‘‘जमीन पक रही है’ या संग्रहानंतर केदारनाथ सिंह यांची कविता संपली, नंतर ते काव्यक्षेत्रात नुसतेच भटकत राहिले’..  ‘अज्ञेय हे माझ्या मते कवी नाहीत, मात्र त्यांची ‘शेखर एक जीवनी’ ही हिंदीतील एक सर्वश्रेष्ठ कादंबरी आहे’, अशी रोखठोक विधाने डॉ. विष्णू खरे केवळ प्रसिद्धीसाठी किंवा विद्रोह दाखवण्यासाठी करीत नसतात. त्यामागे असते पाच दशकांहून अधिक काळाची तपश्चर्या. हिंदी साहित्यातील  प्रतिभाशाली कवी, समीक्षक, अनुवादक अशी ओळख असलेल्या खरे यांना नुकताच नाशिकच्या यशवंतराव चव्हाण विद्यापीठातर्फे कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे जन्मलेल्या खरे यांचे शिक्षण झाले इंदूरला. इंग्रजी साहित्यात एमए केल्यानंतर काही काळ त्यांनी नई दुनियात पत्रकारिता केली.  त्या आधी म्हणजे १९५६ मध्ये त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या. महाविद्यालयात असताना टीएस इलियट हा त्यांचा आवडता कवी. त्यांच्या कविता त्यांनी हिंदीत आणल्या ‘मरु प्रदेश और अन्य कविताएॅँ’ या नावाने. १९६० मध्ये आलेल्या या अनुवादित काव्यसंग्रहाने विष्णू खरे या नावाची हिंदी साहित्याला दखल घ्यावी लागली.  सडेतोड व परखड लिखाणाबरोबरच त्यांचा स्वभावही जिद्दी होता. तत्त्वाशी तडजोड करणे शक्य नसल्याने अनेक नोकऱ्यांवर त्यांना पाणी सोडावे लागले. इंदूर, दिल्ली येथील महाविद्यालयांत ते काही वर्षे इंग्रजीचे प्राध्यापक होते. तेथून मग साहित्य अकादमीचे ते उपसचिव झाले. अनेक साहित्यिक उपक्रम त्यांनी सुरू केले. पण तेथील गटबाजीचा उबग आल्याने राजीनामा देऊन ते बाहेर पडले. त्या काळात ‘नभाटा’ हे बुद्धिजीवी वर्गाचे वृत्तपत्र मानले जाई. तेथे रुजू झाल्यानंतर रविवार पुरवणी त्यांनी दर्जेदार  केली. त्यांच्या लिखाणाने अनेक साहित्यिक वाद झडले. साहित्यिक चर्चाबरोबरच त्यांची चित्रपट समीक्षाही सुरू होती. वृत्तपत्राचे दैनंदिन काम करताना कवितालेखन व समीक्षेकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. एक गैर रूमानी समय में, खुद अपनी ऑँख से, पिछला बाकी हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. या काळात जर्मन लेखक गुंटर ग्रास यांच्या लेखनाने त्यांना झपाटले. ग्रास यांच्या कोलकात्यावरील वादग्रस्त पुस्तकाचा त्यांनी ‘जीभ दिखाना’ या नावाने अनुवाद केला, जो खूप गाजला. याशिवाय फिनलंडचे महाकाव्य (कालेवाला) तसेच श्रीकांत वर्मा व भारतभूषण अग्रवाल यांच्या पुस्तकांचा हिंदीतून इंग्रजीत अनुवाद केला. हिंदी पत्रकारितेत दिल्ली, लखनऊ, जयपूर येथे त्यांनी विविध पदांवर दीर्घकाळ काम केले. तेथेही मतभेद झाल्याने मग तीही नोकरी त्यांनी सोडली. दिवंगत पंतप्रधान नरसिंह राव यांच्याशी त्यांचे अत्यंत निकटचे संबंध होते. हिंदी साहित्यात स्वत:ची वेगळी ओळख असलेल्या खरे यांना रघुवीर सहाय स्मृती पुरस्कार, भवानीप्रसाद मिश्र स्मृती पुरस्कार, शिखर सम्मान अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.