सरासरी चांगल्या वाहनांकरिता पसंती देण्याचे प्रमाण भारतात तरी उत्तम आहे. तुम्ही वाहनांच्या जाहिरातीत इंधन प्रतिसादाच्या आकडय़ापुढे * हे चिन्ह अनेकदा पाहिले असेल. या चिन्हातच खूप काही दडले आहे. या चिन्हाबरोबर एआरएआय हा शब्दही अनेकदा असतो.

काय आहे एआरएआय? अर्थातच ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया. वाहन रस्त्यावर धावण्यासाठी कितपत योग्य आहे हे ही यंत्रणा निश्चित करते. याबाबतची वाहनाची सर्व चाचणी या संस्थेमार्फत होते. सुरक्षा, गुणवत्ता तसेच इंधन आणि वेग क्षमता हे सारे या यंत्रणेच्या टप्प्यातून जाते.

इंधन क्षमतेच्या बाबत ही यंत्रणा विशेष अभ्यास करते. एका बंद खोलीत विशिष्ट मीटरवर सुरुवातीला वाहन ‘धावू’ दिले जाते. या खोलीतील तापमान २५ डिग्री सेल्सिअस असते. आणि बॅरोमेट्रिक दबाव हा एक बार असा असतो. कमाल प्रति तास १८ किलोमीटर या पल्याड वेग जाऊ दिला जात नाही. एअरकूल इंजिनकरिता चाचणी खोलीत एक मोठा पंखा असतो. तो अगदी चाचणी देणाऱ्या वाहनासमोर ठेवलेला असतो. इंजिनातील वंगण थंड करण्याचे कार्य तो करतो. अशा वाहनामध्ये असलेल्या मर्यादित इंधनाच्या आधारे चाचणी होते. अशा वेळी  संबंधित वाहनाच्या खिडक्या आवर्जून बंद ठेवल्या जातात.

अशा बंद खोलीत वाहनाच्या चाचणीकरिता असलेली मोजपट्टी अत्यंत काटेकोरपणे पाळली जाते. त्यामुळेच अशा वेळी पात्र ठरणारी इंधन तसेच वेग क्षमता योग्यरीत्या नमूद केली जाते आणि त्यानुसार याबाबतचा दावाही निश्चित केला जातो.

अशी चाचणी घेताना संबंधित वाहन हे वरच्या गिअरमध्ये असते. पहिल्या टप्प्यातील चाचणी झाली की प्रति तास ९० किलोमीटरपेक्षा अधिक वेग वाहनाला घेऊ दिला जात नाही. या वेगावर आदर्श वाहन चालविणे असे मानले जाते. हे सारे प्रत्यक्ष रस्त्यावर अनेकदा योग्य ठरणारे नसतेही. गर्दीतील वाहतूक, रस्त्यांची अवस्था या पैलूवर तर या चाचण्या अनेकदा योग्यही ठरत नाहीत.

तेव्हा तुम्ही वाहन खरेदी करत असाल आणि अशा सूचनांकडे लक्ष जात असेल तर तो आकडा प्रत्यक्षात प्रतिसाद देईलच, असे नाही.

प्रणव सोनोने – pranavsonone@gmail.com