उत्सव काळात वाहन घेण्यावर अधिक भर असतो. त्यामुळेच साडेतीन लाख ते साडेअकरा लाख रुपयांमध्ये कोणते पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यातील पर्याय चांगले कोणते असू शकतात, याचा घेतलेला आढावा.

सण-उत्सवांमध्ये वाहन खरेदीचे वेध नक्कीच संभाव्य ग्राहकांच्या मनात येत असतात. त्यासाठी सर्वप्रकारचे पर्याय म्हणजे बाजारात सध्या कोणते नवे मॉडेल आले आहे, किंमत किती आहे, देखभाल खर्च किती, विक्रीपश्चात सेवा कशी, रिसेल मूल्य आणि विशिष्ट सेगमेंटमधील मॉडेल कोणते चांगले आहे, असा ऊहापोह नक्कीच होतो. भारतीय कार बाजारपेठ एंट्री लेव्हल कार ते प्रीमियम अशा सेगमेंटमध्ये विस्तारलेली आहे.

तीन ते साडेचार लाख रुपयांचा सेगमेंट

या सेगमेंटमध्ये एंट्रीलेव्हल स्मॉल कार म्हणजे मारुती सुझुकी अल्टो ८०० व के १० याचबरोबर रेनॉ क्विड ८०० व क्विड १००० सीसी या कार येतात. क्विड १००० सीसी हे क्विड कारचे पॉवरफुल मॉडेल आहे. त्याचप्रमाणे अल्टो के१० हे अल्टो ८००चे पॉवरफुल मॉडेल आहे. डॅटसन रेडी गो ही कारही ८०० व १००० सीसीमध्ये आहे. पण, डॅटसन हा ब्रॅण्ड फारसा प्रचलित झालेला नाही. सध्या या सेगमेंटचा विचार केल्यास अल्टो के १० व क्विड १००० सीसी यांचा विचार होऊ  शकतो. अर्थात, या दोन्ही कार आकाराने लहान आहेत. त्यामुळे मागील सीटवर तीन व्यक्तींना अडचण होते. या सेगमेंटमध्ये नसलेली मात्र रास्त किमतीमुळे नक्कीच विचार करायला लावणारी कार आहे. टाटा मोटर्सची टियागो ही एंट्री लेव्हल हॅचबॅक कार आहे. मात्र, किंमत, फीचर, स्टाइल, लुक, स्पेसमुळे ही कार नक्कीच फेव्हरेट ठरू शकते.

क्विडची लांबी ३६७९ एमएम, रुंदी १५७९ एमएम, उंची १४७८ एमएम व व्हीलबेस २४२२ एमएम, ग्राऊंड क्लिअरन्स १८० एमएम आहे.

टियागोची लांबी ३७४६ एमएम, रुंदी १६४७ एमएम, उंची १५३५ एमएम, व्हीलबेस २४०० एमएम, १७० एमएम आहे. अल्टो, क्विड यांच्या तुलनेत टाटा मोटर्सची टियागो नक्कीच मोठी असून, सीसीही १२०० आहे. पॉवर जास्त असली तरी मायलेज प्रति लिटर २३.८४ किमी आहे. अर्थात, हा कंपनीचा दावा आहे. शहरात प्रति लिटर १५ ते १६ किमी मायलेज मिळते. टियोगाला चांगले मायलेज मिळण्यासाठी सिटी आणि इको मोड पर्याय दिला त्यामुळे मायलेज चांगले मिळण्यास मदत होते, असे कंपनीचे म्हणणे आहे. क्विड, अल्टो या कारच्या (एक हजार सीसी) किमती ३.३५ ते ३.४५ लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरू होतात. टियागो कारच्या बेस मॉडेलची किंमत ३.२६ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तसेच डिझेल मॉडेल ४.०३ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) आहे. त्यामुळे साडेतीन ते चाडेचार लाख रुपयांचे बजेट असणाऱ्यांनी टियागोची टेस्ट ड्राइव्ह घेऊन निर्णय घ्यावा.

एंट्री लेव्हल कॉम्पॅक्ट सेदान

या सेगमेंटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मारुती सुझुकीच्या स्विफ्ट डिझायर या कारचे वर्चस्व राहिले आहे. अर्थात, ह्युदाई अ‍ॅक्सेंट, फोर्ड फिगो अ‍ॅस्पायर या कार नक्कीच या सेगमेंट असून, त्यांची स्वत:ची बाजारपेठ आहे. आपले स्थान कायम राहावे यासाठी सुझुकीने स्विफ्ट डिझायरचे पूर्णपणे नवे मॉडेल या वर्षी बाजारात लाँच केले आहे. पहिल्या मॉडेलच्या तुलनेत मोठे आणि अधिक आकर्षक, असे मॉडेल आहे. तसेच, ही कार लाँच करतान स्विफ्ट हा टॅग काढून डिझायर, असे मार्केटिंग कंपनीने केले आहे. पहिल्या मॉडेलच्या तुलनेत अधिक फ्यूएल एफिशियंट कार आहे. तसेच, फ्लिट बायर वा टॅक्सीसाठी ही उपलब्ध नाही. त्यासाठी कंपनीने पूर्वीचे मॉडेल स्विफ्ट डिझायर टूर म्हणून स्वतंत्र ठेवले आहे. त्यामुळे या सेगमेंटधील कार घेणाऱ्यांना व्हॅल्यू फॉर मनी, लो कॉस्ट ओनरशिपसाठी डिझायर नक्कीच चांगली आहे. त्यानंतर ह्युदाई एक्सेंटचा विचार करता येऊ  शकतो.

साडेचार ते सहा लाख रुपये

या सेगमेंटमध्ये हॅचबॅक कार येतात. ह्युदाई ग्रॅण्ड आय १०, मारुती इग्निस या कार आहे. या सेगमेंटमधील सर्वाधिक विकली जाणारी मारुती स्विफ्टचे पूर्णत: नवे मॉडेल बाजारात येणार आहे. त्यामुळे सध्या असणारी स्विफ्ट घ्यायची का नाही, हा निर्णय कार घेणाऱ्या घ्यावा. मारुतीची इग्निस ही क्रॉसओव्हर प्रकारची कार असून, विक्रीही नेक्सा नेटवर्कमार्फत होत आहे. इग्निस ही पारंपरिक मॉडेलचा विचार करणाऱ्याला भावेलच असे नाही. याच सेगमेंटमध्ये ुंदाईची ग्रॅण्ड आय १० आहे. ुंदाईने याच वर्षी ही कार नव्या रूपात लाँच केली आहे. फीचर, मायलेज, रिसेल मूल्य विचारात घेता या सेगमेंटमध्ये ही कार खरेदासाठी दावेदार आहे. अर्थात, मॉडेलनुसार किंमत वाढत जाते. साधारणपणे याच किंमतीच्या रेंजमध्ये कॉम्पॅक्ट सेदान कारचा एक पर्याय उपलब्ध आहे. टाटा मोटर्सने टिगॉरची किंमत पाच लाख रुपयांच्या (एक्स शोरूम) ठेवली आहे. त्यामुळे हॅचबॅकच्या किमतीत सेदान कार, असा विचार करता येऊ  शकतो. टिगॉरला स्वतंत्र डिक्कीचा खूप मोठा फायदा आहे. तसेच, कारही मोठी आहे. कॉम्पॅक्ट हॅचबॅक की एंट्रीलेव्हल कॉम्पॅक्ट सेदान, असा प्रश्न पडला असल्यास टेस्ट ड्राइव्ह नक्कीच घ्या.

बजेट साडेअकरा लाख रुपये असणाऱ्यांसाठी

सध्या एंट्री लेव्हल सेदान कार सेगमेंटमध्ये बरीच स्पर्धा सुरू आहे. होंडा सिटी, मारुती सुझुकी सियाझ, ह्युदाई व्हर्ना या कार फीचरमध्ये तगडय़ा असल्या तरी सियाझ मारुती सुझुकी या नावामुळे अर्थात, लो मेंटेनन्स कॉस्ट, उत्तम मायलेज आणि हो लुक्समुळे भाव खाते आहे. ुंदाईने व्हर्ना कारचे पूर्ण नवे मॉडेल सप्टेंबरच्या सुमारास बाजारात आणले. पहिल्या मॉडेलच्या तुलनेत ते रिफ्रेशिंग व सुरेख आहे. पण, मायक्रो हायब्रीड टेक्नॉलॉजी ही केवळ सियाझमध्येच आहे आणि या मॉडेलचे मायलेज प्रति लिटर २६ किमीच्या पुढे आहे. त्यामुळेच एकूण व्हॅल्यू फॉर मनीचा विचार केल्यास सियाझ या सेगमेंटमध्ये फेव्हरेट म्हणावी लागेल. याच किमतीमध्ये हा सेदान कारला कॉम्पॅक्ट एसयूव्ही पर्याय म्हणून उपलब्ध आहे. दोन्ही सेगमेंटची मजा वेगळी असली तरी निमशहरीभागात कॉम्पॅक्ट एसयूव्ही चांगला पर्याय आहे. तसेच, मोठय़ा एसयूव्हीचा काहीसा फील कॉम्पॅक्ट एसयूव्हीत येतो. या सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी व्हिटारा ब्रेझा, फोर्ड ईको स्पोर्ट, महिंद्र टीयूव्ही ३०० आणि नुकतीच लाँच झालेली टाटा मोटर्स नेक्सन आहे. सेगमेंटमध्ये व्हिटारा ब्रेझाला चांगली मागणी आहे. नेक्सॉन नक्कीच डिझाइन, फीचरमुळे अपिलिंग असली तरी नवीन आहे आणि याविषयी स्वतंत्र तुलना आवश्यक आहे. त्यामुळे एकूण विचार करता सध्या तरी व्हिटारा ब्रेझा या सेगमेंटमध्ये उजवी वाटते. अर्थात, प्रत्येकालाच संबंधित सेगमेंटमधील आम्हाला आवडलेले वाहन आवडेलच असे नाही. तसेच, कार घेण्यापूर्वी आपण सर्व कारची टेस्ट ड्राइव्ह घेऊन व तुलना करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घ्यावा.

ls.driveit@gmail.com