जर्मन मोटार निर्मितीतील अग्रगण्य कंपनी Mercedes-Benz ने भारतात आपली नवी कार AMG SLC 43 लॉन्च केली आहे. या वर्षात भारतात लॉन्च करण्यात आलेली कंपनीची ही सहावी कार आहे. या कारची किंमत ७७.५ लाख रुपये (दिल्ली एक्स शो-रुम) इतकी ठेवण्यात आली आहे. नवी लक्झरी कन्व्हर्टेबल SLC 43 कार SLK 455 AMG या कारची जागा घेईल. या कारमध्ये ३.० लीटरचे ट्विन टर्बो वी-६ इंजिन देण्यात आले आहे. ज्याची क्षमता ३६७ पीएस आणि टॉर्क ५२० एनएम आहे. कारमध्ये २५० किमी प्रतितास टॉप स्पीड देण्यात आला आहे. ही कार सर्वात पहिल्यांदा ‘डेट्रॉईट मोटर शो २०१६’ येथे सादर करण्यात आली होती. जगभरात ही कार सादर केल्यानंतर केवळ सहा महिन्यांत ती भारतात लॉन्च करण्यात आली. दिल्लीत २,००० सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या इंजिनच्या डिझेल कारची विक्री करण्यासाठी मान्यता नसल्याने सध्या या कारची दिल्ली-एनसीआरमध्ये विक्री होणार नाही. या नव्या कारमध्ये पुढील बाजूस सिंगल क्रोम आणि थ्री पॉइंट स्टारसह कंपनीचा प्रसिध्द सिग्नेचर डायमंड पॅटर्न देण्यात आला आहे. ही कार भारतात उपलब्ध असलेल्या Mercedes-Benz A-Class सारखी आहे. डिझाइनच्या बाबतीत ही कार SLK शी मिळतीजुळती आहे. असे असले तरी यात नवीन बंपर, नवीन डिझाइनचे मोठे एअर-इनटेक युनिट, नवीन डायमंड फ्रंट ग्रिल, दमदार बॉनेट, इंटिग्रेटेड क्रोम फिनिश्ड टेल पाइप आणि १८ इंची लाइट अलॉय व्हिल देण्यात आले आहेत.