम्हाला काहीतरी वेगळे जाणवेल ते मनाने टिपून घ्या, मगच तुमच्या कॅनव्हासवर ही पात्रे हसतखेळत अवतरतील, असा मूलमंत्र त्यांनी दिला होता, तो कालातीतच आहे. केरळात टॉम्स या नावानेच ओळखल्या जाणाऱ्या थॉमस यांनी काल या जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांची व्यंगचित्रे मात्र सतत आठवत राहतील..