टायरची रिटायरमेंट हे जरा वाचून चमत्कारिक वाटेल. होय, चमत्कारिकच आहे परंतु वेगळ्या अर्थाने. अनेक जण, म्हणजे वाहनधारकच, गृहीत धरून चालत, खरं तर चालवत असं म्हणायला हवं, असतात की आपल्या गाडीला लावलेले टायर तहहयात चालणारे आहेत. त्यांना काही आयुर्मर्यादा नाहीच. मात्र, हे चुकीचं आहे. गाडीचे टायर अमुक एका कालावधीत बदलायलाच हवीत. त्यांच्याबद्दल एवढी अनभिज्ञता आहे वाहनधारकांमध्ये की टायरलाही निवृत्त करावे लागतेच, हे त्यांच्या गावीही नसते. म्हणूनच हा लेखप्रपंच..

 

एकदा मी मुंबई-पुणे दुचाकीवरून प्रवास करत होतो. काही ठिकाणी जुना मार्ग द्रुतगती मार्गाला छेदून जातो किंवा असं म्हणू हवं तर की दुचाकीस्वारांना पाच-सहा किमी अंतर या द्रुतगती मार्गावरूनच कापावे लागते. तर मी असाच या द्रुतगती मार्गावरून जात होतो. माझ्या दुचाकीजवळून एक मिहद्रा बोलेरो गेली झपकन.. ताशी १००-१२०चा वेग होता बोलेरोचा. मात्र माझ्या लक्षात आलं की एक बारिकसा काळा रबरी तुकडा त्या गाडीच्या टायरमधून उडाला. मला शंका आली, म्हणून मी माझ्या परीने बोलेरोचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु एक दुचाकीस्वार आपल्या वेगाशी स्पर्धा करतोय हे पाहून बोलेरोच्या चालकाला आणखीनच चेव आला. त्याने आणखीन वेग वाढवला. साधारण दीड-दोन किमीपर्यंत हा खेळ चालू होता. अखेरीस मी त्याच्या मागे जाण्याचा नाद सोडून मागून येणाऱ्या दोन-तीन कारवाल्यांना पुढे जाऊन त्या बोलेरोवाल्याला थांबण्याचा निरोप देण्याची सूचना केली. त्यांनी तसं केल्यानंतर बोलेरोवाल्याच्या कपाळावर आठय़ा चढल्या. परंतु त्याला काही तरी गडबड असल्याचं लक्षात आलं. त्याने वेग ताशी ६० किमीपर्यंत कमी केला. आणि तेवढय़ात त्याच्या गाडीच्या टायरचं अख्खं सोल मागे उडाले आणि मागून येणाऱ्या कारवर आदळलं. आणि उजव्या मार्गिकेत असलेली बोलेरो पूर्णपणे डावीकडे सरकून रेिलगवर आपटली. गाडीचा वेग कमी होता म्हणून बोलेरोतील आठही जण सुखरूप बचावले. चालक तर थरथरत होता नुसता. मला बघून त्याने नुसते हात जोडले. पुढे त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. गाडी १००-१२०च्या वेगाला असती तर काय झालं असतं या विचारानेच त्याची बोबडी वळली होती.

आता सांगा त्याने रिमोल्डचे टायर वापरून किती पसे वाचवले असतील. मला वाटतं बोलेरोचे टायर आणि रिमोल्डचे टायर यांच्यात जास्तीत जास्त तीन-साडेतीन हजारांचा फरक असेल. म्हणजे प्रति किमी जेमतेम २५ पसे वाचत असतील. जीव एवढा स्वस्त आहे? माझ्या माहितीप्रमाणे साधारणत: विमा पॉलिसीमध्ये अशा टायर फुटून झालेल्या अपघातासाठी नुकसान भरपाईसुद्धा मिळत नाही. मग कशाला घ्यायची जोखीम? खराब टायरमुळे गाडीचा स्मूदनेस कमी होतो.

ग्रीम कमी झाल्याने गाडी रस्त्यावरील पकड निसटू लागते. तिचा मायलेज घसरणीला लागतो आणि एकूणच गाडीच्या कामगिरीवर परिणाम होऊ लागतो. या सगळ्याचा हिशेब केला तर आपण जे पसे वाचवतो किंवा त्यांचं गांभीर्य लक्षात न घेता टायर बदलण्याची टाळाटाळ करतो वा आळस करतो त्यापेक्षा खूप जास्त जोखीम आपण घेत असतो. किंवा त्याची कमी जास्त प्रमाणात किंमतही मोजत असतो. त्यामुळे वेळीच टायरला रिटायर करणे केव्हाही योग्यच.

मानसकिता बदलणे गरजेचे

गेल्या काही वर्षांत मी दुचाकी आणि चारचाकी वापरणाऱ्यांच्या मानसिकतेचा बारकाईने अभ्यास केलाय. मला भेटलेल्या जवळपास ७५ टक्के लोकांना गाडीच्या टायरची स्थिती आणि त्यात असलेली जोखीम याची जाणीवच नसते. किंवा असली तरी त्याविषयी ते फारसे गंभीर नसतात. बरेच जण एवढी र्वष गाडी चालवतोय कुठे काय झालंय किंवा एवढे किलोमीटर रिनग झाले की बदलणार वगरे छापाची वाक्ये आपल्या तोंडावर फेकतात. मुळात हेच पूर्णत: चुकीचं आहे. टायरची झीज ही नुसत्या रिनगमुळे होते असे नाही. तर चुकलेली अलाइनमेंट, खराब रस्ते, टायरमध्ये असलेला हवेचा कमीजास्त दाब, चालवणाऱ्याची ड्रायिव्हगची पद्धत अशा अनेक गोष्टींमुळे टायरची झीज होत असते. ती कमी व्हावी यासाठी काय करायला हवे, याचे काही नियम आहेत. ते जर नीट लक्षात ठेवले किंवा त्यांची वेळोवेळी अंमलबजावणी केल्यास टायरचे आयुर्मान तर वाढतेच शिवाय तुमच्या जिवाला असलेला धोकाही टळतो.

टायर केव्हा बदलावेत..

* टायरला एक नक्षी असते. त्या नक्षीच्या बाहेरच्या बाजूला चार-पाच ठिकाणी साधारणत: एक त्रिकोणी खूण असते त्या ठिकाणी नक्षीला गॅप मार्किंग असते. त्या मार्किंगला नक्षी टेकली की समजावं गाडीच्या टायरची रिटायरमेंट आता जवळ आली आहे म्हणून

* व्हील अलाइनमेंट खराब असेल तर एक बाजू झिजते. त्यामुळे असे टायर शक्यतो वापरूच नये

* खूप दिवस गाडी वापराविना पडून असेल तरी टायर टणक होतात. त्याही अवस्थेतील गाडीचा वापर टाळावा

* टय़ूबवाले टायर असतील आणि गाडी अनेक दिवस एकाच जागी उभी राहिली असेल तर टायरमध्ये एअर येऊन गाडी व्हॉबल होते. टायरला जिथे फुगा येतो तिथे तो फुटू शकतो किंवा त्यातील तारा बाहेर येऊन टायरची अवस्था वाईट होऊ शकते

* टायरला चिरा गेल्या असतील तर ते ताबडतोब बदलून टाकावे

* शक्यतो नामांकित टायर उत्पादक कंपन्यांचेच टायर वापरावेत

टायरची झीज कमी व्हावी यासाठी घ्यावयाची खबरदारी

* गाडीच्या व्हील अलाइनमेंटची वेळोवेळी तपासणी करून घेणे

* तीन ते पाच हजार किमी रिनगनंतर टायर रोटेट करून घेणे

* गाडी वेगात असताना जोरात वळण न घेणे

* वेळोवेळी निव्वळ ब्रेकवर गाडी नियंत्रित करणे टाळावे

* शक्य तितके गाडी गीअरमध्येच नियंत्रित करण्यावर भर द्यावा

* टायरमधील हवेच्या दाबावर लक्ष ठेवावे. वेळोवेळी त्याची तपासणी करून घ्यावी

* सस्पेन्शन खराब झाले असेल किंवा अँगल बदलला असेल तरी एक टायर झिजतो त्यामुळे मेकॅनिकच्या सल्ल्यानुसार त्यात बदल करावा

* गाडीच्या टायरची झीज झाले किंवा कसे हे वेळोवेळी तपासून घ्यावे

समीर ओक -ls.driveit@gmail.com