एक वेळ तुमच्या वाहनाच्या टाकीतील इंधन किंवा कारची बॅटरी संपली असेल तरी इंजिन सुरू होऊ शकते. मात्र वाहनाच्या इंजिनामध्येच वंगण (ऑइल) नसेल तर ती संपूर्ण इंजिनासाठीच मोठी समस्या होऊन बसेल. वंगण हा केवळ इंजिनामधीलच नव्हे तर एकूणच वाहनामधील एक महत्त्वाचा भाग आहे.

एकदा इंजिन सुरू झाले की त्यातील प्रत्येक फिरत्या भागात वंगण पसरले जाते. असे झाल्यानंतर इंजिनातील प्रत्येक भागाचा थेट अन्य पोलादी भागाबरोबरचा संपर्क वंगणाच्या मध्यस्थीने होतो. इंजिनामधील विविध भाग सतत फिरत असल्याने त्यातील ऊर्जा शमविण्याचे कार्यही हे वंगण करते. त्याचबरोबर इंजिनातील धूळ अथवा अन्य अनावश्यक खराब भाग वंगणाच्या साहाय्याने वेगळे होतात. इंजिन स्वच्छ करण्याचं काम यामार्फत वंगणाद्वारे होतं.

या वंगणांना दर्जा असतो. त्याला दिलेल्या विविध क्रमनामावलीमुळे त्यातील वैविध्यपूर्णता अधोरेखित होते. एकेरी अंक, अंक आणि इंग्रजी मूळाक्षरं, अक्षरांभोवती अंक असे वेगवेगळे प्रकार त्यात आहेत. जसे की, १०डब्ल्यू३०. यामध्ये डब्ल्यू म्हणजे विंटर. पहिला अंक म्हणजे दर्जा पतमानांकन. कमी आकडा म्हणजे कमी तापमानातही ते कार्यरत राहू शकतं, असा त्याचा अर्थ. तर पुढील आकडा म्हणजे वंगणाची जाडी. वंगण जाडी हे कोणत्या तापमानात ते कार्य करू शकतं, हे दर्शवितं. तुम्ही जेव्हा वाहन खरेदी करता तेव्हा त्याच्यासोबत येणाऱ्या माहितीपत्रकात हे सारं दिलेलं असतं.

सिंथेटिक, मिनरल आणि सेमी सिंथेटिक असे वंगणाचे प्रमुख तीन प्रकार आहेत. मिनरल वंगण हे पृथ्वीच्या पोटातून काढून त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करून सादर केलं जातं. तुलनेत हे अन्य वंगणापेक्षा स्वस्त असतं. पण अनेकदा यामुळे इंजिनाची हालचाल तेवढीच सुलभ होईल हे सांगता येणं कठीण आहे. सिंथेटिक वंगण हे खनिकर्म तेलाद्वारे तयार केलं जातं. त्यानंतर त्यात काही रसायनं मिसळली जातात. या दोन्हींतला भिन्न प्रकार म्हणजे सेमी सिंथेटिक वंगण होय.

तुम्ही अनेकदा वेगवेगळे वंगण वापरूप पाहता. मिनरलवरून सिंथेटिक वंगणाकडे तुम्ही वळत असाल तर तत्पूर्वी आधीचे वंगण पूर्णपणे काढून टाका. ऑइल फिल्टरही या वेळी बदला. नवे वंगण इंजिनाच्या सर्व भागांमध्ये पोहोचलेय का हेही तपासा. वंगण संपण्यापूर्वी ते भरा. तुमचं वाहन समजा वर्षभर जागचं हाललंच नाही तरीदेखील वंगण जरूर बदला.

प्रणव सोनोने -pranavsonone@gmail.com