बजाजच्या प्रत्येक गाडीचे बाजारात दणक्यात स्वागत होते. मग ती पल्सर असो वा डिस्कव्हर किंवा मग अ‍ॅव्हेंजर. प्रत्येक गाडीने आपला असा एक खास चाहतावर्ग तयार केला आहे, आणि तिचा तो निस्सीम भक्त आहे. बजाजची आणखी एक गाडी सध्या चच्रेत आहे आणि ती म्हणजे व्ही१५ ही १५० सीसीची बाइक. अल्पावधीतच या गाडीने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. आयएनएस विक्रांत या युद्धनौकेच्या धातूचा परीसस्पर्श लाभलेली व्ही१५ देशभक्तीचे प्रतीकच बनलीए जणू..
भारतीय नौदलाची शान असलेली आयएनएस विक्रांत ही विशाल युद्धनौका प्रदीर्घ सेवेनंतर दोनेक वर्षांपूर्वी मुंबई बंदराच्या गोदीत विसावली. या युद्धनौकेचे विशाल अशा तरंगत्या स्मारकात रूपांतर केले जावे, ही प्राथमिक संकल्पना होती. मात्र, सरकारी लालफितीत हा प्रस्ताव गटांगळ्या खात गेला आणि विक्रांत तशीच गोदीत विसावून राहिली. अखेरीस ती मोडीत काढावी लागली. मात्र, विक्रांतच्या खाणाखुणा जपल्या जाव्यात, तिचा अधिकाधिक सदुपयोग व्हावा या हेतूने तिच्या धातूपासून दुचाकी निर्मिती करण्याचा प्रस्ताव पुढे आला आणि त्यातूनच मग बजाजच्या व्ही१५ची (इनव्हिन्सिबल) निर्मिती झाली. बाकीचा इतिहास तुमच्या समोर आहे. व्ही१५ला जन्मापासूनच प्रचंड लोकप्रियता मिळालेली आहे. मर्यादित स्वरूपात उपलब्ध असलेली ही गाडी आपल्याला मिळावी यासाठी ग्राहकांमध्ये चढाओढ लागली आहे. कोणी याला देशभक्तीची मोजपट्टीही लावली आहे.
वस्तुत संपूर्ण व्ही१५ ही गाडी विक्रांतच्या धातूपासून बनवण्यात आलेली नाही. व्ही१५ची इंधनटाकीच फक्त विक्रांतच्या धातूपासून बनवण्यात आली आहे. गाडीचा हाच एक आकर्षणिबदू आहे. या इंधनटाकीवर विक्रांतचा दिमाखदार लोगोही आहे. घसघशीत १३ लिटरची क्षमता असलेली ही इंधनटाकी दणकट आणि व्यवस्थित मोठी आहे. गाडीच्या पुढील बाजूचा बरासचा भाग इंधनटाकी व्यापून आहे.
व्ही१५ तशी उंचीने कमी आहे. मात्र, चांगलीच दणकट आणि जड आहे. तुम्ही गाडीवर बसलात की हँडलबापर्यंत हात पोहोचायला थोडे तुम्हाला हात स्ट्रेच करावे लागतात. कारण इंधनटाकीच्या आकारामुळे गाडीचे सीट जरा मागे आहे, त्यामुळे सुरुवातीला थोडेसे अवघडलेपण वाटते मात्र सवयीने हँडलबार पकडणे सोपे होते.
सीट बऱ्यापकी मोठी आहे. म्हणजे दीर्घपल्ल्याच्या प्रवासासाठी उपयुक्त ठरू शकेल अशी सीट आहे. एकटय़ाने प्रवास करायचा असेल तर सीटला मागे काऊल (एक प्रकारचे प्लास्टिक आवरण) देण्यात आले आहे. त्यासाठी एक अ‍ॅलिन की देण्यात आली आहे. याची सुविधा गाडीच्या चावीबरोबरच देण्यात आली आहे. तुम्ही जर दोघेजण प्रवास करीत असाल तर हे काऊल काढूनही ठेवता येते. गाडीच्या चावीच्या बाजूला एक विशिष्ट अँगल देण्यात आला असून त्याच्या सा’ााने हे काऊल काढता येते. पिलियन रायडरला मागे बसताना आरामदायी वाटावे यासाठी गाडीच्या मागच्या बाजूला आणि सीटच्या खाली अशा दोन्ही ठिकाणी ग्रॅब रेलची सुविधा आहे. मागे बसणाऱ्याला त्यामुळे दीर्घपल्ल्याच्या प्रवासातही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.
गाडीचे दोन्ही (टय़ुबलेस) टायर जरा फ्लॅट आहेत. रस्त्यावरची त्यांची पकड मजबूत वाटते. त्यामुळे अगदी खडकाळ रस्त्यावरही व्ही१५ व्यवस्थित चालू शकते. शॉक एॅब्झॉर्बर्स उत्तम असल्याने फारसे धक्के जाणवत नाहीत. या शॉक एॅब्झॉर्बर्समध्ये एक विशिष्ट प्रकारचा वायू वापरण्यात आला आहे. गाडीचे टेललॅम्प आकर्षक आहेत तर हेडलाइट ऑरथॉडॉक्स वाटतात. बाकी स्पीडोमीटर, ओडोमीटर, फ्युएल इंडिकेटर या सुविधा आहेतच.

अनुभव..
बजाजची ही बहुचíचत गाडी चालवताना आपण एखाद्या सामान्य गाडीवर बसल्यासारखाच अनुभव येतो. मात्र, गाडीने एकदा पिकअप घेतला की तिच्यातली स्ट्रेन्थ जाणवायला लागते. गाडी दणकट आणि जड वाटली तरी थोडय़ाशा पिकअपनंतर व्हायब्रेट होते, असे जाणवले. तसेच गीअर शिफ्ट करताना गाडी पटकन रेस होत नसल्याचेही निदर्शनास आले. मात्र, या तांत्रिक अडचणी वगळता गाडी चालवण्याचा अनुभव भन्नाट होता.

इंजिन – बजाजच्या या गाडीसाठी डीटीएस-आय हे इंजिन वापरण्यात आले आहे. एअर कूल्ड असलेले सिंगल सििलडर आणि ट्विन स्पार्कचे आहे. गाडीचा पिक अप चांगला आहे. फायिरग थोडे रिजिड वाटते. विशेषत गाडीवरचा लोड वाढला तर फायिरगच्या आवाजात बदल होतो, हे जाणवले.

मायलेज पल्सर आणि डिस्कव्हरच्या तुलनेत व्ही१५चा मायलेज चांगला वाटतो. ही गाडी प्रतिलिटर ६० किमीपर्यंतचा मायलेज देते. हमरस्त्यावरचा हिचा हा मायलेज आणखी थोडा वाढू शकतो. शहरात, वाहतूक कोंडीत व्ही१५ आरामात क्रूझ करू शकते.

गीअर सिस्टीम
पाच गीअर. सर्व गीअर खाली
ब्रेक सिस्टीम
पुढील बाजूला डिस्क ब्रेक असून मागे ड्रम ब्रेकची सुविधा आहे.

इंधन टाकीची क्षमता
१३ लिटर
या रंगांत उपलब्ध
पर्ल व्हाइट आणि एबोनी ब्लॅक
किंमत
६२ हजार रुपये
(एक्स शोरूम किंमत)
विनय उपासनी vinay.upasani@expressindia.com