क्रूझर मोटरसायकल प्रकार आपल्याकडे फारसा प्रचलित नसला तरी त्याचा एक विशिष्ट चाहता वर्ग आहे. त्यामुळे या सेगमेंटमधील मासमार्केट प्रॉडक्टमध्ये दोन कंपन्यांच्या मोटरसायकलच उपलब्ध आहेत. बजाज ऑटोची अ‍ॅव्हेंजर आणि रॉयल एन्फिडल्डची थंडरबर्ड. रॉयल एन्फिल्डने प्रथमच आपल्या बुलेट ब्रॅण्डपेक्षा वेगळ्या धाटणीची मोटरसायकल बाजारात आणण्याचा निर्णय सुमारे १७ वर्षांपूर्वी घेतला. पारंपरिक मोटरसायकलपेक्षा वेगळी, ताकदवान, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी मोटरसायकल बाजारपेठेत आणणे हा त्यामागचा उद्देश होता. त्यातून २००० मध्ये थंडरबर्ड या मोटरसायकलचा जन्म झाला. ही मोटरसायकल क्रूझर प्रकारची असल्याने रचनाही वेगळी आहे. या मोटरसायकला सध्या जे ट्विन स्पार्क प्लग इंजिन आहे, ते पूर्वी नव्हते. २००० मध्ये थंडरबर्ड लाँच करताना त्यास फाइव्ह स्पीडचे साडेतीनशे सीसीचे इंजिन बसविण्यात आले होते. याच काळात बजाज कावासाकीची एलिमिनेटर ही १८० सीसीची क्रूझर मोटरसायकल बाजारात उपलब्ध होती. त्या तुलनेत थंडरबर्डचे इंजिन दमदार होते. त्यामुळेच रॉयल एन्फिल्डच्या या नव्या मोटरसायकलला यश मिळाले. मात्र, ते मर्यादितच होते. कारण, आपल्याकडे मोटरसायकलचा हा प्रकार नवीन होता आणि लाख रुपयांची मोटरसायकल घेण्याएवढी भारतीय बाजारपेठ तयार झालेली नव्हती, पण भारतीय बाजारपेठेत नव्या उत्पादनांना पुढे जाऊन नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा वाहन कंपन्यांना होती. देशातील वाढत्या माहिती तंत्रज्ञान उद्योगाने वाढीचा वेग पकडण्यास सुरुवात केली होती आणि नव्या रोजगार संधीबरोबर क्रयशक्तीही वाढत होती. त्यामुळेच पुढे जाऊन भारतात दीडशे सीसीपेक्षा अधिक सीसीच्या मोटरसायकल बाजारात आल्या. २००७ नंतर लाइफस्टाइल मोटरसायलना चांगली बाजारपेठ तयार झाली होती. त्यातूनच रॉयल एन्फिल्डने थंडरबर्डनचे नवे मॉडेल २००९ मध्ये लाँच केले. यात अनेक महत्त्वाचे बदल झाले. मुख्य बदल म्हणजे मोटरसायकलला नवे साडेतीनशे सीसीचे ट्विन स्पार्क टेक्नॉलॉजीचे इंजिन बसविले. यानंतरही काळाची गरज ओळखून कंपनीने २०१२ मध्ये पुन्हा थंडरबर्डचे नवे मॉडेल लाँच केले. यात पाचशे सीसी असलेल्या मॉडेलचा पर्याय देण्यात आला. यातील साडेतीनशे सीसीचे मॉडेल जास्त प्रचलित आहे.

सध्याच्या साडेतीनशेच्या मॉडेलमध्ये हॅलोजन लॅम्प, डिस्कब्रेक, इलेक्ट्रिक स्टार्ट, बॅक रेस्ट, सॅडल सीट, स्प्लिट सीट, डिजिटल स्पीडोमीटर, फ्यूएल मीटर, एलईडी टेल लॅम्प याचबरोबर नायट्रॉक्स सस्पेन्शन दिले आहे. तसेच, यावरून लांबचा प्रवास केला जाणार हे लक्षात घेऊन टाकी २० लिटरची टाकी दिली आहे. इंजिनची पॉवर २० बीएचपी असल्याने पिकअप नक्कीच चांगला आहे. मोटरसायकलचे सस्पेन्शन चांगले आहे. त्यामुळे खड्डय़ातून वा खडबडीत रस्त्यावरून जाताना जास्त धक्के जाणवत नाहीत. हायवेवर ड्रायिव्हग करताना दोन व्यक्ती बसल्या असतील तर ताशी ८० ते १०० किमी वेग जाणवत नाही. अर्थात, आपल्याकडील रस्ते, वाहतुकीची शिस्त पाहता किती वेगाने मोटरसायकल चालवायची हा वैयक्तिक विषय आहे. हायवेवर थंडरबर्ड चालविताना क्रूझरची मजा नक्कीच मिळते. तसेच, प्रवासाचा फटीक जाणवत नाही. शहरात थंडरबर्ड चालविणे जरा धाडसाचेच आहे.

कारण मोटरसायकलचे क्रॅब वेट १९२ किलो असून, एकूणच मोटरसायकल मोठी असल्याने ट्रॅफिकमध्ये वा शहरातील रस्त्यावर सतत बदलाव्या लागणाऱ्या गिअरमुळे आणि वजनामुळे ही मोटरसायकल चालविणे तापदायी वाटू शकते. अर्थात, थंडरबर्ड ही शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बनविण्यात आलेली नाही. तिचा प्रमुख उद्देश हा वीकेंड अन् लीजर मोटरसायकिलग आहे. त्यामुळे शहरातील कम्युटिंग हा मुख्य उद्देश असल्यास विचार करायला हवा.

शहरात मोटरसायकलचे मायलेज प्रति लिटर ३२-३५ किमी मिळू शकते. हायवेवर ते प्रति लिटर ३५-४० किमी मिळण्याची अपेक्षा आहे.

मोटरसायकलची किंमत दीड लाख रुपयांच्या पुढे आहे. वीकेंड वा लाँग ड्रायिव्हग करणाऱ्यांसाठी साडेतीनशे सीसीच्या सेगमेंटमध्ये ही मोटरसायकल एक चांगला पर्याय ठरू शकेल. अर्थात, प्रत्येकाला कशा प्रकारची मोटरसायकल आवडते हेही महत्त्वाचे आहे.

obhide@gmail.com