भारतीय वाहन उद्योगासाठी यंदाचे वर्ष अत्यंत घडामोडीचे राहिले. त्यातल्या काही चांगल्या होत्या तर काही खूपच वाईट. उदाहरणार्थ दिवाळीनंतर घेण्यात आलेल्या नोटाबंदीचा निर्णय. या नोटाबंदीमुळे एकूणच अर्थव्यवस्थेवर परिणाम केला आहे. त्याला वाहन उद्योग तरी कसा अपवाद ठरणार. त्यातच आíथक कायदे, नियमांचे जंजाळ वगरे नेहमीच्या मुद्दय़ांवरून वाहन उद्योग चच्रेत राहिलेच..

वर्षांची सुरुवात झाली ती दिल्लीत भरलेल्या ऑटो एक्स्पोने. दर दोन वर्षांनी भरणारे हे वाहन प्रदर्शन म्हणजे वाहनप्रेमींसाठी पर्वणीच असते. जगभरातील वाहननिर्माते या प्रदर्शनात स्टॉल लावून आपल्या आगामी गाडय़ांचे सादरीकरण करतात. मात्र, यंदाचे हे वाहन प्रदर्शन अगदीच मिळमिळीत ठरले. अगदी नजर खिळवून ठेवतील, वाहन उद्योगात खळबळ उडवतील वगरे अशी वाहनेच नव्हती या प्रदर्शनात. आवर्जून दखल घ्यावी अशी वाहने या प्रदर्शनात ठेवण्यात आली नव्हती. त्यामुळे फारसा प्रतिसादही मिळाला नाही यंदाच्या ऑटो एक्स्पोला.

मधला काळ वाहन उद्योगासाठी चांगला गेला. मान्सूनने यंदा सगळी कसर भरून काढल्याने सणासुदीच्या हंगामात वाहनांची विक्री दृष्ट लागण्याइतकी वाढली. नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा भारतीय वाहन कंपन्यांनी विक्रीतील दहा टक्के उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. मात्र, या वर्षांत बाजारात आलेल्या नवनव्या वाहनांच्या तुलनेत ही वाढ वाहन उद्योगासाठी फारशी कौतुकास्पद नाही. अर्थात त्याला नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णयही कारणीभूत ठरला आहे. नोटाबंदीचा ब्रेक बसल्याने वाहन उद्योगाने तूर्तास तरी बसकण मारली असल्याचे चित्र आहे. परंतु तज्ज्ञ आणि बाजार विश्लेषकांच्या मते ही तात्पुरती अडचण असून येत्या अर्थसंकल्पानंतर चित्र बदलण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे.

नोटाबंदीमुळे कर्जाबरोबरच मोठय़ा प्रमाणात रोखीने होणाऱ्या व्यवहारांचा फटका वाहन उद्योग क्षेत्रालाही बसला आहे. नोटाबंदी आणि वर्षअखेर लक्षात घेता वाहननिर्मात्यांकडून जाहीर केल्या जाणाऱ्या विशेष सोयी, सवलती या पाश्र्वभूमीवर वाहननिर्मात्यांनी वाहने विकण्यासाठी जोर लावला आहे. परंतु रोख रक्कमच लोकांच्या हाती नसल्याने आणि चलनकल्लोळामुळे रोकडरहित व्यवस्थाही अर्थवटावस्थेत असल्याने इच्छा असूनही अनेकांना अद्याप चारचाकी घेता आलेली नसल्याचे निरीक्षण एका तज्ज्ञाने नोंदवले आहे. वाहनखरेदीसाठी आताच योग्य संधी असल्याचेही वाहननिर्मात्यांकडून िबबवले जात आहे, परंतु चलनकल्लोळातच ग्राहकराजा हरवून गेला असल्याने वाहननिर्मात्यांच्या प्रस्तावांकडे लक्ष द्यायला त्याला पुरेसा वेळ मिळत नाहीय. त्याचाच परिपाक म्हणून सरते वर्ष वाहन उद्योगाला काहीशा निराशेनेच साजरे करावे लागणार आहे.

निदान नवीन वर्षांत तरी गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल, अशा भ्रमात तुम्ही असाल तर त्या आघाडीवरही काजळी आहे. कारण टाटा, मारुती, होंडा यांसारख्या वाहननिर्मात्यांनी नवीन वर्षांत गाडय़ांच्या किमती वाढलेल्या असतील, असे आधीच जाहीर करून टाकले आहे आणि जानेवारी-फेब्रुवारीपासून त्याची अंमलबजावणीही केली जाणार आहे. अर्थात हे दरवर्षीप्रमाणेच आहे. परकीय व स्थानिक चलनातील मूल्यफरक तसेच वाहनांसाठी लागणाऱ्या पूरक उत्पादनांच्या, वस्तूंच्या किमतीत ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असल्याने पुढील वर्षी वाहनांच्या किमती किमान आठ ते दहा टक्क्यांनी वाढवाव्या लागणार असल्याचे सर्वच प्रमुख वाहननिर्मात्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच सरते वर्ष जरी वाहन उद्योगासाठी काळजीचे गेले असले तरी नवीन वर्षांतही वाटचाल जिकिरीचीच होणार आहे. त्यातच नव्या वर्षांत वस्तू व सेवा कर (जीएसटी) या नव्या करप्रणालीची अंमलबजावणी केली जाण्याची दाट शक्यता आहे. या सामायिक कररचनेमुळे वाहनांसाठी लागणाऱ्या अनेक वस्तूंच्या किमतींमध्ये करबदलामुळे फरक पडणार आहे.

अर्थसंकल्पातील पायाभूत सेवा आणि आरामदायी करांमुळे वाहन उद्योग क्षेत्रावर यंदा वर्षांच्या सुरुवातीलाच घाला घातला गेला. त्यातच नवी दिल्ली परिसरात दोन हजार सीसी व त्याहून अधिक इंजिन क्षमतेच्या वाहनांवर र्निबध लादण्यात आले. डिझेल गाडय़ांच्या वापरावरही गंडांतर आल्याने गाडय़ांच्या विक्रीवरही त्याचा परिणाम झाला. वाहन उद्योगाची मुख्य ग्राहककेंद्रे दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या शहरांमध्येच एकवटलेली असल्याने साहजिकच दिल्लीतील र्निबधांचा वाहनांच्या विक्रीवर झाला. सुमारे २० ते २५ टक्के विक्री कमी झाली दिल्ली परिसरात. अनेक कंपन्यांना त्यामुळे आपण आता पेट्रोलवर चालणारी वाहने तयार करू, असे जाहीर करावे लागले. देशांतर्गत अशी परिस्थिती असताना जागतिक स्तरावर मात्र वाहनक्षेत्राला चांगला प्रतिसाद प्राप्त झाल्याचे चित्र आहे. भारतात यंदा ह्युदाई क्रेटा, मारुतीच्या बलेनो आणि ब्रेझा, रेनॉची क्विड, टाटाची टियागो आणि मिहद्राच्या केयूव्ही व टीयूव्ही या गाडय़ांनी चांगला व्यवसाय केला. नव्याने गाडी घेऊ इच्छिणाऱ्यांनी वरीलपकी सर्वच गाडय़ांना प्राधान्य दिले. त्यामुळे या गाडय़ांची विक्री चांगली झाली. दरम्यान, टाटा मोटर्समधील कामगार व व्यवस्थापन यांच्यातील वादामुळेही हे वर्ष गाजले. अर्थात हा वाद नंतर मिटला. परंतु तीन-चार महिने हा वाद चालल्याने वाहन उद्योग क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली होती, हेही खरेच.

या सर्व गदारोळात दुचाकी क्षेत्राचा प्रवास यंदा चांगला झाला. हिरो मोटोकॉर्पची आगेकूच पुन्हा पाहायला मिळाली. कंपनी या क्षेत्रात अव्वल आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून तिच्याशी स्पर्धा करणारी होंडा मात्र यंदा काही प्रमाणात सलावल्याचे चित्र आहे. बजाज ऑटो, टीव्हीएस या पहिल्या पाचातील कंपन्या आणि त्यांची दुचाकी विक्री अद्याप प्रगतिपथावर येऊ शकलेली नाही. बुलेटवाल्या रॉयल एन्फील्डचा विक्रीबाबतचा वेग अद्याप सुसाट आहे. यामाहा आणि इतर प्रीमियम स्पोर्ट्स बाइकमधील कंपन्या त्यांचा त्यांचा ग्राहकवर्ग राखून आहेत. यंदा उत्तम झालेल्या पावसामुळे खरे तर ग्रामीण भागाच्या प्रतिसादावर अवलंबून असलेल्या दुचाकी क्षेत्राला २०१६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावता आली. मात्र, नोटाबंदीने हे यशही हिरावून घेतले आहे. नोव्हेंबरनंतर दुचाकींच्या विक्रीत घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. एकूणच यंदाचे वर्ष वाहन उद्योग क्षेत्रासाठी संमिश्र प्रतिसादाचे गेले. आता आशा आहे पुढील वर्षांपासून.. तोपर्यंत अलविदा, सायोनारा.. २०१६.