बुंग बुंग आवाज करत भन्नाट पळणाऱ्या बाइक, स्पोर्ट्सबाइक, सुपरबाइक या सगळ्याच्या झगमगाटात इलेक्ट्रिक बाइक म्हणजे अळणी जेवणच वाटायला हवं. इलेक्ट्रिक बाइक म्हणजे आवाज न करणारी, कमी अ‍ॅव्हरेज असलेली, शहरातच फिरवण्यासारखी वगरे अशा आपल्या समजुती असतात. मात्र या सर्व समजुतींना छेद देणारी एक नवी कोरी इलेक्ट्रिक बाइक लवकरच बाजारात येऊ घातलीय आणि तेही एका अस्सल मराठमोळ्या इंजिनीअरने तयार केलेली..

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किमती वाढल्या किंवा घटल्या की आपल्याकडेही पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढतात किंवा मग घटतात. तेलाच्या किमतीतील या चढउताराचा आपल्या खिशावर अप्रत्यक्षपणे परिणाम होतच असतो. वाहनधारक तर आता दर महिन्याच्या एक किंवा १५ तारखेची वाट पाहात असतात. या दिवशी इंधनाचे नवीन दर घोषित होतात. मग कधी ते वाढतात तर कधी घटतात. त्यामुळे धाकधूक असतेच. असो. हे झाले इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे. मात्र आताशा आता पर्यावरणस्नेही, कमी कार्बन उत्सर्जति करणाऱ्या, प्रदूषणात भर न टाकणाऱ्या गाडय़ांचे महत्त्व वाढू लागले आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाडय़ांची संख्याही वाढू लागली आहे. आपल्याकडे नाही परंतु परदेशांत या गाडय़ा जास्त दिसू लागल्या आहेत. मात्र इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या चारचाकीच जास्त असतात. दुचाकी अगदीच अपवादानेच आढळतात. आपल्याकडे तर त्याचे प्रमाण नगण्यच. या पाश्र्वभूमीवर एक स्वदेशी बनावटीची इलेक्ट्रिक बाइक लवकरच रस्त्यावर धावताना दिसणार आहे. टी6एक्स असे या बाइकचे नाव असून येत्या दोन महिन्यांत ती दुचाकीप्रेमींच्या सेवेत दाखल झालेली दिसणार आहे. टॉर्क मोटरसायकल्स या पुणेस्थित कंपनीने या बाइकची निर्मिती केली आहे.

टॉर्क मोटारसायकल्स कोण?

टी६एक्सची निर्मिती करणारी टॉर्क मोटारसायकल्सची मालकी कपिल शेळके या अस्सल मराठमोळ्या इंजिनीअरकडे आहे. इलेक्ट्रिक बाइकची निर्मिती करण्याची कल्पना त्यांना महाविद्यालयात असतानाच सुचली. महाविद्यालयात एक प्रोजेक्ट करत असताना शेळके व त्यांच्या मित्रांनी एका बाइकचे पेट्रोल इंजिन काढून तिला इलेक्ट्रिक इंजिन जोडले. त्यांचा हा प्रोजेक्ट कमालीचा यशस्वी ठरला. आणि त्यापासून प्रेरणा घेऊनच शेळके यांना इलेक्ट्रिक बाइकच्या निर्मितीची संकल्पना सुचली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी २००९ मध्ये टॉर्क मोटारसायकल्सची स्थापना केली आणि आता ते त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या अगदी समीप येऊन ठेपले आहेत.

टी६एक्स्ची वैशिष्टय़े

टी६एक्स ही पूर्णत: स्वदेशी बनावटीची बाइक २०० सीसी क्षमतेच्या बाइकला टक्कर देणारी असेल. एकदा का गाडीची बॅटरी पूर्ण चार्ज केली की ती किमान १०० किमीपर्यंत पळू शकणार आहे. तसेच तिचा क्रुिझग स्पीड ८५ किमी प्रतितास एवढा असेल. बाइकवर नेव्हिगेशन सिस्टीमही उपलब्ध असेल. जीपीएस इंटिग्रेशन सिस्टीममुळे बाइकस्वाराला मार्गदर्शन होणार आहे. हेल्मेट स्टोअरेज आणि यूएसबी फोन चार्जर या सुविधाही या बाइकमध्ये उपलब्ध असतील. यातील लिथियम आयन बॅटरी दीर्घकाळ टिकणाऱ्या आहेत. त्यामुळे गाडीच्या देखभालीला फारसा खर्च करावा लागणार नाही. मोटारसायकलशी कनेक्टेड राहता यावे यासाठी टॉर्कने अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप्लिकेशनही विकसित केले आहे. तुम्ही दिवसभरात किती अंतर कापले, तुम्ही कोणत्या मार्गाने गेलात वगरेची नोंदही टी६एक्स करून ठेवू शकणार आहे. टी6एक्स २०० सीसीपेक्षाही वेगवान असेल, असा टॉर्कचा दावा आहे. तसेच या बाइकला प्रतिकिमी लागणारी वीजही स्वस्त असेल, असाही टॉर्कचा दावा आहे. एबीएस व्हर्जनमध्येही टी6एक्स उपलब्ध असेल. गाडीचे टायर्स सिएट कंपनीकडून तयार केले जाणार आहेत.

चार्जिगचं काय

आता प्रश्न असा निर्माण होतो की, गाडी वैशिष्टय़पूर्ण असली तरी तिच्या चार्जिगचे काय. पेट्रोल पंपांसारखे चार्जिग पॉइंट्स कुठे उपलब्ध असतील. त्यावरही टॉर्ककडे उत्तर उपलब्ध आहे. टी6एक्स ज्या ज्या शहरांत लाँच होणार आहे त्या शहरांत किमान १०० चार्जिग स्टेशन्स उभारण्याची कंपनीची योजना आहे. सुरुवातीला टी6एक्स पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबाद या शहरांत लाँच केली जाणार आहे. कॅफे आणि मॉल्स या ठिकाणांवर चार्जिग स्टेशन्स उभारली जाणार आहेत. चाचणी तत्त्वावर पुण्यात दोन ठिकाणी ही स्टेशन्स उभारण्यात आली आहेत. दरवर्षी ६० हजार गाडय़ांची निर्मिती करण्याचा कंपनीचा मानस आहे. सर्व काही सुरळीत झाल्यास एक तर दिवाळीदरम्यान किंवा मग जानेवारीत टी६एक्स रस्त्यावर धावताना दिसू शकेल.

jaideep.bhopale@expressindia.com