मर्सिडीझ-बेन्झची एसयूव्ही श्रेणीतील जीएलएस-३५० ही गाडी गेल्या आठवडय़ात भारतीय बाजारपेठेत आली. या गाडीने एसयूव्हीची व्याख्या बदलून टाकली आहे. टॉप एण्ड ग्राहकांसाठी आरामदायक प्रवासाबरोबरच ऑफ रोड प्रवासासाठी दणकट फीचर्स असलेली ही गाडी त्या श्रेणीतील सर्वोत्तम गाडी ठरण्यास हरकत नाही.

मर्सिडीझ-बेन्झच्या ताऱ्याबरोबर भारतातील आबालवृद्ध जोडले गेले आहेत. अगदी पूर्वीपासून भारतात इम्पाला, ब्युक, पॅकार्ड अशा वेगवेगळ्या गाडय़ा नक्कीच होत्या. पण त्यातही मर्सिडीजचा दर्जा काही वेगळाच! या गाडीवर तीन दिशांना दर्शवणारा तो तारा आणि त्याभोवतीचा गोल हा लोगो म्हणजे आलिशानपणाचे द्योतक होते आणि आजही आहे. त्यामुळे भारतात दाखल होणाऱ्या या कंपनीच्या प्रत्येक गाडीला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येते. नुकतीच मर्सिडीझ-बेन्झने भारतात जीएलसी-३५० ही एसयूव्ही गाडी आणली. ‘लोकसत्ता’च्या वाचकांसाठी या गाडीची तोंडओळख..

सुरक्षा

आजकाल गाडी घेताना गाडीतील सुरक्षा व्यवस्थेकडे खूप बारकाईने लक्ष दिले जाते. पण मर्सिडीझ-बेन्झ कंपनीच्या जीएलएस-३५० या गाडीत सुरक्षेचा विचार खूपच बारकाईने केला आहे. त्यामुळे गाडी चालवताना ड्रायव्हर विनातणाव ड्रायिव्हगचा अनुभव घेऊ शकतो. ब्रेक असिस्ट तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक ऑल व्हील ड्राइव्ह प्रणाली, क्रूझ कण्ट्रोल प्रणाली, कव्‍‌र्ह डायनॅमिक असिस्ट प्रणाली आदी गोष्टींमुळे गाडी रस्त्यावरून धावताना अत्यंत सुखद आणि सुरक्षित अनुभव मिळतो. त्याशिवाय ड्रायव्हर, त्या बाजूचा प्रवासी आणि मधल्या रांगेत बसणारे प्रवासी यांच्यासाठी एअर बॅग्ज देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ही गाडी सर्व गरजा भागवते.

बाह्य़रूप

मर्सिडीजच्या कोणत्याही गाडय़ांप्रमाणे ही गाडी बाहेरून पाहताना अगदी चकाचक आणि आलिशान दिसते. एसयूव्ही श्रेणीतील ही गाडी मर्सिडीजच्या इतर एसयूव्ही गाडय़ांप्रमाणेच दिसायला अगदी दणकट आणि तरीही सुंदर आहे.

मर्सिडीझने याआधी भारतात आणलेल्या जीएलई आणि जीएलसी कूप या दोन गाडय़ांच्या धाटणीचे हेडलॅम्प्स या गाडीला आहे. या गाडीसाठी मर्सिडीझने खास नवीन रेडिएटर ग्रील डिझाइन केलं आहे. या ग्रीलच्या मध्यभागी मर्सिडीझचा तारा दिमाखात झळकतो. त्याशिवाय बॉनेटच्या पुढील भागातही हा एम्ब्लेम गाडीची शोभा वाढवतो. गाडीच्या हेडलाइट्सपासून टेल लाइट्सपर्यंत सर्व दिवे एलईडी आहेत. ते गाडीच्या देखणेपणात भर घालतात.

रूफ रेल, लगेज कम्पार्टमेण्टला असलेले हॅण्डल, २० इंची टायर या सगळ्यांमुळे गाडी नक्कीच चांगली दिसते. मर्सिडीझने ही गाडी सहा रंगांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. यातील कोणताही रंग मर्सिडीझचा वेगळा दर्जा दाखवण्यात कमी पडत नाही.

इंजिन

या आरामदायक अनुभवाबरोबर एसयूव्ही गाडय़ांसाठी लागणारी ताकद देणारं या गाडीचं इंजिनही दमदार आहे. ३ लिटर, व्ही६ डिझेल इंजिन या गाडीला २५८ हॉर्सपॉवर एवढी ऊर्जा देतं. त्याचप्रमाणे सुखद ड्रायिव्हगच्या अनुभूतीसाठी गाडीत ९ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअर्स आहेत. विविध प्रकारच्या भूभागांवर ही गाडी लीलया चालावी, यासाठी गाडीत पाच विविध मोड्स देण्यात आले आहेत. यात नेहमीच्या स्पोर्ट्स, सिटी अशा मोड्सप्रमाणे ऑफ रोड, निसरडा रस्ता यांचाही समावेश आहे.

अंतरंग

मर्सिडीझच्या या गाडीचं अंतर्गत सजावटही कोणालाही भुरळ पाडेल, अशीच आहे. एसयूव्ही असल्याने या गाडीतून सात जण प्रवास करू शकतात. मात्र इतर एसयूव्ही श्रेणीतील गाडय़ांप्रमाणे सात जणांना प्रवास करताना कुठेही कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी कंपनीने घेतली आहे. शेवटच्या सीटवरील माणसालाही अत्यंत आरामदायक प्रवासाचा अनुभव घेता यावा, हा विचार करण्यात आला आहे. त्याशिवाय पुढील दोन सीट्सचे नियंत्रण दरवाज्याच्या पॅनलवरील बटणांद्वारे करता येते. या दोन्ही सीट्स पुढे-मागे, वर-खाली सरकवण्यासाठी केवळ एक बटण सरकवण्याची गरज आहे. गाडी सात प्रवाशांसाठी असली, तरी कंपनीने स्टोअरेज स्पेसही खूप दिली आहे. पूर्ण सात प्रवासी असताना गाडीत ६८० लिटर आणि मागची सीट दुमडल्यास २३०० लिटर लगेज गाडीत मावू शकते.

गाडीत इन्फोटेन्मेण्टसाठी आठ इंची डिस्प्ले असलेली एक टचस्क्रीन देण्यात आली आहे. यावरून कॉल्स, मेसेजेस आदी गोष्टी विनासायास करता येतील. त्याचप्रमाणे गाणी, चित्रपट आदींसाठीही हा डिस्प्ले महत्त्वाचा आहे. लेदर स्टिअिरग व्हील, स्टिअिरग व्हीलवरच गिअर शििफ्टग पॅडल, स्टिअिरग व्हीलवर विविध यंत्रणा सांभाळणारी १२ बटणे, आयपॅडसारखा मीडिया डिस्प्ले यांमुळे गाडीत बसल्या बसल्या आरामदायक प्रवासाची खात्री मिळते.