एलन मस्क. हे नाव तुम्हाला माहीत नसेल तर ही थोडीशी ओळख. अब्जाधीश आणि सोलार सिटी, स्पेस एक्स व टेस्लाचा सर्वेसर्वा. टेस्ला ही कार तयार करणारी कंपनी. त्याही साध्यासुध्या नव्हे तर समस्त वाहन जगताला अस्वस्थ करणारी. जेव्हा आपण भविष्यातील तंत्रज्ञानाविषयी बोलतो तेव्हा दशकापूर्वी त्याची अंमलबजावणी करणारा हा माणूस.
सर्व काही इलेक्ट्रिकवर तयार करण्यासाठी कारनिर्मितीच्या शोधातला हा माणूस. काही वर्षांनी त्याने मॉडेल एस तयार केलं. तेही मर्सिडिज बेन्झ, बीएमडब्ल्यू, फोक्सवॅगन, टोयोटाच्या तोडीचं. दहा वर्षांतच ही कार भन्नाट ठरली ती त्यातील सर्व काही विजेरी यंत्रणेमुळे.
यापूर्वी कधीही पाहिला नसेल असा लूक या गाडीला होता. शिवाय इंधन क्षमता, वेग आदीही तोडीची. सर्वत्र अत्याधुनिकतेचा वापर करण्यात आला होता. त्वरित बॅटरी चार्ज करण्याची सुविधाही होती. कारच्या केबिनमध्येही कुठेही हाताने अथवा बोटाने स्पर्श करून यंत्रणा सुरू होणारी पद्धती नव्हती. त्यातील स्क्रीनही हाय रिझोल्यूशन्सचे. कारच्या मध्यभागी चालकाशेजारी नेव्हिगेशन डिस्प्ले ज्याद्वारे माहिती डोळ्यासमोर अगदी असायची. स्मार्टफोनप्रमाणे कारमध्येही अद्ययावत करता येणारं सॉफ्टवेअर. रस्त्यावरील रांगेतून (लेन) बाहेर पडणारी सूचना आणि ब्रेकिंग सिस्टीमही.
९० किलोवॅट बॅटरीवर ही कार अल्पावधीत मोठा वेग व अंतर पकडत असे. एकदा का पूर्ण चार्ज झाली ती ४०० किलोमीटरचं अंतर सहज कापे. वाहन क्षेत्रातला हा महत्त्वाचा टप्पा होता. एकूणच टेस्ला ही तिच्या स्पर्धकांच्या खूपच पुढे होती.
२.८ सेकंदात शून्यावरून १०० किलोमीटर प्रति तास वेग पकडण्याचंही तिचं सामथ्र्य. ६९० बीएचपी पॉवर इंजिन असलेली टेस्ला ही लॅम्बोर्गिनी अव्हेन्टेडरलाही लाजवणारी.
२०१८ मध्ये तर ही कार केवळ स्मार्टफोनवरून आपल्या सूचना घेईल, अशी होईल. म्हणजे फोनवरून तुम्ही तिला पार्क करण्याचे अथवा आपल्या दाराशी येण्याचे आवाहन केले तरी ते ती सहज पेलेल. आता आणखी काय बोलायचं..