गेल्या काही वर्षांत बदललेल्या बाजारपेठेचा वेध घेत मारुती-सुझुकी या कंपनीने आपली कॉम्पॅक्ट एसयूव्ही व्हिटारा ब्रेझ्झा बाजारात आणली आणि या गाडीने उत्तम प्रतिसादही मिळवला आहे. इंजिन पॉवर, कम्फर्ट आणि लूक्स या सर्वच आघाडय़ांवर ही गाडी जबरदस्त आहेच, पण मायलेजचा विचार करणाऱ्यांसाठी ही गाडी भन्नाट मायलेजही देते..

भारतीय बाजारपेठेने गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड कात टाकली आहे. नवनव्या कंपन्या आपल्या नवनव्या गाडय़ा बाजारात उतरवत आहेत. एके काळी फक्त हॅचबॅक म्हणजे छोटय़ा गाडय़ांपुरती मर्यादित असलेली ही बाजारपेठ आता हॅचबॅग, कॉम्पॅक्ट सेडान, सेडान, कॉम्पॅक्ट  एसयूव्ही, एसयूव्ही आणि एमपीव्ही अशा सगळ्याच श्रेणींमध्ये विस्तारली आहे. त्यातही गेल्या दोन वर्षांमध्ये एसयूव्ही, एमपीव्ही आणि कॉम्पॅक एसयूव्ही या श्रेणीतील गाडय़ांची मागणी वाढली आहे. फोर्डने इकोस्पोर्ट ही गाडी बाजारात आणली आणि त्या गाडीला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ह्युंदाईच्या क्रेटानेही पसंती मिळवली. याच श्रेणीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी मारुती सुझुकी या भारतीयांच्या विश्वासार्ह कंपनीने व्हिटारा ब्रेझ्झा ही गाडी बाजारात आणली. या गाडीनेही अल्पावधीत चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. मारुती-सुझुकी कंपनीची गाडी असल्याने गाडीच्या देखभाल दुरुस्तीबाबत काहीच शंका नाही. त्याचप्रमाणे पॉवर, मायलेज आणि लूक्स या सगळ्याच बाबतीत गाडी कसोटीला उतरते.

इंजिन

गाडीची इंजिन क्षमता १२४८ सीसी एवढी आहे. गाडीचं इंजिन डिझेल असून चार सििलडरचं हे इंजिन ९० पीएस एवढी शक्ती देतं. गाडीचा पीकअप खूपच चांगला असून त्याचा फायदा ओव्हरटेक करताना मिळतो. त्याशिवाय चढणीवरही गाडी चांगली पळते. मोकळ्या रस्त्यावर ताशी १२० किमी एवढय़ा वेगाने पळतानाही गाडी कुठेच कुरकुरत नाही, त्यावरून गाडीच्या इंजिनची क्षमता लक्षात येते.

अनुभव

गाडी चालवताना अजिबात तणाव जाणवत नाही. गाडीची अंतर्गत रचना, इंजिन आणि मल्टिमीडिया साधनं यांमुळे लांबच्या प्रवासाला ही गाडी चांगलीच आहे. गाडीचे टायर्स टय़ुबलेस असल्याने लांबच्या प्रवासात त्याचा खूप फायदा होतो. गाडीतील सर्वात महत्त्वाचे फिचर म्हणजे गाडीचं मायलेज. ही गाडी डिझेल श्रेणीतली असून २४.३ किलोमीटर प्रतिलिटर एवढं मायलेज देत असल्याचा दावा कंपनी करते. प्रत्यक्षात गाडी २० ते २२ किलोमीटर प्रतिलिटर एवढं मायलेज सहज देते. गाडीतील फ्युएल टँकची क्षमता ४८ लिटर एवढी आहे. त्यामुळे एकदा डिझेल भरल्यावर गाडी १००० किमीपर्यंत सहज जाते. गाडी हायवेप्रमाणेच शहरातील वाहतूक कोंडीच्या रस्त्यांवरही उत्तम चालते. त्याशिवाय क्रुझ कंट्रोल फीचरमुळे सरळ आणि विनावाहतूक रस्त्यावर गाडी एका स्पीडला सेट करून ठेवली की चालकाला आरामात पायाची मांडी घालूनही बसण्याची मुभा आहे. गाडी रस्ता अजिबातच सोडत नाही. मात्र मारुती-सुझुकीने ही गाडी फक्त डिझेल इंजिनमध्ये आणि मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये उतरवली आहे. वास्तविक कंपनी लवकरच पेट्रोल व्हेरियण्टमधील गाडीही बाजारात आणत आहे. त्याचप्रमाणे मारुतीने ही गाडी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्येही बाजारात आणायला हवी.

इंटिरिअर्स

गाडीत शिरल्या शिरल्या गाडीचा डॅशबोर्ड लक्ष वेधून घेतो. डाव्या बाजूला एअरबॅग्ज, त्याशिवाय पूश-अप कॅबिनेट तसेच सुसज्ज स्टिअिरग व्हील, टच स्क्रीन अशा गोष्टींमुळे गाडीत बसल्या बसल्या कम्फर्ट प्रवासाची खात्री बसते. टू प्लस थ्री आसनव्यवस्थाही उत्तम आहे. गाडीच्या हाय एण्ड व्हेरिएण्टमध्येही ऑटोमॅटिक सीट कंट्रोल्स नाहीत, हा गाडीचा ड्रॉ बॅक आहे. पण तरीही गाडीच्या सीट्स आरामदायक प्रवासासाठी खूप चांगल्या आहेत. गाडी सलग चार-पाच तास चालवली, तरी ड्रायव्हरला काहीच त्रास होत नाही. गाडीच्या मागच्या सीट्सवरही आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळतो. गाडीची वातानुकूलन प्रणाली खूपच उत्तम असल्याने मागे बसलेल्या प्रवाशांनाही थंड हवा मिळते. गाडीच्या फ्युएल इंडिकेटर, किलोमीटर कॅलक्युलेटरसाठी ड्रायव्हर्स इन्फो डिस्प्लेवर सगळी माहिती देण्याची व्यवस्था आहे. टच स्क्रीनवर ब्लूटूथ कनेक्शन, एफएम, मल्टिमीडिया, जीपीएस नॅव्हिगेटर अशा सगळ्या गोष्टी असल्याने गाडी त्या दृष्टीनेही सुसज्ज आहे. गाडीच्या मागच्या सीटवर दोन आसनांमध्ये आर्म रेस्ट आणि ग्लास होल्डर असल्याने गाडीत चौघेच असतील, तर कम्फर्टचा अनोखा अनुभव मिळतो. त्याशिवाय गाडीची बूट स्पेसही खूप चांगली आहे.

गाडीचा लूक

गाडीची ठेवण ह्युंदाई कंपनीच्या क्रेटा या गाडीच्या जवळपास जाणारी आहे. फ्रंट फेसिंग आणि रिअर हे दोन्ही खूप बोल्ड असल्याने गाडीला एक डॅिशग लूक मिळतो. गाडीचं बॉनेट आणि ग्राउंड क्लिअरन्स उत्तम असल्याने गाडी ऑफ रोडसाठीही चांगली आहे. लूक्सच्या बाबतीत मारुतीने या गाडीच्या वेळी धाडसी पाऊल उचलले आहे. या गाडीचं ग्रील छोटं असलं तरी थेट हेडलाइट्सशी जोडलेलं हे ग्रील आणि त्यावरील मारुती-सुझुकी कंपनीचा एम्ब्लेम लक्ष वेधून घेतो. त्याशिवाय फॉग लाइट्स, मिर्स यातही एक स्पोर्टी लूक कंपनीने कायम ठेवला आहे. गाडीचा ग्राऊंड क्लीअरन्स १९८ मिमी एवढा असल्याने गाडी फ्रंट आणि बॅक या दोन्ही बाजूंनी वर वाटते. त्याचप्रमाणे बॉनेट आणि ट्रंक यांच्या खालच्या बाजूला डॅश गार्ड दिल्याने या बोल्ड लूकमध्ये आणखीनच भर पडते. गाडीला रूफटेल असल्याने गाडीचा डौल वेगळाच आहे. गाडीचे टेल लाइट्स दोन्ही बाजूंना कोपऱ्यात असल्याने ते छोटे वाटतात. पण रात्रीच्या वेळी नक्कीच ते अधिक आकर्षक दिसतात.

सोयीसुविधा व सुरक्षा

गाडीच्या मल्टिमीडिया स्क्रीनवर ब्लूटूथद्वारे मोबाइल कनेक्ट केला की, मोबाइलमधील सर्व गाणी आरामात ऐकता येतात. त्याशिवाय एफएमची सुविधाही गाडीत आहे. तसेच गाडीचे दरवाजे आणि दोन आसनांमधील जागा येथे बॉटल व ग्लास होल्डर आहेत. ड्रायव्हरसाठी गॉगल केस, स्टिअिरग व्हीलवरील बटणांद्वारे कॉल उचलण्याचे आणि मोबाइलवर आलेले मेसेज वाचण्याचे स्वातंत्र्य, उत्तम स्पीकर्स यांमुळे गाडीत बसण्याचा अनुभव सुखद आहे. की-लेस एण्ट्री आणि बटण स्टार्ट या सुविधाही गाडीला देण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सेंट्रल लॉकिंग, मोशन सेन्सर डोअर लॉकिंग सिस्टीम, ड्रायव्हर आणि को-पॅसेंजर यांच्यासाठी चार एअरबॅग्ज अशा सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनेही ही गाडी चांगली आहे.

किंमत

गाडीची बेसिक किंमत ६.९९ लाखांपासून सुरू होत असून टॉप एण्ड मॉडेल ९.६८ लाख रुपयांना आहे. या श्रेणीतील इतर गाडय़ांच्या तुलनेत या गाडीचं बेसिक मॉडेल स्वस्त आहे. तसंच गाडीचा परफॉर्मन्सही चांगला आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही गाडी भारतातील रस्त्यांवर आपली छबी उमटवणार, यात वाद नाही.

rohan.tillu@expressindia.com