विविध घटकांवर नवी कार खरेदी अवलंबून असते. आणि प्रत्येकाच्या प्राधान्यानुसार ती खरेदीचा निर्णयही निराळा असतो. नवे वाहन खरेदी करताना हल्ली भारतीय तर वाहनातील आतील रचना आणि तिचा बाह्य़ भाग यावरही अधिक भर देतो.

असे असले तरी वाहन कंपनीचे ब्रॅण्ड आणि वाहन, वाहनाची परिणामकता हेही लक्षात घेतले जाते. इंजिन, मायलेज म्हटले की ‘कितना देती है’ असा आपसूक प्रश्न आलाच!

कोणत्याही वाहनासाठी तिचे इंजिन खूपच महत्त्वाचे. कंपन्याही ते तयार करीत असताना पुढील दहा वर्षांचा विचार करीत असतात. यासाठी एक उत्तम उदाहरण म्हणजे देशातील सर्वाधिक वाहने विकणारी कंपनी. व तिची १२४८ सीसी डिझेल इंजिनची कार. या इंजिनाचे अधिकृत नाव १.३ लिटर मल्टिजेट डिझेल इंजिन. विविध कंपन्यांच्या १८ वाहनांमध्ये ते बसविले जाते. ही वाहने भारतात धावतात. मारुतीच्या डिझेलवर धावणाऱ्या सहा वाहनांमध्येही हे इंजिन आहे. एकच इंजिन असले तरी निरनिराळ्या वाहनांचा चालविण्याचा अनुभव हा निराळा असतो.

कंपन्यांमध्ये एकच इंजिन वापरणे हे वाहन उद्योगासाठी काही निराळे नाही. अशा इंजिनाचे सुटे भाग विनासायास मिळणे, इंजिन विकसित करण्यासाठीचे संशोधन व विकासावरील कमी खर्च/ गुंतवणूक यामुळेही एकच इंजिन अनेक कंपन्या त्यांच्या विविध वाहनांसाठी वापरत असतात. कार तयार करणाऱ्या अनेक कंपन्या असे इंजिन ते तयार करणाऱ्यांकडून खरेदी करतात. आता याच १.३ लिटर मल्टिजेट डिझेल इंजिनचेच घ्या न. ते फियाट तयार करते. म्हणजेच समजा ते मारुतीच्या गाडय़ांमध्ये आहे आणि तुम्ही जर त्या वाहनाची वाहवा करीत असाल तर तुम्ही अप्रत्यक्षपणे फियाटचेच कौतुक करीत असता. आता हे सगळे सांगण्याचे कारणही मी तुम्हाला सांगतो. नुकताच मी मित्रांचा एक संवाद ऐकला. त्यानुसार, ते फियाटच्या गाडय़ांना पसंती देत नाहीत. कारण या कारच्या इंजिन गुणवत्तेबद्दल त्यांना साशंकता आहे. मला हे ऐकून हसू आले. आणि मग त्यांचाही गैरसमज दूर करावा लागला. फियाटच्या गाडय़ा या भारतातील आघाडीच्या १० मध्ये स्थान मिळवू शकत नाहीत. मात्र ज्या कार अव्वल आहेत त्यापैकी काहींमध्ये फियाटचे इंजिन आहे. आता यामुळे नक्कीच तुम्हाला एक नव्याने विचार करायला मिळाला असेल.

pranavsonone@gmail.com