आजच्या काळात राजनयामध्ये देशातील लोकांच्या भावनांकडे लक्ष देण्याऐवजी आंतरराष्ट्रीय समुदाय काय म्हणेल याची चिंता अधिकाऱ्यांना वाटत असते. यापूर्वी यूपीए सरकारच्या काळात चीनने आपल्या बऱ्याच कुरापती काढल्या होत्या. त्यावर तत्कालीन संरक्षणमंत्री ए के अँटनी हे १९६२ च्या भारत-चीन युद्धातील काही चुकांमुळे चीन तसे करण्यास धजावत आहे, असे सांगून हात झटकून मोकळे झाले होते. अर्थात त्यांचे बोलविते धनी राजनतिक अधिकारीच होते. पाकिस्तान, चीन व आता नेपाळ या तीन आघाडय़ांवर राजनयात मोदी सरकारला झुंजावे लागणार आहे. या परिस्थितीत चीनमध्ये राजदूत म्हणून विजय केशव गोखले यांची नियुक्ती सरकारने केली आहे.
ते १९८१ च्या तुकडीतील भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी आहेत. सुजाता सिंह यांना परराष्ट्र सचिवपदी नेमल्यानंतर गोखले यांना त्यांच्या जागी जर्मनीत राजदूत नेमले होते. आता त्यांना चीनचे राजदूत करण्यात आले आहे. परराष्ट्र सचिव जयशंकर यांनी स्वत: लक्ष घालून गोखले यांची नियुक्ती या पदावर केली आहे. गोखले याआधी जानेवारी २०१० मध्ये मलेशियात भारताचे राजदूत होते. हाँगकाँग, हनोई, बीजिंग व न्यूयॉर्क येथील दूतावासांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. भारताच्या परराष्ट्र खात्यात चीन व पूर्व आशिया विभागाचे संचालक, पूर्व आशिया विभागाचे सहसचिव म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. चिनी भाषाच नव्हे तर तेथील राजनतिक व्यवहारांची त्यांना माहिती आहे. कारण त्यांनी तिथे आधी काम केलेले आहे. त्यांचा विवाह वंदना गोखले यांच्याशी झालेला असून त्यांना एक मुलगा आहे. अशोक कांता हे चीनमध्ये आतापर्यंत राजदूत होते त्यांची जागा गोखले घेणार आहेत. सध्याची परिस्थिती पाहता चीनमधील राजदूत पद सांभाळणे आव्हानात्मक आहे. त्याचबरोबर एक जमेची बाजू म्हणजे भारताची आíथक स्थिती उंचावत असल्याने राजनयाला आíथक आवाजाची साथ लाभली आहे. त्याच्या जोडीला राष्ट्रवादी विचारांचे सरकार सत्तेत आहे. यूपीए सरकारच्या काळात राजनतिक व्यवहारात बऱ्याच चुका झाल्या होत्या. त्यात गोखले हे बळी पडले होते. चीन हे त्यांचे विशेष क्षेत्र आहे हे माहिती असूनही त्यांना जर्मनीत राजदूत नेमण्यात आले होते हा अन्याय आता दूर झाला आहे व देशालाही त्यांच्या नियुक्तीचा खरोखर फायदा होणार आहे. भारतातील बाजारपेठ व सुरक्षा या दोन्हींचे रक्षण करण्याची अवघड जबाबदारी आता गोखले यांच्यावर आहे.