आपली शहरे दिवसेंदिवस अधिक गर्दीची, वाहतूक कोंडीची बनत चालली आहेत. दिवसाला अधिक संख्येने रस्त्यावर उतरणारी वाहने हे त्याचे एक कारण आहेच. पण वाहन चालविण्यातील आनंदही ही घडामोड हिरावून घेत आहे. मोठय़ा आकारातील वाहने चालविण्याची मजा तर त्यामुळे आपण घेऊच शकत नाही. मग सेदान अथवा एसयूव्ही चालविण्याची सैर ती काय? अनेकदा मोठय़ा प्रवासी कार या आरामदायी वाटतात. पण त्या अशा गर्दीच्या ठिकाणी, कोंडीत चालविण्यात फार मजा येत नाही.

अशा वेळी मुंबईसारख्या शहरात छोटय़ा कार खूपच उपयोगी ठरतात. शहरात अनेकदा कारमध्ये संबंधित व्यक्ती एकटय़ानेच प्रवास करत असतो. तेव्हा अशा प्रसंगी या कार अधिक छोटय़ा असल्या तर उत्तमच. यामुळे प्रत्येकालाच कार चालविण्याचा आनंद घेता येईल आणि वाहतुकीचा बोजवाराही उडणार नाही. यादृष्टीने नुकतीच एक कॉन्सेप्ट कार सादर झाली. तिचे प्रत्यक्षात पूर्ण स्वरूपात उत्पादनही घेतले जाणार आहे. प्रोजेक्ट एम या सांकेतिक नावाची ही कार जगप्रसिद्ध कार डिझायनर जॉर्डन मुरे आणि आघाडीची तेल/वंगण कंपनी शेल यांच्या सहकार्यातून तयार होत आहे.

या कारबाबतची काही वैशिष्टय़े येथे पाहता येतील. अनोखी कार म्हणून ती निश्चितच आश्चर्यकारक आहेत. या कारची एकूण लांबी फक्त २.५ मीटर आहे. आणि तिचे वजन ५५० किलो ग्रॅम आहे. या कारची बॉडी ही पूर्णपणे रिसायकल होणारी आहे. ती कार्बन फायबरपासून तयार करण्यात आली आहे. तिचे काही भाग हे थ्रीडीने प्रिंट आहेत. या कारमध्ये केवळ तीन जणच बसू शकतात. यामध्ये ड्रायव्हर हा अर्थातच समोरच्या भागात मात्र मध्यभागी असतो. आणि मागे दोघे जण. बरं. कारची पाय ठेवण्याची जागाही तशी बरी. म्हणजे १६० लिटर. ३ सिलिंडर ६६० सीसी इंजिन क्षमतेची ही कार. पाच गिअर व ४३ बीएचपीदेखील. ही कार तासाला ७२ किलो मीटपर्यंत धावण्याचा कंपनीचा दावा आहे. तर मायलेजच्या बाबतीत प्रति लिटर पेट्रोलमध्ये ४५ किलो मीटरचे अंतर ही कार कापू शकते. तिची प्रति तास मर्यादा १४० किलो मीटर आहे.

अशी कार भारतीय वाहन बाजारपेठेत उतरली तर ती सामान्यांचे जगणे निश्चितच सुसह्य़ करेल. ज्येष्ठ नागरिक तसेच युवा वर्गालाही ही कार शहरात फिरण्यासाठी आकर्षित करू शकेल. बाहेरची कामे झटपट पूर्ण करण्यासाठी गृहिणी तसेच नोकरीवर जाणाऱ्या महिलांकरिताही ती उपयोगी ठरू शकेल.

भारतात अशी कार येण्याची खरोखरच सध्याच्या स्थितीची, काळाची गरज आहे. वाहतूक कोंडीत तासन तास घालवून वाहन चालविण्यातील निराशा टाळायची असेल तर अशा नव्या धाटणीच्या वाहनांना वाव मिळायला हवा.

pranavsonone@gmail.com