पावसाळा कितीही हवाहवासा, रोमँटिक म्हटला तरी वॉडरोबच्या बाबतीत तो खर्चीक वाटायला लागतो. आपल्याला शॉपिंगसाठी नवं आणि उत्तम कारण मिळतं खरं; पण कपाटातल्या अध्र्याअधिक कपडय़ांना केवळ ‘पाऊस आहे’ म्हणून रजा द्यावी लागते. त्यामुळे वॉडरोब आधीच निम्मा होतो. ज्वेलरी, बॅग्स, अ‍ॅक्सेसरीज यांची तऱ्हा तर कपडय़ांपेक्षा निराळी. ते रोज वापरले तरी खराब होतात आणि कपाटात ठेवून दिले तरी खराब होतात. वॉडरोबमधल्या अशाच पावसाळ्यात आजारी पडणाऱ्या अ‍ॅक्सेसरीजची काळजी कशी घायची, याबद्दल आज आपण बोलू या. पावसाळ्यातसुद्धा तुमचा लुक अप टू डेट कसा ठेवता येईल, याविषयी टिप्स..
पाऊस आणि लेदर याचं साताजन्माचं वैर आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याची चाहूल लागताच लेदरच्या बॅग्स, शूज, वॉलेट, जॅकेट कपाटात जाऊ द्या आता. पण या वस्तू कपाटातील कोपऱ्यात चार महिने पडून राहिल्या, तरी त्यांना कपाटातील दमटपणामुळे बुरशी येते. त्यामुळे कपाटात ठेवण्याआधी त्यांना छानपैकी पुसून घ्या. शूज, बॅगेच्या रिकाम्या रकान्यात कागदाचा बोळा किंवा कापूस टाकून ठेवा. जेणेकरून त्यातला जादाचा दमटपणा शोषला जाईल. त्यानंतर एखाद्या कापडी किंवा नॉन वोव्हन पिशवीत टाकून मग या वस्तू कपाटात ठेवा. पावसाळ्यात वापरात न येणाऱ्या बाकीच्या अ‍ॅक्सेसरीजसुद्धा अशाच प्रकारे वेगवेगळ्या कपाटात ठेवा.

फुटवेअर
पावसाळ्याची चाहूल लागताच शूज, सॅन्डल खरेदीसाठी आपली लगबग सुरू होते. नेहमीच्या वापरातील शूज पावसाळ्यात वापरता येत नाहीत. पण पावसाळी शूजसुद्धा थेट पावसात वापरण्याआधी काही दिवस घरात किंवा ऑफिसमध्ये वापरून पहा. बऱ्याचदा या शूजमुळे शुबाइट होतं. पावसात ती जखम अधिक चिघळते. त्यामुळे हे शूज आधी वापरलेले असतील तर उत्तम. तरीही शुबाइटची भीती असेल, तर तळव्यांच्या मागच्या बाजूला, बोटांना थोडी पेट्रोलिअम जेली, तेल लावून मग चपला घाला. सध्या बाजारात पावसाळ्यासाठी खास कॉग्स, सँडल्स आल्या आहेत. नेहमीच्या प्लॅस्टिकच्या बॅलरिनाला हा छान पर्याय आहे. शक्यतो मणी, स्टड असलेल्या चपला पावसाळ्यात वापरू नका. त्यांचा खरखरीत भाग तळव्यांना घासून जखम होण्याची शक्यता असते. तसेच पावसात भिजून आल्यावर चिखलात माखलेली चप्पल व्यवस्थित साफ करूनच पुन्हा वापरा. भिजलेली चप्पल रात्रभर पंख्याखाली सुकवून दुसऱ्या दिवशी वापरणे कधीही उत्तम. तसेच ऑफिसमध्ये दिवसभर भिजलेली चप्पल घालण्यापेक्षा चप्पलचा एक जादा जोड स्वत:जवळ बाळगा. त्यामुळे पायांनाही आराम मिळेल.

हँडबॅग
नवीन बॅग खरेदी केल्यावर त्यात ठेवलेली कागदाची छोटी पुरचुंडी तुम्ही पाहिली असेलच. बॅग घरी आणल्याबरोबर त्याची रवानगी थेट कचऱ्याच्या डब्यात होते. पण हीच पुरचुंडी पावसाळ्यात खूप महत्त्वाची असते. या पुरचुंडीत सिलिका असतात. दमटपणामुळे बॅग खराब होऊ नये म्हणून त्या बॅगेत ठेवलेल्या असतात. पावसाळ्यात बॅग कपाटात असो वा रोजच्या वापरात त्यात ही एक पुरचुंडी असणे गरजेचे आहे. त्यामुळे बुरशी येण्याचे प्रकार घडत नाहीत. बरेचजण पावसाळ्यात बॅगेतील सगळ्या वस्तू प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून मग बॅगेत भरतात. त्यामुळे डायरी, मेकअप कीट पावसात भिजून खराब होत नाही. हे जरी योग्य असलं, तरी असं करताना आतून ओल्या झालेल्या बॅगेकडे मात्र दुर्लक्ष होतं. त्यामुळे रात्री घरी आल्यावर बॅग उलट करून व्यवस्थित सुकवायला विसरू नका. यासाठी हेअरड्रायरसुद्धा वापरू शकता. यंदा पावसाळ्यासाठी खास पॉलिस्टर, पीव्हीसी प्लॅस्टिकच्या बॅग्स बाजारात आल्या आहेत, त्या नक्की वापरा.

ज्वेलरी
पावसाळ्यात शक्यतो नाजूक, बारीक ज्वेलरी वापरणं टाळाच. एकच बोल्ड कड, मोठ्ठ इअररिंग किंवा नेकपीस वापरा. सुटसुटीत ज्वेलरी कॅरी करायलासुद्धा सोप्पी असते. पावसाळ्यात लाकडी ज्वेलरीचा रंग सुटतो, मेटल ज्वेलरी गंजते, ज्यूटची ज्वेलरी भिजून खराब होते, अशा वेळी प्लॅस्टिक ज्वेलरी हा उत्तम पर्याय ठरतो. कपाटातल्या ज्वेलरीचीसुद्धा या दिवसात काळजी घेणं गरजेचं आहे. प्रत्येक ज्वेलरी वेगवेगळ्या पिशवीत किंवा झिपलॉक बॅगेत घालून ठेवा. गंज चढणारे नेकपीस, बांगडय़ा एकमेकांच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी घ्या. इअररिंगचे हुक, नेकपीसचा लॉक ही पटकन गंज चढणारी ठिकाणे आहेत आणि त्यांचा शरीराशी थेट संबंध येतो. त्यामुळे कानाला, मानेला इजा होऊ शकते. अशा वेळी हुक्स, लॉकना पारदर्शी नेलपेंटचा एक कोट द्यायला विसरू नका.

– मृणाल भगत